माझं नाव विक्रम रमेश शिंदे; पण मला विकी नावानं अख्ख्या मुंबईत ओळखलं जातं. तसंच वरळीत जर का कोणाला माझा पत्ता विचारला, तर ती व्यक्ती घरापर्यंत सोडू शकते, इतका मला विश्वास आहे. वरळीत खूप आणि मुंबईत माझ्यावरती प्रेम करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आहेत. जन्मापासून अनेक संकटांना सामोरं गेल्यानंतरही संकटं संपत नाहीत आणि मी काही केल्यानं शांत राहत नाही. वडील मिल कामगार असल्यामुळे शेजारी वरळी परिसरात राहायला. वरळी परिसरात पूर्वी मिल कामगारांचे अनेक संसार चालू होते. त्यातच माझा जन्म झाला. माझा जन्म झाल्यानंतर वडिलांनी मिल्ट्री जॉईन केली. वडील मिल्ट्रीत असल्यामुळे घरी आई, आज्जीनं मोठ्या लाडात वाढवलं. पहिली ते तिसरीपर्यंतची माझी शाळा घरी आत्या असल्यामुळे इंग्लिश मीडियममध्ये झाली. मात्र, आत्त्याचं लग्न झाल्यानंतर पुन्हा मराठी शाळेत जाण्याची वेळ माझ्यावर आली. वरळीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये तेव्हा माझे मुलींसारखे हावभाव पाहून मला शाळेतील मुलं चिडवायला लागली. तेव्हा लहान असताना मनात प्रश्न पडायचा की, मुलगा म्हणून जन्माला आलो, पण मुलींची फिलिंग शरीरात कशी काय? त्यामुळे मुलींसोबत दोस्ती करून मुलींसोबत राहू लागलो. वय वाढू लागलं तसं शिक्षणही सुरू होतं. तेव्हा शाळेतली मुलं बायला म्हणून मला चिडवू लागली. साधारण दहावी झाल्यानंतर मनातल्या प्रश्नांनी घर केलं होतं. त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नव्हती. त्या वेळी एकटं राहणं, कोणाशी न बोलणं, मुलं मला पाहून गाणी गायची, तर शिट्या वाजवायची... हा सगळा प्रकार सुरू असताना घरात मी सगळा प्रकार सांगितला आणि घरी एक प्रकारे वादळ आलं असं विकीनं सांगितलं
आणि घरचे म्हणाले तू निघून जा..
त्यावेळी बाबांनी मारलं, आईनं मारलं, घरी एकटा जेवण बनवू लागलो, आता मी हिजडा म्हणून काय करू? कोण मला नोकरी देईल. या भीतीनं डान्स, पेटिंग, रांगोळी, शिवणकाम विकीनं शिकून घेतलं. आज त्याचा विकीला फायदा होतोय. विकी म्हाडामध्ये दहावीच्या बेसवर शिपाई म्हणून नोकरीला लागला होता. तिथे मविकीला पुरुषी कपड्यांत नीट राहता येत नव्हतं. म्हणून तिथली सरकारी नोकरी त्याने सोडली. विकीच्या अशा बायल्या वागण्यानं घरचे वैतागले होते. घरात रोज विकीवरून भांडणं व्हायची, त्यात विकीचे बाबा मिल्ट्रीतून घरी परत आले होते. बाबांना त्यांच्या मित्रांकडून विकीच्या सगळ्या कृत्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ते आईला रोज मारहाण करू लागले. तुझ्या लाडामुळे बिघडला आहे तो, मी बाहेर असताना लक्ष ठेवलं नाहीस तू. अशा कारणांमुळे घरात राडा व्हायला लागला. आज्जीनं समजून सांगितलं; पण बाबा काही ऐकत नव्हते. शेवटी विकीला तू आमच्या घरातून निघून जा, असं मला सांगितलं. त्यानंतर पवईला मामीकडे राहायला गेला.
