'ऑनलाईन माझं थिएटर' माध्यमातून कलाकार रसिकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 June 2020
  • हा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 यावेळेत होणार​

मुंबई : लॉकडाऊनमुळे बंद असलेली नाट्यगृहे पुन्हा कधी सुरू होतील, याबद्दल सांगता येत नाही. घरात बसलो म्हणून का हो, अडतंय आमचं खेटर.., अभिव्यक्त होण्यासाठी आता 'ऑनलाईन माझं थिएटर' असे म्हणत 'सुबक' आणि 'वाईडविंग्स' यांच्या संयुक्त विद्यमाने कलाकारांसाठी नवे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे.

'ऑनलाईन माझं थिएटर'मध्ये 20 कलाकार असून या कलाकारांच्या चार टीम तयार केल्या आहेत. झूम ऍपच्या माध्यमातून हे कलाकार लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहेत. हा कार्यक्रम शनिवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 यावेळेत होणार असून ते पाहण्यासाठी रसिकांना तिकिट बुकींग करावं लागेल. अभिनेते सुनील बर्वे आणि वाईडविंग्सचे पोर्णिमा मनोहर आणि ऋषी मनोहर यांच्या संकल्पनेतून 'ऑनलाईन माझं थिएटर' ही संकल्पना पुढे आली. नवीन पिढीला अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देण्यात यावे, लॉकडाऊनमध्ये ते व्यासपीठ कसं उपलब्ध करून देता येईल, याचा विचार सातत्याने सुरू होता. मग ही संकल्पना सूचली. लॉकडाऊनमुळे कंटाळालेल्या कलाकारांना नवीन ऊर्जा निर्माण होईल, या उद्देशाने या उपक्रमाची आखणी केली. कलाकारांकडून लगेचच प्रतिसाद मिळाला ते कामालाही लागले, असे सुनील बर्वे यांनी सांगितले. या स्पर्धेत अंतिम फेरीत दोन टीम जातील. विजेत्या टीमला 1 लाखाचे तर उपविजेत्या टीमला 75 हजार रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच प्रेक्षक पसंती असे विशेष पारितोषिक असणार आहे.

कार्यक्रमाचे स्वरूप स्पर्धात्मक

ऑनलाईन माझं थिएटर कार्यक्रमाचे स्वरुप स्पर्धेचे आहे. 20 कलाकार असून त्यांच्या चार टीम आहे. प्रत्येक टीममध्ये एक कॅप्टन आहे. शनिवारी-रविवारी हा कार्यक्रम सादर होईल त्यामध्ये दोन टीम एकमेकांविरूद्ध परफॉर्मन्स देतील. टीमला एक आठवड्यापूर्वी विषय देण्यात येईल, त्यावर त्यांनी सादरीकरण करायचे आहे.

चार जुलैपासून कार्यक्रमाला सुरवात

एका टीम एक एक कलाकार दुसऱ्या प्रतिस्पर्धी टीमच्या कलाकाराशी चार मिनिटेच परफॉर्मन्स करेल. त्यांचे गुणांकन केले जाईल. यासाठी तीन परिक्षक आहेत. सादरीकरण प्रत्येकाचे असले तरी गुण टीमला देण्यात येणार आहेत. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री वंदना गुप्ते आणि अश्विनी भावे परीक्षक म्हणून काम पाहतील. 4 जुलैपासून कार्यक्रम सुरू होईल.

कार्यक्रमासाठी तिकिट बुक करणे अनिवार्य

हा कार्यक्रम झूम ऍपवर सादर करण्यात येईल. कलाकारसुद्धा झूम ऍपच्या माध्यमातून रसिकांसमोर कला सादर करतील. अभिनय, वाचिक अभिनय, गाणे, नृत्य, कविता, स्वतःचे लेखन, मुक अभिनय, स्टॅण्डअप अशा विविध कलेच्या माध्यमातून या स्पर्धेत कलाकार सादरीकरण करणार आहेत. हा कार्यक्रम पाहण्यासाठी रसिकांना तिकिट बुक करावे लागेल. परदेशातील रसिकांनाही हा कार्यक्रम पाहता येईल. तिकिटाच्या लिंक लवकरच देण्यात येतील.

स्पर्धेतील टीस अशा

मिलिंद फाटक यांच्या टीमचे नाव 'घेऊन टाक' असून भार्गवी चिरमुले, नंदिता धुरी, शुभंकर तावडे, ऋतुराज शिंदे या कलाकारांचा समावेश आहे. संकर्षण कऱ्हाडे याच्या टीमचे नाव 'दोन फुल्या तीन बदाम' असून त्यात मयुरी वाघ, गौरी नलावडे, आरोह वेलणकर हे कलाकार आहेत. 'वल्लीS' हे रसिका आगाशे हिच्या टीमचे नाव असून हेमांगी कवी, नेहा शितोळे, विकास पाटील, आशुतोष गोखले या कलाकांराचा त्यात सहभाग आहे. 'मसाला पान' संदीप पाठक याची टीम असून सुनील अभ्यंकर, प्रिया मराठे, आरती मोरे आणि नचिकेत देवस्थळी या कलाकारांचा समावेश आहे.

ऑनलाईन माझं थिएटर या माझ्या नव्या उपक्रमातून कोणतेही जुने किंवा नवीन नाटक दाखवण्यात येणार नाही. मी नाट्यकलेचा भोक्ता आहे. त्यामुळे नाट्यकलेला कोणताही धक्का बसणार नाही. केवळ कलाकारांना अभिव्यक्त होण्यासाठी हे व्यासपीठ निर्माण केले आहे. मला प्रयोगशील राहायला आवडते. त्यातून ही संकल्पना आली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही संकल्पना प्रत्यक्षात आकाराला येत आहे.

- सुनील बर्वे, अभिनेता

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News