चिपळूणच्या वाशिष्ठी बॅकवॉटरची ही अनोखी सफर!

धीरज वाटेकर
Saturday, 4 May 2019

चिपळूणात ४ मे पासून वशिष्ठी खाडीत 'समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारी' सुरु होत आहे. त्याची माहिती देणारा विस्तृत लेख! 

मनसोक्त संचार करणाऱ्या मगरी पाहायच्यात ? केरळच्या बॅकवॉटरचा आनंद कोकणात मिळवायचा आहे? रम्य खाडी, संथ पाणी, किनाऱ्यावरची टिपिकल किनारवर्ती गावं, किनाऱ्याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता अनुभवायची असेल तर पर्यटकांसाठी चिपळूणमध्ये ‘वाशिष्ठी बॅकवॉटर’ हा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. वाशिष्ठी खाडीला निसर्गानं मुक्तहस्तानं सौंदर्य दिलं आहे. इतकी वर्षं हे सौंदर्य लोकांपुढे आलं नव्हतं. ‘ग्लोबल चिपळूण पर्यटन’ या चिपळूण पर्यटन विकासासाठी झटणाऱ्या संस्थेच्या सततच्या प्रयत्नाने आता येथे पर्यटकांची लगबग सुरू झाली आहे.

आपल्या देशात फक्त चेन्नईत क्रोकोडाईल पार्क आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मगरी पाहता येतात. ‘क्रोकोडाईल सफारी’चा वैविध्यपूर्ण अनुभव देणारा वाशिष्ठी बॅकवॉटर हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. ‘मगर’ चिपळूणच्या पर्यटन विकासाचे मुख्य आकर्षण ठरू शकते, याची जाणीव झालेल्या चिपळूणातील पर्यटनप्रेमींनी ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ संस्थेच्या माध्यमातून ‘क्रोकोडाईल सफारी’ उपक्रम सुरु केला आहे. आजतागायत इथल्या मगरींनी कोणावरही कधीही हल्ला केल्याचे वृत्त नाही. या मगरी ओहोटी दरम्यान वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर पहुडलेल्या सहज नजरेस पडतात. 

अगदी ८-१० फुटाच्या अंतरावरून त्या पाहण्याचा आनंदही घेता येतो. विशेष म्हणजे त्यांना खाडीतील नैसर्गिक वातावरणात पाहाता येते. मायबाप शासनाने, चेन्नईप्रमाणे येथेही ‘क्रोकोडाईल पार्क’ची शक्यता तपासण्याची तसेच या मगरींचा शास्त्रोक्त अभ्यास करण्याची नितांत गरज आहे. सध्या इथल्या मगरी या चिपळूण पर्यटन व्यवसायाला आकार देण्याचे काम करत आहेत हे नक्की ! वाशिष्ठीच्या बॅकवॉटरमध्ये दिवसभर क्रोकोडाईल टुरिझमचा आनंद मिळण्यासाठी ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेने पर्यटक बोटींची सुविधा निर्माण केली आहे. सन २०१४ पासून वर्षातून दोन वेळा नववर्ष स्वागत आणि उन्हाळी पर्यटन हंगामात सकाळी १० ते सायंकाळी ६ वा. या वेळेत हा पर्यटन उपक्रम आयोजित केला जात असून प्रतिवर्षी किमान सुमारे २५ हजार पर्यटकांची सतत उपस्थिती यास लाभते आहे. 

