वहीनींचा जलवा अन् बावळ्यांचा कालवा! वहिणी होऊ द्या अजून एक गाणं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

जाऊ द्या वहिनी, लोकं काही केलं तरी टिका करतात, त्यांनी कधी तुमच्या टॅलेंटला दाद दिली नाही.
म्हणुन वहिनी तुम्ही मागे हटू नका.
आता होऊ द्या खर्च !!
आम्ही तुमच्या पुढच्या गाण्याची वाट बघतोय.
- चांगदेव गिते

ह्या फोटोवरून मुख्यमंत्र्यांच्या 'सौंना" लोकं पुन्हा ट्रोल करत सुटली आहेत. खरं तर काही लोकांना सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या खाजगी जीवनात ढवळा-ढवळ करण्याची घाण सवय असते. आता तर सोशल मीडिया असल्याने त्यांना आयतंच कोलीत मिळालं आहे.

अहो !! माणसाची खाजगी अन सार्वजनिक लाईफ वेगळी असते अन त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आपण आदरच केला पाहिजे.

खरं तर त्या पदावर असणारी लोकं टीका करणाऱ्या लोकांपेक्षा दहा पट अधिक काम करत असतात. सतत त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा कधीतरी त्यांचं आयुष्य जवळुन बघा. "वरून सोनेरी दिसणाऱ्या खुर्च्या बऱ्याचदा आतुन काटेरी असतात". 

इथं आदल्या दिवशी एखाद्या लग्नाला गेलो तर दुसऱ्या दिवशी ऑफिसला सुट्टी मारणारे आपण लोकं...

त्यांच्यावर नेहमी सडकून टीका करतो. कधी एखाद्या आमदारा-खासदाराचं आयुष्य जगुन पहा, त्यांच्या एवढा प्रवास रोज केला तर आपल्या बुडाला घट्टे पडतील अन मणक्याचा खुळ-खुळा होईल.

सोप्पं नसतं दिवसभर शंभर लोकांचं ऐकुन घेणं, दोनशे फोन उचलणं, पाचशे किलोमीटर प्रवास करणं, हजार लोकांचं मन सांभाळणं, इथं "अर्ध्या गावाशी आपलं जमत नसलं तरी आपला नेता प्रेमळ असावा" अशी आपली भावना असते.

आपल्यापेक्षा कैकपट गोष्टी त्यांना सांभाळाव्या लागतात, बऱ्याचदा जेवण अन झोप पण गाडीतच करावी लागते. मी स्वतः काही आमदार-खासदार असे पाहिलेत की ते दुपारचं जेवण संध्याकाळी करतात, रात्री दोन-तीन वाजता झोपतात. परत सकाळी कामाला लागतात.

आता समजा वर्षात एखाद्याला जर हजार ठिकाणी बोलावं लागत असेल, जावं लागत असेल तर साहजिक एखाद्या दुसऱ्या वेळी एखादा दुसरा शब्द इकडं तिकडं होतोच. कधी-कधी एखाद्या फोटोला हार घालताना ते चप्पल काढायची विसरतात, कधी एखादं ट्विट चुकीचं होतं. 

अहो !! आपण पारावर, घरात, ऑफिसात बोलताना घसरतो राव, त्यांना तर हजारो लोकांत बोलावं लागतं. चुकलं काही एखाद्या वेळी तर सोडुन दिलं पाहिजे आपण ??

हल्ली सोशल मीडियावर काही ही आलं की ढकल पुढं चाललंय..., 
मग ते खरं की खोटं, त्याच्या मागचा हेतु चांगला की वाईट, कोणी पाहत नाही.

आता आपण सगळे गोव्याला, इकडं-तिकडं फिरायला जातो, दारू-सिगारेट पितो, बायको सोबत सेल्फी काढतो मग त्यांनी केलं तर काय बिघडतं ??

हजारो माणसांच्या गर्दीत त्यांच्याकडून चुकुन कोणाचा तरी हात हातात आला, इकडं-तिकडं हात लागला, नकळत कुठे स्पर्श झाला तरी सतराशे साठ ग्रुप वर फोटो पाठवणारे आपणच लोकं आहोत. इतकंच काय व्यासपीठावर बसल्यावर त्यांनी जांभई देऊ नये, रिलॅक्स बसु नये, मिनिटभर पण डोळे झाकु नयेत असे काही नियम आहेत का कायद्यात. 

