कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 April 2020
  • जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा

मुंबई : कोरोनाचा खरा विनाश अजून दिसायचा आहे, हा जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला इशारा खोटा ठरवायचा असेल. तर नागरिकांनी तो गांभीर्याने घेऊन सावधगिरी बाळगावी. यापुढील काही दिवस घराबाहेर न पडता टाळेबंदी नियमांचे पालन करावे, बेजबाबदारपणे वागू नये, घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊन स्वत:चा आणि कुटुंबाचा जीव धोक्‍यात घालू नये. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात, मालेगावसारख्या शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात वाढत असून, या ठिकाणी चिंता वाढली आहे. मुंबईत सोमवारी एकाच दिवसात साडे चारशेहून अधिक रुग्ण वाढले. राज्यातील रुग्णांची संख्या साडेचार हजारांवर गेली आहे. 24 मार्चच्या आधीपासून टाळेबंदी जाहीर करुनही झालेली वाढ गंभीर आहे. मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यातून कोरोनाने हातपाय कुठपर्यंत पसरले आहेत, याचा आवाका येतो. मात्र, असे असूनही शहरात रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये नागरिक विनाकारण गर्दी करत आहेत. यातून ते स्वत:च्या, कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण करत आहेत. हे थांबले पाहिजे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

नागरिकांनी दाखवलेला संयम, सहकार्यामुळेच राज्यातील काही जिल्हे आजही कोरोनामुक्त आहेत. नांदेड, सांगलीसारखे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यापासून बोध घेऊन आपला जिल्हाही कोरोनामुक्त करण्याचा निर्धार करुया. आपण सर्वांनी पुढचे काही दिवस घरातच थांबण्याचा निर्धार केल्यास, या लढाईत विजय नक्की आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई, ठाणे, पुण्यात, मालेगाव सारख्या शहरात पुढचे काही दिवस टाळेबंदी नियमांचे मनापासून, स्वयंशिस्तीने काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल

कोरोनाविरुद्धच्या लढाईत जात-पात, भाषा-प्रांत, धर्म-पंथ विसरुन एकजूट होऊन साथ देण्याची गरज आहे. कोरोनाचा लढा हा मानवतेच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. तो संपेपर्यंत कुठल्याही प्रकारचा वाद-विवाद-विसंवाद टाळला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले चौकीपाडा येथे झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी, निषेधार्ह असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रकरणाची सीआयडी चौकशी सुरु झाली असून, शंभरहून अधिक आरोपींना अटक केली आहे. सर्व दोषींना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा नक्की होईल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News