"आमचा छोट्या ना, मोबाईलमध्ये एक्सपर्ट आहे. तुम्ही त्याला काहीही सांगा, लगेच शोधून देणार, अहो आम्हांला जे जमत नाही ते त्याला लगेच जमते. अहो अँप तर लगेचच डाऊनलोड करुन देतो" एका मित्राच्या घरी एका कामानिमित्ताने जाणे झाले. त्यावेळी त्याची पत्नी आपल्या मुलाचे कौतुक आम्हांला सांगत होती.
मुलगा छोटाच पाच- सहा वर्षांचा. मोबाईल सतत त्याच्या सोबतच. त्या हे पण सांगत होत्या "हा लहान असताना याला सांभाळायला कोणीच नसायचे, मग मी घरातील काम करताना याच्या हातात खेळायला मोबाईल द्यायची. मग माझे काम होईपर्यंत मला टेन्शन नसायचे. हे पण सकाळी लवकर आवरुन कामाला जायचे. संध्याकाळी घरी आल्यावर हे टिव्ही पाहण्यात दंग असायचे. त्यामुळे मोबाईलच त्याचा मित्र झाला आहे.
"पण आज आम्हांला मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. मोबाईल मुळे हा एकलकोंडा झाला आहे. त्याचा स्वभाव हट्टी व चिडचिडा झाला आहे. आमचे कोणाचेही ऐकत नाही. मोठी राधिका तिची शाळा व अभ्यास यात ती गुरफटून जाते. ती पण याच्या कडे लक्ष देत नाही. आणि हो शाळेत पण त्याच्या बाईंनी बोलवून घेऊन त्याची तक्रार केली आहे. मला आता खूप पश्चाताप होत आहे. कसे होईल याचे? काळजी वाटते. काही तरी मार्ग सांगा.
आज बऱ्याच घरात ही समस्या निर्माण झाली आहे. लहान मुलांना सांभाळायला कोणी नसल्यामुळे आपण त्यांना मोबाईल खेळणे म्हणून देतो. त्यामुळे त्यांचे भावविश्व पूर्ण बदलते. लहान मुलांना त्यांच्या समवयस्क मुलांमध्ये हसण्या -खेळण्यात जो आनंद मिळतो. तो मोबाईलपासून मिळू शकत नाही. शेजारी असणाऱ्या लहान मुलांमध्ये खेळल्याने ही मुले नकळतपणे आपल्या भावना व्यक्त करतात. कृत्रिम वस्तूंपासून मिळणारा आनंद हा कृत्रिमच असतो. याचा आपण विचार करत नाही.
माझे काम होईपर्यंत याला कशात तरी गुंतवले पाहिजे. काम होईपर्यंत याचा मध्ये कोणताही अडथळा नको हा आपला उद्देश असतो. पण कालांतराने त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागतात. मोबाईलवेडाने तो कोणाशीही संवाद साधत नाही. शेजारच्या मुलांमध्ये खेळायला जात नाही. घरातील कोणाचेही ऐकत नाही. शाळेत, अभ्यासात त्याचे लक्ष लागत नाही. त्यावेळी मात्र आपण काळजीत पडतो. घाबरून जातो. काय करावे ते कळत नाही.
एक मोठी समस्या निर्माण होण्यास आपणच कारणीभूत असतो. आपल्या मुलामध्ये मोबाईल हताळण्याचे असणारे कौशल्य दुसऱ्यांना सांगताना आपल्याला अभिमान वाटतो. आनंद वाटतो. पण पुढे हेच कौशल्य संकट म्हणून आपल्या समोर उभे राहिल याचा आपण विचार केलेला नसतो. वेळ निघून गेलेली असते. त्यासाठी लहान मुलांचे संगोपन करताना खूप काळजीपूर्वक करावी. अन्यथा भविष्यात अशा समस्यांचा सामना करताना डोक्याला हात लावून बसण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.