उमेश-प्रिया यांची वेबसिरीज,  'आणि काय हवं?'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

उमेश कामत आणि प्रिया बापट यांची "आणि काय हवं?' ही मराठी वेबसीरिज मॅक्‍स प्लेअरवर सुरू होती. त्याचा दुसरा सीझन येत आहे. याबाबत उमेश कामत म्हणतात की, मराठी मालिकांना टीव्ही हा मोठा आधार आहेच. पण, वेबसीरिजद्वारे नवी संधी निर्माण झाली आहे.

पुणे : मराठी चित्रपट असो की मालिका, यासाठी आता टीव्ही हेच माध्यम उरलेले नाही. त्यांना वेबसीरिज हे नवे भविष्य खुणावू लागले आहे. कलाकार आणि निर्मात्यांना आश्रय देणाऱ्या टीव्हीबरोबरच वेबसीरिज त्यांना "आधार' ठरू लागल्या आहेत.

नेटफ्लिक्‍स, ऍमेझॉन मनोरंजनाची नवी दालने सुरू झाली आणि त्यातून पाहायला मिळणाऱ्या मालिका आणि सिनेमांनी रसिक, प्रेक्षकांना अवाक्‌ करून टाकले. भारतीय पडद्यावर कधी न दिसणारे वास्तववादी विषय दिसू लागले.

जे विषय कधीच चित्रपटरूपात पाहायला मिळू शकले नसते, तेच विषय मालिकेतून या माध्यमांनी पुढे आणले. त्याला भाषा, देश यांची बंधनेही उरली नाहीत. याच दालनात आता मराठी भाषेतील विषय पोचू पाहत आहेत.उमेश कामत आणि प्रिया बापट यांची "आणि काय हवं?' ही मराठी वेबसीरिज मॅक्‍स प्लेअरवर सुरू होती.

त्याचा दुसरा सीझन येत आहे. याबाबत उमेश कामत म्हणतात की, मराठी मालिकांना टीव्ही हा मोठा आधार आहेच. पण, वेबसीरिजद्वारे नवी संधी निर्माण झाली आहे. या वेबसीरिजचा पहिला भाग झाला, तो लोकांना खूप आवडला. दुसरा भाग यावा म्हणून त्यांच्याकडून प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यामुळे आम्ही दुसरा भागही घेऊन येत आहोत.

मराठी सिनेमाचे बजेट आणि हिंदी सिनेमाची कधीच तुलना होऊ शकत नाही. तरी, वेबसीरिजमुळे मराठी विषय परदेशातही पाहिले जात आहेत. टीव्हीबरोबरच एक वेगळे आणि सक्षम माध्यम मराठीला खुणावू लागले आहे.

टीव्हीवरील कार्यक्रम हे विशिष्ट वेळेत घरी बसून बघावे लागतात. परंतु, वेबसीरिज हे प्रवास, कामातून वेळ मिळाल्यास कधीही पाहता येतात. याशिवाय वेबसीरिजला सेन्सॉरशिप नाही, किती मिनिटांची मालिका असावी, याचेही बंधन नाही.

एखादा मोठा विषय काही भागांच्या मालिकेतही बसविता येतो, असे कामत यांनी सांगितले. प्रादेशिक विषयांना भविष्यात वेबसीरिजमध्ये मोठे स्थान मिळणार आहे. हिंदी वेबसीरिजमधून खूप चांगले प्रयोग केले जात आहेत. मराठीतूनही ते करता येतील.

नेटफ्लिक्‍स, ऍमेझॉनसारख्या माध्यमांमध्ये मराठी आले, तर त्याला आर्थिक पाठबळही मिळेल. आपल्याकडे उत्तम साहित्य आहे, ऐतिहासिक विषय आहेत. जे विषय चित्रपटातून मांडता येत नाहीत, ते वेबसीरिजमध्ये काही भागांमध्ये उत्तमपणे मांडता येतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News