युवा आमदार आणि माजी खासदार यांचे ट्विटरवॉर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 21 May 2020
  • नीलेश यांच्या ट्विटला रोहित यांनी उत्तर दिल्यानंतर नीलेश यांनी रोहित यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यानंतर रोहित आणि नीलेश यांच्या वादात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेतली.

मुंबई : नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार नीलेश राणे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवॉर सुरू झाले आहे. त्यातच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेतल्याने हा सामना चांगलाच रंगला.

साखर उद्योगावरील संकट दूर करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. यावर नीलेश राणे यांनी टीका करत रोहित यांना फक्त साखर कारखानेच दिसतात का, असा खोचक सवाल केला होता. नीलेश यांच्या ट्विटला रोहित यांनी उत्तर दिल्यानंतर नीलेश यांनी रोहित यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यानंतर रोहित आणि नीलेश यांच्या वादात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उडी घेतली. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर नीलेश राणेंनी ट्विटरवरून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंना थेट धमकी देत आव्हान केले. त्यावरून रोहित पवारांनी ट्विट करत "आपले विचार, आपली भाषा व आपले काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येते. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचे प्रदर्शन करण्यात नीलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो' असा टोला त्यांना लगावला. त्यानंतर रोहित पवारांच्या या ट्विटला नीलेश राणेंनी प्रत्युत्तर दिले, की "बोलणाऱ्याची लायकी बघून मी उत्तर देतो, धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही, हा ट्रेलर आहे. तुझे काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचेही ट्रेलर देईन. मग लोकच चपलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला' अशी धमकी दिली.

काय आहे वादाची पार्श्‍वभूमी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साखर उद्योग वाचवण्याची मागणी केली होती. त्यावर भाजप नेते नीलेश राणे यांनी कोणत्या साखर कारखानदाराकडे किती संपत्ती आहे याचे लेखापरीक्षण झाले पाहिजे, अशी मागणी ट्विटद्वारे केली होती. राणेंच्या या ट्विटवर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले, की पवार साहेबांनी साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांच्या दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवले आहे. यावर नीलेश राणेंनी साखरेवर बोललो, पवार साहेबांवर नाही. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली? मतदारसंघावर लक्ष दे. सगळीकडे नाक नको टाकू. नाही तर साखर कारखान्यासारखी हालत होईल तुझी, असे उत्तर रोहित पवारांना दिले होते.

वादात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंची उडी

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या ट्विटमध्ये नीलेश राणेंना उत्तर दिले, की "आमदार रोहित पवार यांनी अत्यंत सभ्य भाषेत आपले मत मांडले. पवार कुटुंबीयांच्या अंगी असलेल्या सभ्यपणा, सुसंस्कृतपणा, अभ्यासूपणा या गुणांमुळेच आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते पवार कुटुंबीयांवर मनापासून प्रेम करतात आणि हो, राष्ट्रवादीवाले टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात', असा टोला तनपुरे यांनी लगावला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News