चिपळूणसह रत्नागिरी जिल्ह्यातील हिरवेगार निसर्गवैभव, इथल्या रमणीय खाड्या-सागरकिनारे, गड-किल्ले, प्राचीन मंदिरे यांसह चिपळूण परिसरातील वाशिष्टी खाडी, तिच्यातील छोटी-मोठी बेटे, सह्याद्रीच्या पर्वत रांगा, कोकणी खाद्यपदार्थ आणि येथील समृद्ध लोकजीवनाचा अनुभव पर्यटकांना मिळतो आहे. खाडीत साधारणत: पाण्याच्या ठिकाणी आढळणारे पक्षी दिसतातच, पण वूली नेक्ड स्टॉर्क, ओरिएंटल हनी बझार्ड, पफ थ्रोटेड बॅब्लर, लिटिल रिंग प्लोव्हर, युरेशियन कॉलर्ड डव्ह, प्लेन प्रिनिया, अॅशी प्रिनिया, लिटिल स्टिंट, मार्शलज आयोरा, कॉमन आयोरा, पाइड अॅव्होसेट, सिट्रिन वॅगटेल, युरेशियन स्पूनडिल, ब्लॅक हेडेड आयबीस, कॉमन रेडशॅक, चेंजेबल हॉक इगल, ब्राम्हिणी काईट, मोर, टेंटेड स्टॉर्क, जांभळी पाणकोंबडी, आयबीस, डार्टर, आल्बिनो किंगफिशर, हेरॉन आदि दुर्मीळ पक्ष्यांचं दर्शनही येथे होते. ‘क्रोकोडाईल सफारी’साठी सुशोभित आणि अद्ययावत बोटींची व्यवस्था करण्यात येते.

गेल्या मे २०१८ मध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबई-पुण्यातील साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत ‘समर बोटिंग आणि क्रोकोडाईल सफारी’चे उद्घाटनासाठी चिपळूणात आलेल्या नामवंत हास्यकवी अशोक नायगावकर यांनीही ‘वाशिष्ठी नदीतील पर्यटनाला अत्याधुनिक पातळीवर आणा’ असा सल्ला दिला होता. साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी मालदोलीचे संदेश आणि शैलेश संसारे, तुंबाडचे शैलेश वरवाटकर, हॉटेलियर रविकिरण जाधव यांनी खाडीत ‘क्रोकोडाईल सफारी’ची सुरुवात केली. त्यानंतर सन २०१० साली संपूर्ण कोकणात ‘क्रोकोडाईल टुरिझम’साठी ‘मालदोली (वाशिष्ठी) बॅकवॉटर’ हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा निर्वाळा आम्हीही रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासू तरुणांचे संघटन असलेल्या ‘झेप क्षितिजापलीकडे’ संस्थेच्या आनंदमेळ्यादरम्यान दिला होता.

वाशिष्ठी ही कोकणातली एक महत्त्वाची नदी आहे. तिची एकूण लांबी सुमारे ७० किलोमीटर आहे. ती पूर्णपणे रत्‍नागिरी जिल्ह्यातूनच वाहते. सह्याद्रीतल्या रत्नागिरी-सातारा जिल्हा सीमा जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात, घाटमाथ्यावरील झोका दगडाला लागून असलेल्या खोल दरीत तिचा उगम आहे. या उगमाचा शोध आम्ही नव्याने, नामवंत इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या ‘वाशिष्ठीच्या तीरावरून’ या संशोधित ग्रंथाच्या निर्मितीची गरज म्हणून सन २०१५ साली सहकारी मित्र वन्यजीव अभ्यासक सदफ कडवेकर आणि विलास महाडिक यांच्या साथीने घेतला होता. नैसर्गिकदृष्ट्या कोणत्याही नदीचे मुख हा एक अद्भुत जादुई प्रदेश ठरावा, वाशिष्ठीबाबतही तसेच आहे. 

आगामी काळात ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’च्या माध्यमातून ‘वाशिष्ठी सफर (परिक्रमा) -
उगम ते संगम’ हा चिपळूण पर्यटनातील महत्वकांक्षी उपक्रम पर्यटकांसाठी सुरु केला जाणार आहे. या प्रकल्पाची चाचणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. वाशिष्ठी नदी चिपळूण, खेड, गुहागर, दापोली तालुक्यांच्या सीमांतून वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते. खेडकडून येणारी जगबुडी ही वाशिष्ठीची प्रमुख उपनदी आहे. या वाशिष्ठीला नारिंगी, तांबी, धावती नदी, वैतरणा आणि शिवनदी येऊन मिळतात. कोयना अवजलमुळे वाशिष्ठी सदा भरलेली, वाहणारी असते. या वाशिष्ठीचे खोरे २२०० चौरस किलोमीटरचे आहे. अचाट वैविध्याची रेलचेल असलेल्या या खोऱ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी, बाव, तळी, पाणी वापराच्या इतर पारंपरिक पद्धती, झरे, धबधबे, छोटे ओहोळ, खारफुटीची जंगले, ससे, साळींदर, बिबटे, कोल्हे, रानगवे, अन्य प्राणीसंपदा असून ही सगळी वाशिष्ठीची जिवंत रूपे आहेत. 

