सत्यासाठी, जातीय अंतासाठी - सत्यशोधक विद्यार्थी संघटना

संदीप काळे / सुरज पाटील (सकाळ वृत्तसेवा, युनबझ)
Wednesday, 10 April 2019

1988 चा तो काळ. त्या काळामध्ये अनेक विद्यार्थी संघटना आपल्या हक्कासाठी लढा देत होत्या; पण शिक्षणाच्या प्रश्नापेक्षा शैक्षणिक वातावरणामध्ये अनेक निर्बंध लावले जात होते. 

1988 चा तो काळ. त्या काळामध्ये अनेक विद्यार्थी संघटना आपल्याहक्कासाठी लढा देत होत्या; पण शिक्षणाच्या प्रश्नापेक्षा शैक्षणिकवातावरणामध्ये अनेक निर्बंध लावले जात होते. शिक्षणाचे खासगीकरण आणि त्यापलीकडे जाऊन जाती-जातींमध्ये निर्माण झालेले प्रश्न तीव्रतेने वाढत होते, ते कमी व्हावेत यासाठी शरद पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सत्यशोधक विद्यार्थी संघटना पुढे आली. अनेक वाईट प्रथांना तिलांजली देण्याचे काम या संघटनेने केले आहे. या संघटनेच्या माध्यमातून युवतींचे संघटन करण्याची कल्पना पुढे आली.

शिक्षणाचे खासगीकरण आणि विषमता यामुळे निर्माण झालेले प्रश्न तीव्रतेने वाढत होते, ते कमी व्हावेत यासाठी कॉ. शरद पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सत्यशोधक विद्यार्थी संघटना पुढे आली. अनेक वाईट प्रथांना तिलांजली देण्याचे काम या संघटनेने केले आहे. या संघटनेच्या माध्यमातून युवतींचे संघटन करण्याची कल्पना पुढे आली. 'सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी मंचाचा' झेंडा खांद्यावर घेऊन अनेक युवती या लढ्यात सहभागी झाल्या. सुरुवातीपासून ते आतापर्यंत सत्यशोधक विद्यार्थ्यांनी सत्य पुढे आणण्याचे काम केले. जातीयता नष्ट व्हावी एवढेच  नाही तर मार्क्सवाद फुले-आंबेडकरवाद विद्यार्थ्यांमध्ये रुजावा यासाठी सत्यशोधकाचे मोठे योगदान राहिलेले आहे.

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची सुरूवात कशी झाली, हे सांगताना - संपादक संदीप काळे

स्त्री-पुरुष विषमता, विद्यार्थी लढा, शिक्षणाचे बाजारीकरण, जाती-जातींमधले वाढलेले द्वेश, दूर करण्यासाठी अनेकांनी प्रेरणा घेऊन फुले, शाहू, आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा वेध घेण्यासाठी, त्यांचे विचार जनसामान्यांत रुजवण्यासाठी महाराष्ट्रातील  बहुजन तरुणांनी सत्यशोधक विद्यार्थ्यांचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतला होता. शिक्षणासोबतच प्रेमाच्या नकारातून होणाऱ्या हिंसा दूर करण्यासाठी या संघटनेचा सातत्याने पुढाकार दिसतो. अहिंसेच्या मार्गावर चालणारी ही संघटना नेहमी बहुजनांच्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेणारी होती. मनुस्मृती दहन दिन, २८ नोव्हेंबर शिक्षक दिन अशा कितीतरी सांकृतिक पर्यायातून वैचारिक चौकटीत बसायचे काम या संघटनेने केलेय. महात्मा फुलेंनी जी विचारधारा सांगितली ती विचारधारा या संघटनेत असल्याचे पाहायला मिळते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही ठिकाणी फाळण्या झाल्या तर काही ठिकाणी हक्काच्या वादावरून अंतर्गत लढाया सुरू झाल्या. हा इतिहास सर्वांना माहीत आहे; पण त्याचप्रणाणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उठवण्यात आला तो म्हणजे जातीचा. 