आता चार-चार तास एकाच जाग्यावर नेहमी-नेहमी बसावं लागत असेल तर थोडं फार बोर होणारच, डोळे झाकणारच की राव !!

दिवसा ऑफीस मध्ये झोपणारे लोकं सुद्धा त्यांना सल्ले देतात तेव्हा हसायला येतं. त्यातल्या त्यात एखादी महिला असेल तर तिने कसे कपडे घालावेत, काय खावं, कसं रहावं हे ठरवणारे आपण कोण ??

मागील काही दिवसापासुन कपड्या वरून, गाण्यावरून मुख्यमंत्री साहेबांच्या पत्नीला ट्रोल करणारे, शेरेबाजी करणारे पाहिले प्रश्न पडतो ? त्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्या तरी त्यांना खाजगी आयुष्य आहे. ते त्या कसंही जगातील आपल्याला काय त्याच्याशी काय करायचंय !! 

त्या सार्वजनिक जीवनात जास्त सक्रिय ही नाहीत, एका खाजगी बँकेत नौकरी करतात. आता बरं,, नवरा मुख्यमंत्री असल्याने त्यांना कशाचा थोडाफार फायदा होत असेल तर त्यात एवढं गैर काय ?

आपण समजा एखाद्या ऑफिसात काम करतोय तर आपणही आपल्या नातेवाईक, कुटुंबाला त्या ऑफिसचा काही फायदा होत असला तर देतोच की, किंवा नाही दिला तरी तो कळत नकळत होतंच असतो. 

एखाद्या हॉटेलचा वेटर ओळखीचा असला तरी एक-दोन रोट्या फुकट, लवकर मिळाव्यात असं वाटतचं की अनेकांना. पंगतीत मटण वाढायला ओळखीचा दिसला तरी दोन पीस जास्त टाक म्हणतो आपण.

आता एवढ्या मोठ्या राज्यात वर्षाच्या बाराही महिने दररोज कुठं ना कुठं काहीतरी चांगल्या-वाईट घटना घडतच असतात, यमदेव जरी आला तरी त्या बंद होणार नाहीत.

मग आपण लगेच म्हणायचं का इकडं हे झालं आहे मग त्यांनी तिकडं ते करू नये, फिरू नये, वर्षांतुन एक पण सुट्टी घेऊ नये, तोकडे कपडे घालु नये.

सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या वयक्तिक जीवनात ढवळाढवळ करण्याचा, त्यांच्या घरात डोकावण्याचा आपल्याला काहीही हक्क नाही.  हा आपण त्यांना फक्त सार्वजनिक कामाबद्दलच जबाबदार धरलंच पाहिजे, विचारलं पाहीजे.

उदाहरण म्हणुन सांगतो, 
एकीकडे घराणेशाही वाढली म्हणुन आपणच बोंबा मारायच्या पण आपण हा विचार कधी करणार की आपणच त्यांना निवडून दिलंय.  घराणेशाही वाढली तर पाडा ना त्यांना, आपल्या हातात अधिकार आहे तो.

आता लोकांनी सुद्धा असं दुट्टपी वागणं सोडलं पाहिजे. समजा एखादा नेता खुप शांत, संयमी, नम्र, निर्व्यसनी आहे पण प्रचंड भ्रष्टाचार करतो तर तो आपल्या काय कामाचा ! याऊलट एखादा दारू पितो, नाचतो, गातो पण प्रचंड सक्रिय आहे, काम करतो, भ्रष्टाचार करत नाही तर तो कधीही ही चांगलाच की त्यामुळे सार्वजनिक जीवनात असणाऱ्या लोकांच्या घरात-दारात, मागं-पुढं, खाली-वर कॅमेरे, रेकॉर्डडर बसवुन त्यांच्या कॅरेक्टर चे मापदंड ठरवायला नाहीत पाहिजे तेही आपल्या सारखेच हाडा-मासाचे माणसंच आहेत, त्यांना ही भाव-भावना आहेत.

बरं !! कधी टिका करायची जरी झाली तरी भाषा/पातळी योग्य असायला पाहिजे.
जाऊ द्या वहिनी, लोकं काही केलं तरी टिका करतात, त्यांनी कधी तुमच्या टॅलेंटला दाद दिली नाही.
म्हणुन वहिनी तुम्ही मागे हटू नका.
आता होऊ द्या खर्च !!
आम्ही तुमच्या पुढच्या गाण्याची वाट बघतोय.
- चांगदेव गिते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News