राज्यातील शिक्षणाची घडी पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून अनोखा उपक्रम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

कोरोनामुळे विस्कळित झालेली राज्यातील शिक्षणाची घडी पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

मुंबई: कोरोनामुळे विस्कळित झालेली राज्यातील शिक्षणाची घडी पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी यू-ट्युब चॅनेल सुरू करण्यात आले आहे. या चॅनेलचा लाभ मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. याशिवाय लवकरच हिंदी व इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी हे चॅनेल सुरू केले जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्‌विटरच्या माध्यमातून दिली आहे.

पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार यू-ट्युब चॅनेल सुरू केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठीसुद्धा हे चॅनेल सुरू होणार आहेत. तिसरी ते बारावीच्या वर्गांसाठी जिओ टीव्हीवर एकूण 12 चॅनेल सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे, ज्याने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरू केले आहेत, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, यापूर्वी ऑनलाईन वर्गांचे वेळापत्रक शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले होते.

कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव झाल्याने राज्य सरकारने 15 जुलैपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली होती. मात्र, लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अशा भागात ऑनलाईन पद्धतीने शिकवणी वर्ग घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केलेले आहे.

जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक
1) पूर्व प्राथमिक (बालवाडी)
वार - सोमवार ते शुक्रवार (ऑनलाईन वर्ग)
कालावधी - 30 मिनिटे (प्रतिदिन)
या वर्गांमध्ये पालकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
2) पहिली व दुसरी
वार - सोमवार ते शुक्रवार (ऑनलाईन वर्ग)
कालावधी - 30 मिनिटे (प्रतिदिन)
यामध्ये 15 मिनिटे विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे; तर उर्वरित 15 मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे.
3) तिसरी ते आठवी - या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी 45 मिनिटांचे दोन वर्ग घेतले जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जाणार आहे.
4) नववी ते बारावी - या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 45 मिनिटांची चार सत्रे असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News