ट्रुफॅन स्टार्टअपला ३५ कोटी रुपयांचे फंडिंग... वाचा का व कशासाठी मिळाले एवढे पैसे

सलील उरुणकर
Friday, 4 September 2020

नुकत्याच मिळालेल्या फंडिंगचा वापर ट्रुफॅनकडून बाॅलिवूडच्या ए-लिस्टमधील सेलिब्रिटी कलाकारांना करारबद्ध करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्वात मोठा इन्फ्लुएन्सर - फॅन आधारित काॅमर्स प्लॅटफाॅर्म म्हणून ट्रुफॅन आता समोर येत आहे

पुणेः रणवीर सिंग, करीना कपूर, ह्रितिक रोशन आणि टायगर श्राॅफ यासारख्या बाॅलिवूड सेलिब्रिटींकडून तुम्हाला तुमच्या नावाने व्हिडिओ आला तर तुम्हाला कसं वाटेल? आणि तेसुद्धा फक्त त्यांच्याविषयीच्या माहितीवर आधारित प्रश्नमंजुषा सोडवून ही संधी मिळाली तर? होय, आता अशी संधी तुम्हाला मिळणार आहे आणि तीसुद्धा एका स्टार्टअपच्या माध्यमातून.

मुंबई-स्थित ट्रुफॅन या स्टार्टअप कंपनीने तरुणाईला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. नुकतेच या स्टार्टअपला सुमारे ३५ कोटी रुपयांचे फंडिंग मिळाले आहे. या नव्या फंडिंगच्या मदतीने या स्टार्टअपने रणवीर, करीना, ह्रतिक आणि टायगर या चौघांना करारबद्ध केले आहे. निमिष गोयल याने स्थापन केलेल्या या स्टार्टअपमध्ये राॅनी स्क्रुवाला यांची भागीदारी आहे.

निमिष हा विराट कोहलीचा मोठा चाहता असल्यामुळे त्याला भेटण्यासाठी तो एका लग्न समारंभात निमंत्रणाशिवाय घुसला होता. आपल्याप्रमाणेच देशात कोट्यवधी लोक सेलिब्रिटींना भेटण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. हा विचार करून त्याने सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांना जोडण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आधारे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निश्चय केला आणि त्यातून त्याची स्टार्टअप कंपनी सुरू झाली.

ट्रुफॅनप्रमाणेच विश (Wysh), जाॅयन्ट (Joynt) व अन्य स्टार्टअप्ससुद्धा सेलिब्रिटी आणि चाहत्यांना एकत्र आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. मात्र ट्रुफॅनचे वैशिष्ट्य असे की प्रश्नमंजुषेच्या आधारे पर्सनलायझ्ड व्हिडिओसह तुम्ही कॅश रिवार्ड्सही जिंकू शकता. नुकत्याच मिळालेल्या फंडिंगचा वापर ट्रुफॅनकडून बाॅलिवूडच्या ए-लिस्टमधील सेलिब्रिटी कलाकारांना करारबद्ध करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील सर्वात मोठा इन्फ्लुएन्सर - फॅन आधारित काॅमर्स प्लॅटफाॅर्म म्हणून ट्रुफॅन आता समोर येत आहे.

या स्टार्टअपने उपलब्ध करून दिलेल्या संधीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना रणवीर म्हणाला, "ट्रुफॅनने सेलिब्रिटी व चाहत्यांमधील नात्याला गेमिफिकेशनच्या माध्यमातून एका वेगळ्याच स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पद्धतीने माझ्या चाहत्यांशी जोडले जाण्याचा आनंद वेगळाच आहे."

ह्रितिक म्हणतो, "ट्रुफॅनच्या या व्यासपीठामुळे माझ्या कोणत्याही चाहत्याला माझ्याकडून वैयक्तिक पातळीवर संदेश घेण्यासाठी कोणत्याही भौगौलिक सिमेची मर्यादा राहिलेली नाही."

चाहत्यांबरोबर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडले जाण्याबद्दल करीना म्हणाली, "बाॅलिवूडमधील माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मला लाखो चाहते लाभले आहेत आणि आता त्यांच्यापर्यंत वैयक्तिक पातळीवरही संवाद साधण्याची संधी मला या व्यासपीठामुळे मिळाली आहे. माझ्या चाहत्यांनाही हे व्यासपीठ आवडेल अशी अपेक्षा आहे."

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News