इंग्रजांनी देशात सर्व स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने बदल करण्याचा प्रयत्न केला; मात्र 'जात' या मुद्द्यावर कोणताच बदल करता आला नाही आणि ती जात नावाची व्यवस्था तशीच देशात फोफावत राहिली. हीच व्यवस्था शैक्षणिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात आपले ठिकाण भक्कम करू लागली. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन देशात बलाढ्य संघटना उभ्या केल्या गेल्या. अखेर या जात नावाच्या व्यवस्थेला बाजूला सारून एक खंबीर संघटना तयार व्हावी, जी शिक्षणाचे आदर्श मानल्या जाणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांशी पाईक असेल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे सर्वेसर्वा कॉम्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेतून  24 सप्टेंबर 1988 रोजी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची (सविस) स्थापना करण्यात आली आणि "शिक्षणातील जातभेद, वर्गभेद, स्त्रीदास्य नष्ट करू' हे ब्रीद घेऊन ‘सविस'ने आपले काम सुरू केले.

एकीकडे समाजात रुजलेली जात व्यवस्था आणि दुसरीकडे स्त्रियांना 1900च्या उत्तरार्धात दिले जाणारे दुय्यम स्थान या दोन्ही घटकांचा मध्य म्हणून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. समाजात किंवा विद्यार्थ्यांच्या असलेल्या उणिवा दूर करून केवळ आंदोलना पुरते मर्यादित न राहता समाजात आणि सर्व विद्यार्थ्यांच्यात समतेचा उगम व्हावा, हा आशावाद घेऊन सत्यशोधक संघटनेने पुढे पाय टाकले असल्याचे म्हटले जाते. गाव पातळी ते देश पातळीपर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याची ओळख व्हावी, इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात, याचे त्यांना निरसन करावे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची व्यवस्था करावी. दलित, शोषित, शेतमजुरांच्या मुलांच्या समस्या सोडवाव्यात, शिक्षणातील आरक्षणावर तोडगा काढावा. मोफत शिक्षणासोबत समान शाळा आणि सर्वांना समान शिक्षण मिळावे. विद्यार्थ्यांनी आंदोलनापुरते मर्यादित न राहता, त्या समस्येच्या उगमापर्यंत विद्यार्थ्यांनी गेले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समान परिवर्तनाची चळवळ उभी राहावी. प्रेम प्रकरणातून होणाऱ्या हत्या बद्दल जनजागृती करणे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्यांवर एकत्र येऊन तोडगा काढणे.  महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणाचे होत असलेले खासगीकरण, व्यापारीकरण या गोष्टींवर आंदोलने करणे अशा विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने लक्ष केंद्रित केले. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे. वेगवेगळी शिबिरे आयोजित करणे, भरवल्या गेलेल्या परिषदांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्यांची जाणीव करूण देणे, असे ध्येयही "सविस'ने मनी बाळगले होते. 

सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा अभ्यास करताना आलेले अनुभव सांगताना - सुरज पाटील

संघटनेच्या आंदोलनाचा आढावा...
1988 साली परभणी येथील आदिवासी समाजातील विद्यार्थी वसतिगृहातील मुलींशी छेडछाड करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते. त्या सर्वांवर आळा घालण्यासाठी सत्यशोधकने पुढाकार घेऊन निदर्शने केली आणि तेथील विद्यार्थिनींनी न्याय मिळवून दिला. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा वाद किंवा इतर ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू व्हावी त्यासाठी मंडल आयोगच्या अमलबजावणीसाठी 1990 साली मुंबईच्या मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चात सिद्धार्थ जगदेव, किशोर  जाधव, राजू जाधव यांच्यासह 800 इतर विद्यार्थीही सहभागी झाले होते. नाशिक येथे असलेल्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात 1996च्या काळात मुलांना विषबाधा झाली होती, त्या वेळी तेथील प्रकल्प अधिकाऱ्यास काळे फासण्याचे काम सत्यशोधकने केले होते. 28 जानेवारी 2000 रोजी दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाला एकत्र करून तब्बल 20 हजार तरुणांनी मुंबई येथील  मंत्रालयावर "शिक्षण, शेती, आणि आरक्षण अधिकार मोर्चा' या मथळ्याखाली आंदोलन पुकारले होते. ज्याचा अर्थ असा होता की, सर्व समाजाला सार्वजनिक स्वरूपात शिक्षण मिळावे, शेती मालाला भाव द्यावा व सर्व समाजाला घोषित केल्याप्रमाणे आरक्षणाची अंमलबजावणी करावी. 2013 साली संघटनेकडून स्त्री अत्याचारविरोधी परिषद घेण्यात आली; जेणेकरून स्त्रियांच्या समस्या, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवता येईल. अशा प्रकराचा आवाज, आंदोलने आणि निदर्शने सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने पुकारली आहेत. 

