नांदेडात सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थी व पालकांत अस्वस्थता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

वैद्यकीय व दंतवैद्यक क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. सहा) लागला.

नांदेड - वैद्यकीय व दंतवैद्यक क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर प्रवेश पात्रता परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. सहा) लागला. मात्र, दुपारनंतर परीक्षा घेतलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटचे सर्व्हर सातत्याने डाऊन झाले. त्यातच चार प्रश्नांची आधी ग्राह्य धरलेली उत्तरे एनटीएने नंतर न स्वीकारल्याने विद्यार्थ्यांना तब्बल वीस गुणांचे नुकसान झाल्याचे समजते.  या दोन्ही प्रकारांमुळे नांदेडहून ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. याप्रकरणी काही खासगी क्लासचालक न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजले.

गतवर्षीप्रमाणे यंदाही ‘नीट’च्या निकालात नांदेडचा टक्का वाढलेला असेल अशी अपेक्षा येथील शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, या निकालाने अनेकांची निराशा झाली. बुधवारी (ती. पाच) दुपारनंतर निकाल हाती आले. तेव्हा पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांत महाराष्ट्रातील केवळ तीन विद्यार्थ्यांचा यादीत समावेश होता.   

‘रसायना’त पाच गुणांचा झटका
रसायनशास्त्र विषयातील एका गणिताच्या प्रश्नाने विद्यार्थ्यांची झोप उडविली. या प्रश्नाचे उत्तर एनटीएने ऐनवेळी बदलून विद्यार्थ्यांना पाच गुणांचा झटका दिला. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा प्रवेश हुकणार; तर काही विद्यार्थ्यांना चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशावर पाणी फेरले जाणार आहे. रसायनशास्त्र विषयाच्या पेपरमधील प्रश्न क्रमांक १६३ ने चांगलाच घोळ घातला आहे. थर्मोडायनॉमिक्‍सवरील गणितीय (न्युमरिकल) प्रश्नाचे उत्तर वजा (मायनस) तीस येत असल्याने चारपैकी पहिल्या पर्यायाचे उत्तर बरोबर होते.

एनसीईआरटीच्या इयत्ता अकरावीच्या रसायनशास्त्र विषयाच्या पुस्तकातही या प्रश्नाचा थेट संदर्भ आहे. अशाच प्रश्नाचे उत्तर वजा तीस येत असल्याचे पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक १८९ वरील प्रश्न क्रमांक ६.७ वर दाखविण्यात आले असून या प्रश्नाचे उत्तर पृष्ठ क्रमांक २५६ वर दिलेले आहे. ‘नीट’ परीक्षेतील पहिली उत्तरतालिका २९ मे रोजी जाहीर झाल्यानंतर त्यातही हे उत्तर वजा तीस (पर्याय एक) असे बरोबर दाखविण्यात आले होते. यामुळे विद्यार्थी या हक्काच्या गुणाला गृहीत धरून होते. मात्र, बुधवारी एनटीएने परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली व लागलीच निकालही जाहीर करून टाकला. यात प्रश्न क्रमांक १६३ चे उत्तर बदलण्यात आले व क्रमांक चारचा पर्याय म्हणजे अधिक (प्लस) तीस उत्तर बरोबर दाखविण्यात आला. एनटीएने अचानक कारण न देता बदललेल्या या उत्तराच्या पर्यायामुळे विद्यार्थ्यांचे पाच गुण कमी झाले व एकूण गुणांतून ते वजा झाल्याने गोंधळ उडाला. याप्रकरणी लातूर येथील कांही विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News