फार पूर्वी शिवनदी हीच चिपळूणची जीवनवाहिनी होती. चिपळूण शहरातून वाहणाऱ्या शिवनदीचा उगम कामथे-कापसाळ परिसरात, डोंगरात होतो. शिवनदी शहराच्या मध्यभागातून वाहते. तिच्या प्रवाहामुळे शहराचे पूर्व आणि पश्‍चिम असे दोन भाग नैसर्गिकरीत्या निर्माण झाले आहेत. तिची शहरातली लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे. या नदीवर कामथे आणि फणसवाडी असे दोन बंधारे आहेत. शिवनदीपात्रातून चिपळूणमधील पागमळ्यापर्यंत पूर्वी लहान होड्यांचा प्रवास चाले. मालवाहू-प्रवासी गलबते गोवळकोट बंदरातून, वाशिष्ठी नदीमार्गे बाजारपूल, बंदरनाका परिसरात येत. तिथे गलबतातील माल हा लहान नावांत घालून शिवनदी पात्रातून पागमळा परिसरात चढ-उतारासाठी येत असे. वाशिष्ठीला कोयनेचे अवजल उपलब्ध झाल्यानंतर झपाट्याने शिवनदीचे महत्त्व कमी होऊन तिचे अस्तित्व कचरा, गाळ, दूषित सांडपाणी यांमुळे संपल्यात जमा आहे. 

शासनाने जलसंपदा खात्याचे निवृत्त सचिव म. दि. पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑक्टोबर २००५ रोजी या कोयनेच्या अवजलाचा वापर कशा प्रकारे करावा ? याबाबत उपाय सुचवण्यासाठी ५ सदस्यीय अभ्यास गटाची स्थापना केली होती. दिनांक २९ ऑगस्ट २००६ रोजी या समितीने राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला. या पाण्याच्या मदतीने कोकणातील सुमारे १,७०,५०५ एकर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते, असे पेंडसे समितीचा अहवाल सांगतो. सुमारे ४०० पानांचा हा अहवाल सन २०१३ सालापर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. 

राजकीय साठमारीत पेंडसे समितीचा अहवाल आजही इतर अनेक अहवालांप्रमाणे धूळ खात पडला आहे. संघर्षाची फार मानसिकता नसलेल्या इथल्या जनतेला, लोकप्रतिनिधींना या पाण्याच्या पुन:र्वापराद्वारे संपूर्ण कोकणची तहान भागवावी यासाठी आपण सर्वपक्षीय एकत्र यावे असे कधीही वाटलेले नाही. लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीचे रासायनिक प्रदूषण, सडणाऱ्या पाईपलाईन, जळणारी पिके, कमी होत गेलेली मस्यसंपदा, पशुपक्षी, मातांच्या दुधात मिळणारे अवजड धातूंचे अंश, बेकायदा वाळू उपसा इतके होऊनही वाशिष्ठी अजूनही संपलेली नाही. आजही वाशिष्ठीच्या खोऱ्यात वैविध्याची रेलचेल आहे.

अंजनवेलचा गोपाळगड किल्ला याच वाशिष्ठीच्या दाभोळ खाडीमुखावर वसलेला आहे. मराठी अमदानीत हे जिल्ह्याचे ठिकाण होतें. किल्ला तीन बाजूंनी समुद्रवेष्टित व चवथ्या बाजूस खंदक आहे. भोवतालचा तट जाड दगड व चुन्याचा २० फूट उंच, ८ फूट रुंद व चांगला भक्कम आहे. खंदक १८ फूट रुंद व बराच खोल आहे. किल्ल्याला दोन दरवाजे (एक पूर्वेस व एक पश्चिमेस) आहेत. अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड हे दोन वाशिष्ठीचे पहारेकरी आहेत. 