संघटनेबद्दल बोलताना मनेष खटाव (राज्यसचिव, सत्यशोधक विद्यार्थी संघटना) 
मार्क्सवाद, फुले-आंबेडकरवाद ही विचारधारा घेऊन, महात्मा फुलेंनी दिलेल्या सर्वोत्तम शिकवणीला सोबत घेऊन "सविस'ने आपला लढा सुरू केला होता. ही संघटना जरी महाराष्ट्राच्या मर्यादित असली तरी विद्यार्थ्यांना  घेऊन काढण्यात आलेल्या देश पातळीवरच्या सर्रास आंदोलनामध्ये सत्यशोधकने  आपला सहभाग नोंदवला आहे. धुळ्यामधून सुरू झालेली ही संघटना नंतर अहमदनगर, पुणे, मुंबई, परभणी, संपूर्ण मराठवाडा प्रदेश तसेच पश्चिम महाराष्ट्र अशा महाराष्ट्राच्या विविध भागांत पोहोचली. "सविस'ने सुरुवातीच्या काळात दलित, शेतमजूर शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली, विद्यार्थ्यांच्या छोट्या-छोट्या प्रश्नांना घेऊन प्रशासनाशी लढा सुरू ठेवला. विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे यासाठी वेगवेगळी शिबिरे आयोजित केली. बैठका-परिषदा घेतल्या. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणाऱ्या पुस्तिका काढल्या. या सर्वांचा फायदा म्हणजे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले. त्यातून आंदोलने, निदर्शने काढण्यास सुरुवात झाली.  सध्या महाराष्ट्रातील सत्यशोधक संघटनेचे 600 कार्यकर्ते नांदेड, औरंगाबाद, पुणे, मुंबई, कोकण आणि धुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संघटनेचे सदस्यत्व हे फक्त विद्यार्थ्यांना दिले जाते, तर पुकारलेली आंदोलने, निदर्शनांचे प्रतिनिधित्व हे विद्यार्थ्यांकडे सोपवले जाते. त्यामुळे संघटनेने पुकारलेला लढा हा सर्वेसर्वा विद्यार्थ्यांनी पुकारलेला लढा बनून जातो.  24 सप्टेंबर हा दिवस शिवाजी महाराज यांचा शाक्त राज्याभिषेक दिन हा जातीव्यवस्थाअंतक दिन म्हणून सत्यशोधक संघटना साजरा करत आलेली आहे. या दिवशी वेगवेगळ्या रॅलींच्या माध्यमातून जातीव्यवस्थे बाबतची जनजागृती केली जाते. 5 सप्टेंबरला संपूर्ण देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो; मात्र सत्यशोधक विद्यार्थी संघटनेला तो दिवस शिक्षक दिन म्हणून अमान्य आहे, त्याऐवजी महात्मा फुले स्मृतिदिनी म्हणजेच 28 नोव्हेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे कारण सांगायचे झाल्यास ज्या व्यक्तीच्या नावे 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे, त्या डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांनी फक्त उच्च जातीय आणि उच्च वर्गीयांसाठी काम केले; मात्र महात्मा फुलेंनी समाजातील खालच्या स्तरातल्या विद्यार्थ्यांनाही आपलेसं करून शिकवले. म्हणून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच खरे शिक्षणाचे आदर्श असल्याचे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे ठाम मत आहे. 