तिथे खऱ्या अर्थानं विकीच्या नव्या आयुष्याला कलाटणी मिळाली. कारण- तिथं गेल्यावर मेकअप, डान्स करणं या गोष्टी करण्यास वाव मिळाला. डान्स इतका उत्तम होऊ लागला की, लावणीचे शो रत्नागिरी आणि पुण्याला विकी करू लागलो. पेपरमध्ये बातम्या छापून आल्या की, एक तरुण लावणीमधून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करताय. तो पेपर बाबांनी आईला दाखवला. त्यानंतर विकीला आज्जीनं घरी आणलं. विकीला परिसरात हनुमान जयंतीच्या निमित्तानं एकदा साधारण दोन हजार लोकांसमोर डान्स केला होता. त्यानंतर विकीला एक गुरू मिळाला...आणि विकीच्या आयुष्यानं पुन्हा एकदा वेगळं वळण घेतलं. (हा सर्व प्रकार सुरू असताना घरच्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण विकी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. शेवटी विकीला जे करायचं होतं, ते केलं)
त्यानंतर विकीच्या भावानं लव्ह मॅरेज केलं होतं. त्याचं लग्न विकीनं स्वत: पुढाकार घेऊन आमच्या पद्धतीनं लावून दिलं. लग्नाला सगळ्या नातेवाईक मंडळींना बोलावलं होतं. त्यामुळे विकी हिजडा म्हणून आयुष्य जगतोय हे सगळ्यांना माहीत झालं. वर्षभरात बहिणीनंही लव्ह मॅरेज केलं. दोन लग्न झाल्यामुळे विकीच्या अंगावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला. महिन्याला पैसे जमवून विकी हप्ता फेडू लागला. सांताक्रूझ परिसरात हिंडून विकीने दिवसभर भीक मागितली आणि एल्फिन्स्टन स्थानकात पोहोचला, तर खिशात दोन रुपये होते. खूप रडून झाल्यानंतर विकी आत्महत्या करणार होता; पण आईबाबांचा चेहरा समोर आला आणि विकी जागच्या जागीच थांबला. काही महिन्यांत विकीच्या बहिणीच्या सासरी मोठ्या प्रमाणात वाद झाला आणि बहीण घरी आली ती कायमची... कारण सासरच्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली आणि विकीच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावेळी विकीला ह्युमन राईटस् या संस्थेनं खूप मदत केली आणि त्याच संस्थेत विकीला रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी लागली. हे करत असताना विकीनं शिवशक्ती फाऊंडेशन्सची स्थापना केली, त्या माध्यमातून ओळखीच्या जीवावर तृतीयपंथीयांना चांगले प्लॅटफॉर्म देतोय आणि देणार असं विकीनं सांगितलं.
एखाद्या घरात तृतीयपंथी जन्माला आल्यानंतर त्याच्या आईवडिलांना तात्काळ समजत नाही की, तो तृतीयपंथी आहे. वयाच्या एका टप्प्यावर तो कायतरी वेगळं मानवनिर्मित प्रोडक्ट असल्याचं त्याला स्वत: ला जाणवू लागतं. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेली व्यक्ती दोन वर्षे घरात तशीच रखडून काढते. एका कालावधीनंतर त्याला त्यांच्या घरात सांगावसं वाटतं. परंतु त्यावेळी तो फक्त त्याचा आईवडिलांच्या कानावर घालतो. ज्यावेळी त्याच्या आईवडिलांना हे सगळं समजतं. त्यावेळी ब-याचदा ते डॉक्टरांकडे किंवा मांत्रिक असे मार्ग निवडतात. परंतु त्याच्या मानसिकतेला आणि भावनेला कोणीही समजून घेत नाही. मग त्याला काही दिवसांनी घरातून बाहेर हाकललं जात. अशा एकलतृतीयपंथीयांना मदत व्हावी म्हणून विकीनं शिवशक्ती फाऊंडेशन्सची स्थापना केली आहे.
आत्तापर्यंत विकीनं अनेक केस हाताळल्या, पण काही केस सारख्या होत्या. तर काही केस इतक्या अजब होत्या की आम्ही त्या व्यक्तीला सांभाळ करणा-या संस्थेच्या ताब्यात दिलं आहे. कारण तुमच्या घरात तुम्ही तृतीयपंथी असल्याचं समजलं की समाजाला लाजून काही आईवडिल घरातून बाहेर काढलं जातं मग आम्ही त्याला योग्य असा आसरा मिळवून देतो. तसेच अनेक तृतीयपंथीयांवर समाज किंवा घरच्यांकडून अत्याचार केला जातो. असं प्रकरण आम्ही आमच्या पध्दतीनं कोर्टात दाखल करून त्याला न्याय मिळवून देतो असं विकीनं सांगितलं.
विकी सध्या राजभरात काम करत आहे, अनेकदा संस्थेच्या माध्यमातून देशभरात कामानिमित्त जावं लागतं. तर तिथ गेल्यानंतर आम्हाला एखादं प्रकऱण नव्याने सांगितलं जातं. ज्याचे आईवडिल चांगले शिकलेले आहेत, तसेच समजदार आहेत ते आपल्या पाल्याला समजून घेतात. तर काही शिकलेले लोकं सुध्दा टाळत असतात कारण समाज आपल्याला काय म्हणेल. कारण इतकचं असतं. पण हे मानवनिर्मित आहे. ते तुमच्याकडूनचं जन्माला आलेलं मुल आहे त्याला तुम्हीचं समजून घेतलं पाहिजे. समजून घेत नसाल तर अत्याचार तरी करू नका असंही विकीनं सांगितलं.
अनेक तृतीयपंथी व्यवसाय, ड्रायव्हर, वकील, राजकारण अशा क्षेत्रात असल्याचे पाहतोय, त्यामुळे माझ्यासारख्या काम करणा-या देशभरातील असंख्य नागरिकांना समाधान वाटतं. कारण निर्सगाने जसं आम्हाला स्विकारलं आहे, तसं मानवाने सुध्दा स्विकारायला हवं - विकी शिंदे
विकी शिंदे सारखी अनेक तृतीयपंथी माझ्या संपर्कात आहेत. समाजाचं आपण देणं लागतो. या हेतूने काम करत आहेत. त्यांना काहीवेळा यश येतं, तर काहीवेळा संघर्ष कारावा लागतो. विकीनं केलेलं आत्तापर्यंतचं काम कौतुकास्पद आहे. - रेणुका कड, समाजसेविका