पिंपरी चिंचवड :- मित्रांने हातावर फक्त टॅटू काढला म्हणून रागाच्या भरात आपल्याच जिवलग मित्राची मित्रांनीच हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर शहरातून लातूरला पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना सोलापूर महामार्गावर पाठलाग करून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर हरिदास मडके वय वर्ष २६ असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. मयूर मडके हा सराईत गुन्हेगार होता. त्याचे मित्र रोशन सौडतकर, मंगेश मोरे (राहणार, दिग्रस लातूर), प्रणेश घोरपडे, शुभम बलराम वाणी (रा. चौधरी पार्क दिघी), वैभव तान्हाजी ढोरे (रा. भवानी पेठ, काशेवाडी, पुणे) अशी अटक झालेल्या आरोपींची नाव आहे.
मयूर मडके आणि आरोपी हे चांगले मित्र होते. शनिवारी रात्री मयूर आणि त्याचे दोन मित्र हे दिघी रोडवर दारू पिण्यासाठी बसले होते. दोघांची दारू पार्टी सुरू असताना तिथे आणखी दोन मित्र तिथे आले. बऱ्याच उशीरा दारु पार्टी सुरू होती. त्यानंतर मयूरने काढललेल्या टॅटूवरून वाद झाला. मयूरने टॅटूमध्ये काढलेले अक्षर MM म्हणजे मयूर मडके का मंगेश मोरे एवढाच किरकोळ वाद होता. परंतु त्या किरकोळ वादच रूपांतर दारूच्या नशेत मारामारीत झाले. दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या मित्रांनी मयूरवरच हल्ला केला. कोयत्याने मयूरवर सपासप वार केले. मयूर जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. जखमी अवस्थेत असताना त्याचा मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आपल्या हातातून आपल्या मित्राचा खून झाल्यामुळे इतर मित्र भयभीत झाले. त्यानंतर त्यांनी लातूरला पळून जाण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार सर्वजण सकाळी लातूरला रवाना झाले. या प्रकरणी तोपर्यंत भोसरी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी कलम ३०२, ३२४, ३५२, १४३, १४४, १४६, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोसरी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. त्यातून आरोपींच्या फोनचे सीडीआर लोकेशन तपासले. त्यातून आरोपी हे लातूरच्या दिशेने पळून जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने पाठलाग सुरू केला.
पोलिसांच्या एका पथकाने सोलापूर महामार्गावर त्यांचा शोध घेतला. महामार्गावरून पळून जात असताना पोलिसांनी आरोपींना पाटस टोलनाक्याजवळ गाठले आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर कैलासे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, पोलीस कर्मचारी गणेश हिंगे, सुमीत देवकर, समीर रासकर, आशिष गोपी, संतोष महाडीक यांच्या पथकाने पार पाडली.