गोविंदगड किल्ला जंजिऱ्याच्या हब्शांनी बांधला. तो शिवाजी महाराजांनी १६७० साली जिंकून घेतला. एका छोट्या बेटावर वसलेल्या किल्ल्याचा परिसर २ एकर आहे. ह्या किल्ल्यात रेडजाई देवीचे मंदिर आहे. किल्ल्यावर पुरातन काळातील तोफा व पाण्याचा मोठा हौद असून ६ तोफांचे हल्लीच एकत्रित जतन केलेले पाहायला मिळते. मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची 'तुंबाडचे खोत' ही द्विखंडी कादंबरी याच खाडीच्या वातावरणात रमलेली आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा प्रदीर्घ कालखंड या कादंबरीचा गाभा आहे. 

चित्रविचित्र इतिहासांच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष, व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्‍या अनेक घटना, पुन्हा एक व्यक्ती दुसरी सारखी नाही. एकूण काळ सव्वाशे वर्षाचा असला तरी स्थळ मात्र एकच - तुंबाड आणि तुंबाडचा परिसर आहे. हा परिसर वाशिष्ठी आणि खेडहून येणाऱ्या जगबुडी नदीच्या संगमावर आहे. श्री. ना. पेंडसे यांनी अजरामर केलेला तुंबाड किनारा, विविध बेटे आणि दोन्ही तीरावरील विविधता पर्यटक अनभवू शकतो. वाशिष्ठी खाडीच्या किनाऱ्यावर मालदोली गावात नव्वदहून अधिक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली अभियांत्रिकी नवल ठरलेली “रामचंद्र वासुदेव मराठे न्यास” ही ‘हेरिटेज वास्तू’ आहे. उपलब्ध मौखिक माहितीनुसार या वास्तूचे प्लॅनिंग भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केले होते. खाडीकिनारी वसलेल्या या वास्तूची आजची काठीण्यपातळी मोहवून टाकणारी आहे. साडेसात एकर जागेतील अंदाजे २ हजार चौ. फूट आकारात  ही वास्तू आहे. 

उंचीवरील जीने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज पडणार नाही वा तो चढताना दमणार नाही यानुसार या जीन्याची तंत्रशुद्ध रचना साकारण्यात आली आहे. तब्बल नव्वद वर्षांनंतरही या वास्तूतील लाकडाला काही झालेले नाही. वास्तूतील जवळपास वीस-बावीस खोल्यांना प्रत्येकी दोन दरवाजे, दोन खिडक्या, भिंतीतील दोन कपाटे आहेत. खिडक्यांना चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर सूर्यप्रकाश वास्तूतील प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. छताच्या “लगी” आज नव्वदीनन्तरही मजबूत असून त्यांना कोठेही बाक आलेला नाही. छप्पराच्या ९ इंच आय बीमची मजबुती नव्वद वर्षांनंतरही सहज नजरेत भरते. 

भिंतींचा मूळ गिलावा अजिबात हललेला नाही व त्याचे तुकडे गळून पडलेले नाहीत. वास्तू परिसरात ८० आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुलाचे झाड) आहे. भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे.

दापोली तालुक्यातील पन्हाळेकाझी हे गाव कोरलेल्या लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. गावातील कोटजाई ही नदी पुढे वाशिष्ठी खाडीला जाऊन मिळते. या नदीच्या काठावर महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा नितांत सुंदर लेणी समूह  आहे. इथल्या गुंफा ऐतिहासक असून त्या जवळपास हजार वर्षांहून अधिक जुन्या आहेत. एकूण २९ भल्या मोट्या दगडांमध्ये पहायला मिळतात. या ठिकाणी श्रीगणेश, सरस्वती यांसारख्या देवीदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तसंच भिंतींवर महाभारत आणि रामायणातले काही प्रसंग चित्रीत केले आहेत. 

