सर्व काही '5G'साठी - भाग १
व्हर्च्युअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार प्रत्यक्षात येणार तरी आहेत का?
- सागर नांगरे
लेखक हे टेक्नाॅलाॅजी ब्लाॅगर आहेत
व्हर्च्यअल रिअॅलिटी, आॅटोमेटेड कार या स्वप्नवत वाटणाऱ्या (निदान भारतात तरी) गोष्टी खरंच प्रत्यक्षात येणार आहेत का? हा प्रश्न पडण्यामागची कारणंही तशीच आहेत. गेली कित्येक वर्ष याबद्दलची माहिती इंटरनेटवर आपण वाचत आहोत. असं होईल, तसं होईल वगैरे वगैरे गप्पा हाणतोय, पण ते अॅक्च्युअली होणार कधी हे कोणीच सांगत नाही... पण आता हे सगळं रिअल लाईफमध्ये येण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. कारण ५जी तंत्रज्ञान आता आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे.
सप्टेंबर २०१६ मध्ये रिलायन्सने ‘जिओ’ च्या रूपाने टेलिकॉम नेटवर्क क्षेत्रामध्ये उडी घेतली. सर्वात स्वस्त काॅलिंग रेट असलेले नेटवर्क असल्यामुळे बहुतांश लोकांनी त्याचे सिमकार्ड खरेदी केले आणि वापरले. आज २०२० मध्ये सर्वात जास्त सब्स्क्राईबर्स असलेले मोबाईल नेटवर्क म्हणून जिओला ओळखले जाते. पण खरं तर हा मोठ्या गेममधला केवळ एक भाग झाला. मूळ उद्देश हा सबस्क्राईबर मिळविण्यापलीकडचा आहे. जिओ प्रमाणेच अमेरिका आणि ब्रिटन मध्ये एटी अँड टी, व्हेरिझाॅन, एरिक्सन आणि टी-मोबाईल या टेलिकॉम कंपन्यामध्ये टेलिकॉम इंटरनेटचे ५जी तंत्रज्ञान विकसित करून लवकरात लवकर बाजारात आणण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.
५जी तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य हे डेटा ट्रान्सफर होण्यासाठी low latency (म्हणजेच कमी विलंब) आणि high bandwidth (म्हणजेच माहिती ट्रान्सफर करायची जास्त क्षमता) हे आहे. या मुळेच ५जी नेटवर्कचे युझर्स अधिक वेगाने इंटरनेट वरील अँप्लिकेशन्स आणि निगडित सर्विसेस अगदी 'रिअल टाईम'मध्ये वापरू शकतील. याचाच अर्थ व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि आॅगमेंटेड रिअॅलिटीचा प्रत्यक्षात वापर सुरु होईल. त्यामुळे साहजिकच या ५जी नेटवर्कमुळे आॅटोमेटेड कार दिसू लागतील. इंटरनेटशी निगडित जे काही तंत्रज्ञान आतापर्यंत विकसित झाले आहे त्याच्या वापराला चालना मिळेल.
आता तुम्हाला वाटेल की ५जी अगोदर असलेले ४जी किंवा जुन्या नेटवर्कमध्ये हे शक्य का नव्हते? हा फरक लक्षात घेण्याजाेगा आहे कारण त्याशिवाय या कंपन्यामध्ये सुरू असलेली चढाओढ आपल्याला समजणार नाही. ५जी नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात असलेला नेटवर्क हार्डवेअरचा भाग हा सॉफ्टवेअर मध्ये रूपांतरित झाला आहे. याचे दोन फायदे झाले. एक म्हणजे नवीन सर्व्हिस बाजारात आणण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना आता प्रत्येक नेटवर्क हब ला जाऊन काॅन्फिग्युरेशन (configuration) टाळता येईल. सॉफ्टवेअर काॅन्फिग्युरेशनचे एकाच डेटा सेंटर मधून व्यवस्थापन करता येणे शक्य आहे. दुसरे म्हणजे नेटवर्क हार्डवेअर खूप प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे जी काही उपकरणे वापरात येत आहेत ते टेलिकॉम कंपन्यांना अत्याधुनिक आणि डेटा ट्रान्सफरला गती देणारी अशी खरेदी करून वापरता येऊ लागली आहेत.
लेखाच्या पुढच्या भागात आपण ५जीच्या साॅफ्टवेअरमध्ये कोणत्या प्रणालीचा (programming languages) वापर केला जात आहे ते जाणून घेऊ... आणि साहजिकच त्यातून आपल्याला लक्षात येईल की संगणक क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रणाली शिकून घेतल्या पाहिजे.