भारताकडून धोका हा पाकचा कांगावा; अमेरिकेने फटकारले

Friday, 25 August 2017

वॉशिंग्टन: भारताकडून धोका निर्माण होत असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक दहशतवादाला

वॉशिंग्टन: भारताकडून धोका निर्माण होत असल्याचा कांगावा करत पाकिस्तानकडून जाणीवपूर्वक दहशतवादाला खतपाणी घातले जात असून, ते तात्काळ थांबवा, अशा कठोर शब्दांत अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने पाकिस्तानला फटकारले. अफगाणिस्तानात भारताकडून सुरू असलेल्या कार्यातून पाकिस्तानला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचा स्पष्ट निर्वाळाही या अधिकाऱ्याने दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रवक्ते (एनएससी) मायकेल ऍन्टोन यांनी मंगळवारी तिखट शब्दांत पाकिस्तानला खडसावले. ते म्हणाले की, भारताकडून अफगाणिस्तानात जे कार्य सुरू आहे, त्यामुळे पाकिस्तानला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होत नाही. भारत तिथे आपला लष्करी तळ उभा करत नाही किंवा आपले सैनिकही तैनात करत नाही. त्यामुळे भारताकडून आपल्याला धोका असल्याचा कांगावा करत दहशतवाद्यांना मदत करणे पाकिस्तानने थांबवायला हवे. दहशतवाद्यांचे समर्थन करण्यासाठी भारत हे कारण होऊ शकत नाही.

पाकिस्तानच्या सरकारकडून दहशतवाद्यांना थेट मदत केली जाते, ही दुर्दैवी बाब असल्याचे ही ऍन्टोन म्हणाले.

अमेरिकेच्या धोरणात बदल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि दक्षिण आशियाबाबतचे आपल्या सरकाचे नवे धोरण नुकतेच जाहीर केले. त्यावेळी दहशतवादाला खतपाणी घातल्याबद्दल ट्रम्प यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. तसेच, दहशतवाद्यांना पोसण्याचे पाकिस्तानने थांबविले नाही, तर मोठी किंमत बजवावी लागेल, असेही ट्रम्प यांनी पाकिस्तानला बजावले आहे. अफगाणिस्तानात शांतता निर्माण करण्यास आपले प्राधान्य आहे. अफगाणिस्तानातील अमेरिकी सैनिकांची संख्याही वाढविण्यात येणार असून, तेथे स्थैर्य निर्माण करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असेल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. अफगाणिस्तानसंदर्भात भारताच्या सहभागासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच वेळी पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलण्यात येतील, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

किंमत मोजण्यास तयार राहा

दहशतवाद्यांना थेट मदत करण्याचे धोरण न थांबविल्यास पाकिस्तानला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. "नाटो'बाहेरील महत्त्वाचा सहकारी देश असा दर्जा पाकिस्तान गमावून बसेल, असा इशारा अमेरिकी प्रशासनातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. दहशतवाद्यांची पाठराखण करणे पाकिस्तानने थांबवावे, अन्यथा त्याची मोठी किंमत पाकिस्तानला चुकवावी लागेल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी म्हटले होते. पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करण्याबाबत अमेरिकेने बोटचेपे धोरण यापूर्वी घेतले होत, अशी विचारणा करण्यात आल्यानंतर संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस आणि परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले.

दहशतवादाला खतपाणी घालणे थांबविले नाही तर ट्रम्प प्रशासनाकडून पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावले उचलली जातील. नव्या धोरणावर आम्ही काम करत आहोत. त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल.

- जेम्स मॅटीस, अमेरिकेचे संरक्षणमंत्री

पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देत असल्याचे मागील काही वर्षांत समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तानबाबतचा विश्वास काही प्रमाणात कमी झाला आहे. अमेरिकी सैनिकांच्या विरोधातील कारवायांचे नियोजन पाकिस्तानात बसून केले जात असल्याचे दिसून येते. योग्य माहिती असल्यास कोठेही दडून बसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात आम्ही लष्करी कारवाई करू. पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक आणि लष्करी मदत घटविली जाऊ शकते.

- रेस्क टिलरसन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री

"यूएन'ची मदतीची तयारी

पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करण्यास मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस हे मदत करतील, असे गुटेरेस यांच्या प्रवक्‍त्याने आज सांगितले. अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवर राजकीय उत्तर शोधण्यास "यूएन'चे प्राधान्य आहे. त्यामुळे पाकिस्तानला हवे असल्यास तेथील दहशतवाद्यांचे जाळे नष्ट करण्यासाठी "यूएन'च्या सरचिटणीसांकडून मदत देण्यात येईल, असे ही प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News