शिक्षणाचे खाजगीकरण, बाजारीकरणाच्या विरोधात ऑल इंडिया फोरम फॉर राईट टू एज्यूकेशनच्या सोबत दिल्लीच्या संसद भवनावर मार्ग येथे १८ फेब्रुवारी २०१९ रोजी  देशातील 100 संघटनांनी हुंकार मोर्चा काढला होता. त्यात"सविस'ने कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदवला होता. शिक्षक व प्राध्यापक भरती ही केंद्रीय पद्धतीने झाली पाहिजे, ही एक मागणी सविसची राहिली आहे. यासाठी ६ एप्रिल २०११ साली औरंगाबाद विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. सरकारने तयार केलेले पवित्र पोर्टल हे या मागणीचे फलित. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे निर्णायक आंदोलन म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे. 2013 साली विद्यापीठाच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले. हॉस्टेल, पाणीप्रश्न, मेंटेनन्सचा प्रश्न, हॉस्टेलकडे जाणारा रस्ता, वार्डनकडून विद्यार्थिनींना होणारा त्रास, वेळेचा प्रश्न, घरी फोन करण्यावरून वाद असे एकूण 165 मागण्या घेऊन नांदेडच्या विद्यापीठाला घेराव घालण्यात आला आणि विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर विचार करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. 8 नोव्हेंबर 2016रोजी याप्रकारचेच आक्रमक आंदोलन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे घडवून आणले होते. विद्यापीठात सिनेट बैठक सुरू असताना बैठकीत विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे, हा मुद्दा मांडवा यासाठी हे आंदोलन करण्यात आहे. आंदोलनाच्या माध्यमातून विद्यापीठाला घेराव घातला असता, पोलिसांना पाचारण करून आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यातदेखील घेतले होते, ज्यांच्यावर अजूनही केसेस सुरू आहेत. 

संघटनेबद्दल बोलताना राजू जाधव (माजी राज्य संघटक)
सत्यशोधक विद्यार्थी संघटना म्हणजे समान परिवर्तनाची चळवळ होय. प्रत्यक्ष जनतेचा लढा म्हणून शिक्षण व्यवस्था, जात व्यवस्था आणि समाज व्यवस्था यांच्या पलीकडे जाऊन माणसाला जगण्याचा आधार आणि माणुसकीचे नाते कायम ठेवण्यासाठी या संघटनेने पुढाकार घेतला असे म्हणायला हरकत नाही.  स्वातंत्र्यानंतर देशात ज्याला जसे हवे आहे, त्याप्रकारे शिक्षण व्यवस्थेला वागवून त्याची संपूर्ण विल्हेवाट लावण्याचे काम काही नेत्यांकडून तर काही प्रमाणात सरकारकडून होत आले आहे. शिक्षणाचे खासगीकरण, व्यापारीकरण या दोन गंभीर मुद्द्यांना काही सरकारी बाबूंकडून खतपाणी मिळत असल्याने शिक्षण व्यवस्थेची व्याख्या दिवसेंदिवस बदलत चालली आहे. या व्याख्येला स्थिर ठेवण्यासाठी आणि गरीब विद्यार्थ्यांपासून ते श्रीमंत विद्यार्थ्यांना समान शिक्षण मिळावे, यासाठी अतोनात प्रयत्न सत्यशोधकने केले. "सविस'ने ज्याप्रकारे विद्यार्थ्यांना समान शिक्षणचा नारा शिकवला त्याप्रकारे राज्यातील दलित, गरीब, आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांच्या हक्कासाठीदेखील सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने आपला पुढाकार दर्शवला. 

1990-91च्या रब्बी आणि खरीप पिकाचा हंगाम होता. त्या वेळेस नाशिकच्या लासलगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावासाठी आंदोलन पुकारले. त्यामागचा सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा उद्देश इतकाच होता, जर शेतकऱ्यांना समस्या आल्या तर त्याचा त्रास त्यांच्या मुलांनादेखील जाणवू लागतो आणि त्रास होत असलेली मुले शिक्षणापासून दूर जात असतात. म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे ओढायचे असेल तर त्यांच्या घरच्यांना संकटातून मुक्त करावे लागेल, हाच उद्देश "सविस'ने डोळ्यांसमोर ठेवला आहे.

1999 ते 2000 या काळात एकतर्फी प्रेमातून मुलींच्या हत्या होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले होते, त्यातलीच एक शिकार रिंकू पाटील. या सर्वातून मुलींना स्वातंत्र्य मिळावे, मुलांच्या मनोवृत्तीत बदल व्हावा, यासाठी "सविस'च्या माध्यमातून वंदना सोनाळकर आणि शर्मिली रेगे यांनी "प्रेम-नकार-हिंसा' आणि "प्रेमाचा आणि हिंसेचा प्रश्न' या दोन पुस्तिकांचे संघटनेच्या मार्फत जितके होईल तितके महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांत वाटप करण्यात आले. त्याच्या माध्यमातून बंदिस्त मनोवृत्तीचा प्रश्न्, स्त्री-पुरुष समानता, एकसारखे पोलिस यंत्रणेला जबाबदार ठरवणे, पुरुषप्रधान संस्कृतीतून महिलांचे वास्तव समजावून सांगणे असे अनेक प्रयोग त्यावेळी करण्यात आले. 

