विविह कार्यालये सुरु; अशी करा नोंदणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 20 May 2020

मुंबईतील दस्तनोंदणीच्या 23 पैकी 10 कार्यालये आणि एक विवाह नोंदणी कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रे वगळून इतर 10 ठिकाणी दस्तनोंदणी कार्यालये सोमवारपासून सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी 487 कागदपत्रांची नोंद झाली, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी दिली.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दस्तनोंदणी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. मुंबईतील दस्तनोंदणीच्या 23 पैकी 10 कार्यालये आणि एक विवाह नोंदणी कार्यालय सुरू करण्यात आले आहे. देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे दोन महिन्यांपासून मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार बंद होते. दस्तनोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी राज्य सरकार आणि मुंबईचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दस्तनोंदणी कार्यालये सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार राम यांनी परवानगी दिल्यानंतर मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रे वगळून 11 कार्यालये सोमवारपासून सुरू करण्यात आली.

पहिल्याच दिवशी 487 कागदपत्रांची नोंद होऊन 23 लाख 74 हजार रुपयांचा महसूल मिळाला. मुंबईत सोमवारपर्यंत रजा आणि परवान्याशी संबंधित फक्त एक दस्तऐवज नोंदवण्यात आला होता आणि 424 रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले होते. एप्रिलमध्ये 27 कागदपत्रांच्या नोंदणीतून 43 हजार 547 रुपयांचा महसूल मिळाला होता. आता पुन्हा कागदपत्रांची नोंदणी सुरू झाली असून, राज्याला चांगला महसूल मिळेल, अशी आशा असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

येथे पुन्हा कामकाज
मुंबई शहर- 1, मुंबई शहर- 2, अंधेरी- 2, अंधेरी- 3, अंधेरी- 4, बोरिवली- 7, कुर्ला- 4 ही दस्तनोंदणी कार्यालये सुरू झाली आहेत. त्याचप्रमाणे मुंबई शहर व मुंबई उपनगर विवाह नोंदणी कार्यालयांचेही कामकाज सुरू झाले आहे. ही कार्यालये सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली राहतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News