युजीसीने परीक्षा घेण्याच्या निर्णयावर खुलासा करावा; बार कौन्सिलला उच्च न्यायालयाचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020

कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा युजीसीने घेतलेला निर्णय आणि राज्य सरकारसह विद्यार्थ्यांनी परीक्षेला केलेला विरोध या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी मिळणार का, याचा फैसला यंदा न्यायालयातून होणार, असे आता स्पष्ट होत आहे.

मुंबई: कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा युजीसीने घेतलेला निर्णय आणि राज्य सरकारसह विद्यार्थ्यांनी परीक्षेला केलेला विरोध या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पदवी मिळणार का, याचा फैसला यंदा न्यायालयातून होणार, असे आता स्पष्ट होत आहे. विधी शाखेच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत बार कौन्सिल ऑफ इंडियाने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले आहेत. तसेच, युजीसीनेही परीक्षा घेण्याच्या निर्णयावर खुलासा करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

समरवीर सिंह या विधी शाखेच्या विद्यार्थ्याने केलेल्या याचिकेवर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. बार कौन्सिलने अंतिम वर्ष परीक्षा घेऊ नये आणि मूल्यांकन पद्धतीने निकाल जाहीर करावा, अशी शिफारस कौन्सिलकडे केल्याचे राज्य सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. यावर बार कौन्सिलने परीक्षांबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.

निर्णयाविरोधात विद्यार्थी, सरकार एकत्र
विशेष म्हणजे परीक्षा घेऊ नये यासाठी राज्य सरकारने युजीसीकडेही शिफारस केली आहे. वैद्यकीय, विधी शाखेसह जवळपास सर्वच शाखेतील विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे; तर आकाश राजपूत या विद्यार्थ्यांने परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे.

आता लढा न्यायालयीन
महाराष्ट्र स्टुडंटस युनियन आणि विधी शाखेचे विद्यार्थी तेजस माने, अविरुप मंडल, किनले रिनझीन, अन्नपूर्णानी रामू, प्रतीक सदाफुले आदी नऊ विद्यार्थ्यांच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. याचबरोबर युवा सेनेच्यावतीनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली असून त्यावरही पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाने परीक्षा घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News