ट्‌वेंटी 20 विश्वकरंडक लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 July 2020
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा दीर्घकालीन प्रतीक्षेत असलेला निर्णय घेतला.
  • मात्र त्याच वेळी आयसीसीने २०२१ आणि २०२२ मध्ये विश्वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा होतील, असे जाहीर केले; मात्र यापैकी कोणती स्पर्धा भारतात आणि कोणती ऑस्ट्रेलियात होईल, हे जाहीर करणे टाळले आहे.

मुंबई :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा दीर्घकालीन प्रतीक्षेत असलेला निर्णय घेतला. मात्र त्याच वेळी आयसीसीने २०२१ आणि २०२२ मध्ये विश्वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा होतील, असे जाहीर केले; मात्र यापैकी कोणती स्पर्धा भारतात आणि कोणती ऑस्ट्रेलियात होईल, हे जाहीर करणे टाळले आहे. आयसीसीने याच वेळी भारतीय क्रिकेट मंडळाची काळजी घेताना भारतात २०२३ मध्ये होणारी विश्वकरंडक एकदिवसीय स्पर्धा फेब्रुवारी - मार्चऐवजी ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला.

भारतातील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धांसाठी आयसीसीला करसवलत हवी आहे. त्यासाठी आयसीसीने यापूर्वीच भारतीय मंडळास या वर्षाअखेरपर्यंतची मुदत दिली आहे. आता भारतीय मंडळास ही मुदत मिळाल्यास २०२१ ची विश्वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा ठरल्यानुसार भारतात होईल, मात्र ही न मिळाल्यास भारतास मुदत वाढवून देण्यासाठी २०२२ ची स्पर्धा देता येणे शक्‍य होण्यासाठी आयसीसीने ठिकाणांबाबत संदिग्धता ठेवली आहे.

भारतीय मंडळ तसेच जगातील क्रिकेटपटूंसाठी विश्वकरंडक ट्‌वेंटी २० लांबणीवर टाकण्याचा निर्णय मोलाचा आहे. यामुळे आता भारतीय मंडळ अधिकृतपणे आयपीएलच्या संयोजनासाठी प्रयत्न करू शकेल. अमिरातीत ही स्पर्धा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने यापूर्वी पडद्याआड हालचाली सुरू केल्या आहेत. आता उद्यापासून त्या चर्चा खुल्या स्वरूपात होतील; तसेच आयपीएल परदेशात घेण्यासाठी केंद्र सरकारसह थेट चर्चाही सुरू होऊ शकेल.
आयसीसीने भारतात २०२२ मध्ये विश्वकरंडक ट्‌वेंटी २० आणि २०२३ मध्ये विश्वकरंडक एकदिवसीय स्पर्धा होऊ शकतात, हा विचार करून कार्यक्रमात बदल केला. आता आयसीसीने २०२३ ची स्पर्धा फेब्रुवारी - मार्चऐवजी ऑक्‍टोबर - नोव्हेंबर निवडताना पात्रतेचा कालावधी वाढवला असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात काही महिन्यात भारतात दोन स्पर्धा झाल्यास त्या वेळी पुरस्कर्ते मिळण्यात प्रश्न येतील, हा विचार जास्त केला आहे.

 
दरम्यान, या बैठकीत न्यूझीलंडमध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक एकदिवसीय स्पर्धेबाबतही निर्णय अपेक्षित होता. मात्र या परिस्थितीचा आढावा घेत त्याबाबत योग्य त्या वेळी निर्णय घेण्याचे ठरले. न्यूझीलंडमध्ये एकही कोरोना रुग्ण नसतानाही याबाबत अंतिम निर्णय टाळला आहे.

विश्वकरंडकाच्या तारखा

 

  • विश्वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा २०२१ :- ऑक्‍टोबर - नोव्हेंबरअंतिम सामना १४ नोव्हेंबर २०२१
  • विश्वकरंडक ट्‌वेंटी २० स्पर्धा २०२२ :- ऑक्‍टोबर - नोव्हेबर अंतिम लढत १३ नोव्हेंबर २०२२
  • विश्वकरंडक एकदिवसीय स्पर्धा २०२३ (भारतात) :- ऑक्‍टोबर - नोव्हेंबर, विजेतेपदाचा सामना २६ नोव्हेंबर २०२३

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News