शिक्षकांची अनोखी शक्कल; ऑनलाईन विद्यार्थ्यांचे आकलन तपासता येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 June 2020

ई-लर्निंगचा अवलंब करताना शिक्षक जे विद्यार्थ्यांना शिकवतायत, ते विद्यार्थ्यांना खरेच समजतेय का, किती प्रमाणात त्यांचे आकलन आहे, त्यांना पुन्हा पुन्हा तेच विषय शिकवावे लागतील का, असे अनेक प्रश्‍न शिक्षकांना पडत होते. पण टेस्टमॉझ आणि गुगल व्हॉईस टायपिंग या ऍपच्या सहकार्याने शाळेने पर्याय शोधला आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे सर्व शाळांमध्ये सध्या ई-लर्निंग, डिजिटल लर्निंगचा अवलंब करण्यात येत आहे. झूम ऍप किंवा गुगल मीटच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद होत आहे. विद्यार्थ्यांना व्हिडीओद्वारे शिकवल्या गेलेल्या विषयाचे नेमके किती आकलन झाले, याबाबत शंका व्यक्त होत असतानाच सायन येथील डी. एस. हायस्कूलने मात्र याबाबत टेस्टमॉझ आणि गुगल व्हॉईस टायपिंग यांच्या आधारे या शंकेवर उत्तर शोधले आहे.

डी. एस. हायस्कूल ही शाळा आपल्या नवनवीन अभिनव उपक्रम तसेच तंत्रस्नेही धोरणांसाठी ओळखली जाते. ई-लर्निंगचा अवलंब करताना शिक्षक जे विद्यार्थ्यांना शिकवतायत, ते विद्यार्थ्यांना खरेच समजतेय का, किती प्रमाणात त्यांचे आकलन आहे, त्यांना पुन्हा पुन्हा तेच विषय शिकवावे लागतील का, असे अनेक प्रश्‍न शिक्षकांना पडत होते. पण टेस्टमॉझ आणि गुगल व्हॉईस टायपिंग या ऍपच्या सहकार्याने शाळेने पर्याय शोधला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना डी. एस. हायस्कूलचे गणित-विज्ञानाचे शिक्षक डॉ. संजय मोहिते म्हणाले, टेस्टमॉझच्या साह्याने शाळेतील शिक्षकांनी लहान-लहान प्रश्‍नपत्रिका बनवल्या. व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना 40 मिनिटे शिकवल्यावर शिक्षक त्यांना वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्‍न सोडवायला देतात. जर विद्यार्थ्यांचा स्कोअर चांगला आला, तर त्यांना त्या विषयाचे आकलन झाले आहे, हे शिक्षकांना समजते.

की-बोर्ड शिकवण्यासाठी व्हिडीओ

मोबाईल किंवा संगणकावर प्रश्‍नपत्रिका सोडवणे हे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच सोपे असले तरी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. पण सुदैवाने "गुगल व्हॉईस टायपिंग' हे साधन आमच्या मदतीला धावून आले. या "डिक्‍टेशन टूल'चा वापर करून विद्यार्थी मराठीत बोलतात आणि गुगल ते टेक्‍स्टमध्ये रुपांतरित करते. याशिवाय, विद्यार्थ्यांना गुगल देवनागरी आणि गुगल इंडिक हे अत्यंत सोपे की-बोर्ड शिकवण्यासाठी आम्ही व्हिडीओ बनवले आहेत, असेही डॉ. मोहिते यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News