"निसर्ग'ग्रस्त महाविद्यालयांना  तातडीने मदत देण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

कोकणातील निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 16 महाविद्यालयांना बसला.

मुंबई : कोकणातील निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 16 महाविद्यालयांना बसला. या वादळात महाविद्यालयांचे अतोनात नुकसान झाले. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयांना प्रशासनाने आश्‍वासन दिल्यानंतरही आपत्कालीन निधीतून मदत मिळालेली नाही, त्यामुळे विद्यापीठाला आपत्कालीन निधीचा विसर पडल्याचा आरोप सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला आहे. या महाविद्यालयांना तातडीने मदत देण्यासह इतर पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी तांबोळी यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या महिन्यात 3 जून रोजी कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला. वादळामुळे या परिसरातील 16 महाविद्यालयांचे अतोनात नुकसान झाले. या भागातील महाविद्यालयांचे नेमके किती नुकसान झाले आहे, याची पाहणी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विद्यापीठातील अधिकारी व प्राचार्यांनी एक विशेष दौरा केला. दौऱ्यादरम्यान महाविद्यालयांमधील संगणक, खुर्च्या, टेबल, फॅन यासह अनेक वस्तूंचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विद्यापीठाने मदत देण्याचे आश्‍वासन दिले, परंतु अद्यापही आपत्कालीन मदत देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलेला नाही. विद्यापीठाने या महाविद्यालयांना मदत देण्यासाठी समिती गठित केली, परंतु अद्याप हा निधी देण्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यातून समिती आणि विद्यापीठ प्रशासनाचा ढिसाळ कारभार उजेडात आला आहे. विद्यापीठाच्या नियमानुसार नवीन महाविद्यालय, तुकडी सुरू करताना महाविद्यालयांना बॅंकांमध्ये ठेवी ठेवणे बंधनकारक आहे. या रकमा ना महाविद्यालयास वापरता येतात ना विद्यापीठास. आपत्कालीन  परिस्थितीत हा निधी वापरता आल्यास याचा निदान काही सार्थ उपयोग तरी होईल, असेदेखील तांबोळी यांनी म्हटले आहे.

... तर निधीचा उपयोग काय?
विद्यापीठ गेल्या 10 वर्षांपासून दरवर्षी सुमारे सात लाख विद्यार्थ्यांकडून आपत्कालीन निधीसाठी प्रतिविद्यार्थी 10 रुपये; तर कुलगुरू निधीसाठी 20 रुपये जमा करत आहे. या निधीचा संकटकाळात वापर होत नसेल, तर या निधीचा उपयोग काय, असा प्रश्‍न सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला आहे.

चक्रीवादळात नुकसान झालेल्या महाविद्यालयांना मदत करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल व्यवस्थापन समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. त्यांनतर तातडीने या महाविद्यालयांना मदत देण्यात येईल.
- डॉ. विनोद पाटील, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News