कायदा आणि सुव्यवस्था राज्यात टिकून राहावी, यासाठी ऑगस्ट 2001 साली आंदोलन पुकारण्यात आले, त्या वेळी औरंगाबाद, धुळे, नाशिक, पुणे, मनमाड, लातूर, कोकण अशा विविध भागांतून सिद्धार्थ जगदेव, संगीता ठोसर, आकाश साबळे, सचिन पगारे, दानपाल मोरे, महेंद्र वाळे, स्वाती महाडिक, किशोर शिंदे, बालाजी वाघमारे, अंकुश कदम, सुदीप कांबळे, गणेश धार्मिक अशा शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर प्रचार आणि प्रसार करत स्त्री सुरक्षितता, वर्गभेद, जातभेद या सगळ्यांवर आळा घालण्याचा अतोनात प्रयत्न केला.

नाशिकच्या शासकीय विद्यालयातील चंद्रकांत तपकिरे या दलित विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्यांमुळे पेटलेले वादळ असो, विद्यार्थ्यांच्या महागाई विरोधात उडालेला उद्रेक असो, पुणे, मुंबई, अमरावती  विद्यापीठांमध्ये अभ्यासाच्या कारणाने केलेले आंदोलन असो, मेडिकल कौन्सलीनच्या विरोधात नाशिकच्या बी फार्मसीच्या मुलांनी व्यक्त केलेला संताप असो या सर्व गोष्टींमध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटना अग्रेसर आहे आणि अग्रेसर होती, हेच पाहायला मिळते. 

संघटनेबद्दल बोलताना अश्विनी मोरे (सावित्रीबाई फुले विद्यार्थी मंच, अध्यक्ष)
2000 साली मी "बीए'ला शिक्षण घेत असताना, मुले आणि मुली असा भेद मोठ्या  प्रमाणात केला जात असे, पुरुषप्रधान व्यवस्थेचा पायंडा त्या वेळी पाडण्यात आला होता, हे मला कुठेतरी मनात कोंडून होते. त्याचबरोबर विद्यार्थिनींना दर वेळेस सोसावा लागणारा त्रास, या सगळ्याचा विचार करून अखेर मी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा भाग झाले. स्त्री-पुरुष समानता, जातीयवाद, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षणाचे होत असलेले खासगीकरण, एकतर्फी प्रेमातून होत असलेल्या मुलींच्या हत्या या सर्व विषयांवर काम करण्याची संधी मला या संघटनेत करण्यास मिळाली. संघटनेमध्ये आल्यानंतर मला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर खूप योग्यरीत्या समजले. त्यामुळे या संघटनेने दिलेली शिकवण ही आयुष्यभर मनात कायम राहील, हे नक्की. 

सत्यशोधक विद्यार्थी संघटना या सदराचा समारोप करताना...
गरिबांच्या मुलांना न्याय; मग तो दोन्ही अर्थांनी. एक शिक्षणाचे प्रश्न आणि दुसरे जाती-जातीमधील भेडसावणारे प्रश्न असो. त्या-त्या काळात अनेक गंभीर विषय समोर येत असतात. हे गंभीर प्रश्न पुढे घेऊन सोडवले नाहीत, तर येणारी पिढी त्या प्रश्नांच्या ओझ्याखाली दबून संपुष्टात येण्याची भीती असते. सत्यशोधक विद्यार्थी संघटना ज्या वेळी अस्तित्वात आली, त्या वेळी जातीयता हा प्रश्न गंभीर होत चालला होता. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने आपला सुरू केलेला लढा हा त्या काळातील सर्वांत महत्त्वाचा लढा वाटला होता. ज्या पावलाला खूप मोठे यश आले, सत्यासाठी आजही सत्यशोधकी लढा कायम आहे. केवळ बहुजन, दलित असेच विद्यार्थी नाहीत, तर फुले, शाहू आंबेडकर यांना मानणारे कितीतरी युवक आज या चळवळीचा भाग आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News