मातीतला बाप समजायला, सातासमुद्रापार सायबाचा  'फादर्स डे' कशाला ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

दोस्तांनो,

या मातीतला आपला बाप आठवायला 
त्या सातासमुद्रापलिकडील सायबाच्या 
'फादरचा डे' कशाला पाहिजे ?

दोस्तांनो,

या मातीतला आपला बाप आठवायला 
त्या सातासमुद्रापलिकडील सायबाच्या 
'फादरचा डे' कशाला पाहिजे ?
अशा विशिष्ट एका दिवसापुरता
बाप आठवावा फक्त त्यांनीच,
जे विसरु शकतात स्वतःच्या बापालाही !

आजचं माझं सारं बहरलेलं जगणं, 
हे त्या सुरकूतलेल्या बापाचंच देणं!
लहानपणी यात्रेतल्या गर्दीत तो 
मला खांदयावर बसवून फिरवत असे
आजही सारं आयुष्य तोललं गेलंय,
ते बापाच्याच अदृश्य खांदयावर ! 
तेव्हा घट्ट धरलेला त्याचा हात 
मी आजही सोडू शकलेलो नाही!
बाप खरंच पायाचा दगड...
त्यानं स्वतःला गाडून घेतलंय म्हणून 
आमची सारी पिढी उभी राहिलीय!

कोणाचाही मरणानंतरचा गौरव
मला साफ नामंजूर आहे !
माझ्या बिनचेहऱ्याच्या बापाला
मी त्याच्या जितेपणीच देईन
एकवीस तोफांची सलामी !
आणि फक्त मोठ्यांच्याच मौतीला 
अर्ध्यावर येणारा ऐटबाज झेंडाही
त्याच्यासाठी पार खाली खेचून आणेन !

मंदिर-मशीद असो वा चर्च...
कुठेही गेल्यावर तिथे जाणवतो 
तो देवाऐवजी अमूर्त रुपातला बापच !
मंदिरातल्या त्या शांत गाभाऱ्यात
जणू तो माझीच व्याकूळपणे वाट पाहतो..
चर्चमधल्या क्रुसावरही करुण बाप दिसतो,
परिस्थितीने मारलेल्या खिळ्यांची वेदना 
अगदी सोशिकपणे सहन करत !
अन् दर्ग्यात तर थकलं आयुष्य संपवून 
तो जणू शांत निजल्याचाच भास होतो !

कधी तरी अशा एखाद्या निमित्ताने  
मी कोणाला माझा बाप ऐकवू पाहताच
प्रत्येक जण आपलाही थोडा थोडा  सांगतो
आणि बापाविषयीच्या कृतज्ञ जाणिवांनी
माझ्या मनाचं सारं आभाळ गच्च भरुन येतं!
रणरणत्या जीवनवाटेवर झाड झालेला बाप
जाणवत राहतो प्रत्येक पावलापावलावर!
तरीही अख्खा बाप अजून मला कळला नाही 
तो पूर्ण समजायला सारी जिंदगी जावी लागते !

...आणि माझ्या प्रिय दोस्तांनो,
बाप समजणं म्हणजेच आयुष्य समजणं !

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News