पोलिसांच्या वाहनांवर राहणार वॉच; जीपीएस यंत्रणा कार्यान्वित

सुशांत सांगवे 
Sunday, 19 January 2020
  • पोलिसांच्या वाहनांवर आता कडक लक्ष
  •  पोलिसांना रहावे लागणार अलर्ट

लातूर : एखादी गंभीर घटना घडल्यानंतर पोलिसांचे वाहन घटनास्थळी वेळेवर पोहोचले का... नेमून दिलेल्या वेळी पोलिस अधिकारी-कर्मचारी आपल्या वाहनातून शहरात गस्त घालत आहेत का... खासगी कामासाठी सरकारी वाहनांचा वापर होतोय का... या आणि अशा अनेक बाबींवर आता कडक लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. याबाबतची पडताळणी जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून यापुढे जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात होणार आहे.

शहरात आणि जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली आहे. याच्या जोडीलाच घरफोड्यांचेही प्रमाण वाढले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षभरात अपघाताच्या घटनांचाही आलेख वाढला आहे. २०१८ मध्ये ६३३ गंभीर अपघात झाले. त्यात २६४ जणांचा मृत्यू झाला. तर २०१९ मध्ये 641 गंभीर अपघात झाले. त्यात २९० जणांचा अपघातात मृत्यू झाला. अशा सर्व प्रकारच्या गंभीर घटनांच्या ठिकाणी पोलिस तातडीने मदतीसाठी पोहोचावेत आणि ते पोहोचले की नाही? याची पडताळणी व्हावी म्हणून पोलिस दलातील सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे.

विशेष पोलिस महानिरिक्षक मनोजकुमार लोहिया (नांदेड परीक्षेत्र) हे नुकतेच लातूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते आणि पोलिस अधिक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यासंदर्भात अपर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव म्हणाले, जिल्ह्यातील सर्वच सरकारी वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची ही संकल्पना आहे. त्यानूसार पोलिस दलातील दुचाकी आणि चारचाकी अशा सर्व वाहनांनाही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, पोलिसांच्या वाहनांचे मॉनिटरिंग पोलिस अधिक्षक कार्यालयातूनच होईल. एखादी गंभीर घटना घडल्यानंतर पोलिसांचे कुठले वाहन घटनास्थळापासून जवळ आहे, हे पाहिले जाईल आणि त्या वाहनाला घटनास्थळी पाठवले जाईल. रात्रीच्या वेळी गस्त प्रभावीपणे होत आहे का, हे तपासले जाईल. अशी अनेक कामे या यंत्रणेमुळे सोपी होणार आहेत.

अखेर संकेतस्थळ अद्ययावत

लातूर पोलिस दलाचे laturpolice.gov.in हे संकेतस्थळ अखेर अद्ययावत करण्यात आले आहे. याचेही लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस दलाशी संबंधीत माहिती आता संकेतस्थळावर पहायला मिळत आहे. निर्भया हेल्पलाईन क्रमांक, व्हॉट्‌स अप हेल्पलाईन क्रमांकही संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. याशिवाय, नागरिकांना ऑनलाईन तक्रारीही या माध्यमातून करता येणार आहेत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत संकेतस्थळावरील माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News