कॅन्सर टर्मिनॉलाॅजी समजून घेताना...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 May 2019

या   लेखमालेत आतापर्यंत आपण वेगवेगळ्या कॅन्सरची (कर्करोग) लक्षणे, त्याचे निदान आणि उपचारपद्धती समजून घेतल्या. कर्करोगाचे वेगवेगळे टप्पे आपण पाहिले.

या   लेखमालेत आतापर्यंत आपण वेगवेगळ्या कॅन्सरची (कर्करोग) लक्षणे, त्याचे निदान आणि उपचारपद्धती समजून घेतल्या. कर्करोगाचे वेगवेगळे टप्पे आपण पाहिले. तसेच, स्तन आणि फुफ्फुसासारख्या सामान्य कर्करोगावर कसे उपचार करतात, यावर देखील दृष्टिक्षेप टाकला. आपल्या रुग्णावर उपचार करताना कर्करोग तज्ज्ञांकडून सामान्यतः सातत्याने उल्लेख होणाऱ्या वैद्यकीय संकल्पना आज आपण समजून घेणार आहोत. कर्करोगाच्या उपचारासाठी पहिला शब्द आपल्या कानावर पडतो तो केमोथेरपी. हे एक प्रकारचे औषध आहे. त्याच्या माध्यमातून आपण रुग्णाच्या शरीरातील कर्करोग झालेल्या पेशी मारून टाकू शकतो.

सर्वसाधारणपणे सलाइनमधून हे औषध रुग्णाला दिले जाते.आधुनिक वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे आता तोंडावाटेही ही औषधे देता येतात. इतर औषधांप्रमाणे या गोळ्यादेखील घरच्या घरी रुग्णाला घेता येतात. त्यासाठी रुग्णालयात दाखल होण्याचीही गरज नसते. त्यातून रुग्णाचा रुग्णालयातील बराचसा खर्च कमी होतो. सामान्यतः कर्करोग तज्ज्ञांच्या बोलण्यात येणारा दुसरा शब्द म्हणजे ‘जेनेटिक’ किंवा ‘जेनॉम टेस्टिंग.’ केमोथेरपी देऊनही रुग्णाच्या शरीरात पसरलेला कर्करोग नियंत्रणात येत नसल्यास याचा वापर केला जातो. या सगळ्या स्पेशलाईज टेस्ट असतात. कर्करोगाच्या पेशींची डीएनए तपासणी करून त्याची सविस्तर माहिती संकलित केली जाते.

त्यासाठी कर्करोग झालेल्या अवयवाचा छोटा तुकडा (बायोप्सी) काढला जातो. त्याच वेळी रुग्णाच्या रक्तातील किंवा लाळेतील नमुन्यातून सामान्य डीएनएची चाचणी केली जाते. या अद्ययावत वैद्यकीय चाचण्यांमुळे काही रुग्णांमध्ये कर्करोगाच्या पेशी नेमक्‍या कशामुळे औषधाला प्रतिकार करत आहेत, याचे गूढ उलगडते. त्यामुळे रुग्णावर प्रभावी उपचार करता येतो. जेनेटिक्‍समुळे संबंधित कर्करोगावर नेमके कोणते औषध प्रभावी ठरेल, याची अचूक माहिती मिळते. या औषधाला रुग्ण कसा प्रतिसाद करेल, याचीही ठोकताळे बांधता येतात.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News