ट्रेकिंग हीच मृणालची आवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 11 March 2020

आपल्या सह्याद्रीतल्या डोंगरांपेक्षा हिमालयातील डोंगरांमध्ये फिरण्याचा अनुभव वेगळा असतो.

जेमतेम वीस वर्षे वयाची मृणाल एवढी प्रचंड भटकंती करत असेल हे कित्येकांना खरं वाटणार नाही.ती म्हणते,‘लहान असताना आई-बाबा आणि जवळच्या नातेवाइकांबरोबर भटकंतीची गोडी लागली. थोडी मोठी झाल्यावर मित्रमैत्रिणींसोबत अनेकदा ट्रेक केले. महाराष्ट्रातील वीस गड-किल्ले मी आजवर फिरले आणि पुढेही जात राहणार आहे. दरवर्षी हिमालयाची वारी असतेच. 

आपल्या सह्याद्रीतल्या डोंगरांपेक्षा हिमालयातील डोंगरांमध्ये फिरण्याचा अनुभव वेगळा असतो. त्याहीपेक्षा वेगळे डोंगर आहेत ते लेह-लडाख परिसरात. त्यावर झाडांचं आच्छादन नाहीच. नुसतीच माती. प्रत्येक डोंगरावर निराळ्याच रंगछटा दिसतात.’

 
ती पुढे सांगते, ‘अलीकडेच मी ‘चादर ट्रेक’ केला. गोठलेल्या झंसकार नदीवरून चालत जाण्याची मजा आहे; पण आव्हानही तेवढंच मोठं. कधी बारा फूट खालपर्यंत बर्फाचा भक्कम आधार असतो, तर काही ठिकाणी अत्यंत पातळसा थर पाऊल टेकता क्षणी तुटतो आणि पाय पाण्यात जातो. पुण्याहून मी एकटी, मुंबईहून आतेबहीण व तिची मैत्रीण अशा महाराष्ट्रातील आम्ही तिघीच त्या ग्रुपमध्ये होतो. भारताच्या इतर भागांतून आलेले सारे मिळून आम्ही पंधरा सदस्य होतो. साठ किलोमीटरची ही बर्फाची चादर पाच दिवसांत पार करताना दिवसा उणे पंधरा व रात्री उणे तीसपर्यंत खाली जाणाऱ्या तपमानात राहणं ही परीक्षा होती. ही वाटचाल पूर्ण झाल्यावर आत्मविश्वास आणखी वाढला. उन्हाळ्याच्या सुटीत हिमालयात फिरस्ती करतानाही वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं.’

मृणालने सांगितलं, की सध्या मी फिजिक्‍स विषयात बी. एस्सी.च्या शेवटच्या वर्षाला आहे. मला भटकंतीतच करिअर करायचं आहे. त्यासाठी मी फिटनेस जपते. चालणं, जिममधला व्यायाम आणि वेळ मिळताच घराजवळच्या सिंहगडावर जाणं हे सतत सरावासाठी चाललेलं असतं. निसर्गाच्या सान्निध्यात भटकताना शरीर व मनाची ताकद तर वाढतेच, शिवाय अद्भुत शांतता जाणवते. लहान मुलांना भटकंतीतली मौज कळावी, यासाठी एका संस्थेची स्वयंसेवक म्हणून मी काही बालगटांसोबत आनंदाने जात असते. 

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी काही अभ्यासक्रम करत असते. आतापर्यंतच्या भटकंतीत मी काढलेल्या छायाचित्रांचा उत्तम संग्रह झाला आहे. माझ्या या छंदाने मला जगण्यातला आनंद शिकवला आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News