विदर्भाच्या विजयाची दोरी आता गोलंदाजांवर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

निर्णायक स्थितीत असलेल्या या सामन्यात गुजरातला विजयासाठी आणखी १७० धावांची गरज असून, सात गडी शिल्लक आहेत.

नागपूर :  गुजरातविरुद्ध सुरू असलेल्या २३ वर्षांखालील मुलांच्या कर्नल सी. के. नायडू करंडक उपांत्यपूर्व सामन्यात पहिल्या डावात ४५ धावांची आघाडी घेणाऱ्या विदर्भाची दुसऱ्या डावात दाणादाण उडाली. मात्र, त्यानंतर गोलंदाजांनी गुजरातला तीन जबर धक्‍के देत सामन्याला कलाटणी दिली. निर्णायक स्थितीत असलेल्या या सामन्यात गुजरातला विजयासाठी आणखी १७० धावांची गरज असून, सात गडी शिल्लक आहेत. त्यामुळे आता शेवटच्या दिवशी विदर्भाच्या विजयाची भिस्त गोलंदाजांवर राहणार आहे.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर सुरू असलेल्या लढतीत विदर्भाने पहिल्या डावात ४५ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. परंतु, त्यानंतर गुजरातच्या अचूक माऱ्यापुढे विदर्भाचा दुसरा डाव अवघ्या १६६ धावांत संपुष्टात आला. यश राठोडने पाच चौकार व एका षट्‌कारासह ४६ आणि फॉर्ममध्ये असलेल्या अष्टपैलू हर्ष दुबेने पाच चौकारांसह ३९ धावा काढल्या. विदर्भाला कमी धावांवर रोखण्यात जयवीर सिन्ह व उमंग तांडेलचा मोलाचा वाटा राहिला.

विजयासाठी २१२ धावांचा पाठलाग करताना गुजरातचीही सुरुवात अडखळीत झाली. तिसऱ्या दिवसअखेरीस त्यांनी केवळ ४२ धावांमध्ये तीन महत्त्वपूर्ण फलंदाज गमावले. त्यामुळे विजयासाठी आता शेवटच्या दिवशी काट्याची लढत होणार आहे.  त्याअगोदर, ७ बाद २२४ धावांवरून डावाला प्रारंभ करणाऱ्या गुजरातचा पहिला डाव अवघ्या २८२ धावांत आटोपला.शतकवीर उर्विल पटेलने आठ चौकार व चार षट्‌कारांसह १०१ धावा काढून गुजरातला तीनशेच्या जवळपास पोहोचविले. विदर्भाला आघाडी मिळवून देण्यात फिरकीपटू हर्ष दुबे, आदित्य ठाकरे व यश कदमचे उल्लेखनीन योगदान राहिले.

संक्षिप्त धावफलक
विदर्भ पहिला डाव : ३२७. गुजरात पहिला डाव : ९६.५ षट्‌कांत सर्वबाद २८२ (उर्विल पटेल १०१, राहुल शाह ६४, विशाल जैस्वाल ३९, उमंग तांडेल २३, के. पटेल १९, हर्ष दुबे ३-८८, आदित्य ठाकरे २-६२, यश कदम २-३५, मोहित राऊत १-१८). विदर्भ दुसरा डाव : ४८.५ षट्‌कांत सर्वबाद १६६ (यश राठोड ४६, हर्ष दुबे ३९, सिद्धेश वाठ २६, मोहित राऊत २२, जयवीर सिन्ह ३-४२, उंमग तांडेल ३-४२, विशाल जैस्वाल २-३९, के. आर. पटेल २-२९). गुजरात दुसरा डाव : १६ षटकांत ३ बाद ४२ (एस. चौहान २१, राहुल शाह खेळत आहे १०, मोहित राऊत २-६, गौरव ढोबळे १-१०).

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News