पन्हाळेकाझी इथे नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक लेण्यांचं अनोखं मिश्रण आहे. शिलाहार राज्याची एकेकाळी राजधानी असलेल्या या लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या प्रतिमा, महाचंडरोषण, बौद्धस्तूप, नाथपंथीय शिल्पपट, शंकराचे कोरीव मंदिर, रामायण आणि महाभारतातील प्रसंग, गणेश, लक्ष्मी, हनुमान या देवतांची शिल्पे कोरलेली आहेत. हा संपूर्ण परिसर पाहण्यासाठी किमान दोन-तीन तास लागतात. कोटजाई नदीकाठचं दृश्य अतिशय रमणीय आहे. येथील परिसर हिरव्यागर्द वनराईने समृद्ध आहे. दापोलीपासून पन्हाळेकाझी २१ कि.मी. आहे. चिपळूण तालुक्यातील गोंधळे येथील तांबी नदीच्या किनारी असलेले पेशवेकालीन हरिहरेश्वर मंदिर, परिसरातील इंग्रजी ‘एल’ शेप आकाराची प्राचीन विहीर (घोडेबाव), शेकडो वर्षांपूर्वीचे वडाचे झाड पाहण्यासारखे आहे. 

भरती-ओहोटीचे गणित सांभाळून छोट्या बोटीने खाडीमार्गाने आपण पन्हाळेकाझीसह येथेही पोहोचू शकतो. वाशिष्ठीच्या जोडनद्यांमध्ये गोंधळेसह दापोली तालुक्यातल्या उन्हवरे गावातले गरम पाण्याचे कुंड, पन्हाळेकाझी लेणी, मालदोली बंदरासमोरील गुहा लहान बोटीनं भरती-ओहोटीची वेळ बघून, साधारण द्वादशी ते चतुथीर्पर्यंत जाऊन बघू शकतो. गाडीनं जाण्यासारखी दोन प्राचीन ठिकाणं म्हणजे बिवली गावचं प्राचीन लक्ष्मीकेशव मंदिर आणि दोणवलीचं सिद्धिविनायक मंदिर होय. 

दाभोळ ते चिपळूण-गोवळकोट बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे. नुकताच आम्ही ६ ऑक्टोबर २०१८ रोजी हा प्रवास केला. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवली, त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मलीही नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे ‘विश्व गॅझेटिअर’ प्रसिद्ध झाले होते त्यातही या दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. अशा या जगप्रसिद्ध खाडीतील फेरफटका समृद्ध जीवनानुभव ठरावा.

ओहोटीच्या वेळी खाडी किनाऱ्यावर शरीराचे तापमान नियंत्रित करण्याकरिता ‘बास्किंग’ करीत निवांत पहुडलेल्या, मॅनग्रोव्हमध्ये लपलेल्या, कातळावर बसलेल्या, चिखलात विसावलेल्या मगरी बोटीतून बघायला धमाल मज्जा येते. या बोट प्रवासात सुमारे ८ ते १० फुट लांबीच्या किमान १० मगरी तरी पाहायला मिळतात. नशीब जोरावर असेल तर ही संख्या २०-२२ वरही जाऊ शकते. अर्थात त्यासाठी ओहोटी असली पाहिजे. पावसाळ्यात हा सगळा परिसर हिरवागार असतो. हिवाळ्यात कुडकुडायला लावणारी थंडी येथे असते. या खाडी पट्ट्यात आजवर पक्ष्यांच्या ७० ते ८० जाती नोंदवल्या गेल्या आहेत. हे बॅकवॉटर आणि इथल्या मगरी हे मोठं आकर्षण आहेच, पण वाशिष्ठीच्या खाडीतीरावर आणि जोडनद्यांमध्ये भरपूर प्राचीनता, लोकसंस्कृती, जीवनपद्धती, चालीरीती पाहायला मिळतात. आपल्या मातीतील हे सारे वैभव अनुभवण्यासाठी एकदा तरी या वाशिष्ठीच्या खाडीची सफर करायलाच हवी !

धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे सतत कार्यरत पत्रकार आहेत.

 

Photos

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News