कोरोनाच्या भीतीमुळे नॉन-कोव्हिड रुग्णांचे घरीच औषधोपचार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020
  • दिवसेंदिवस कोव्हिड- 19 च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या व शहरातील एकंदरित स्थिती पाहता मुंबईकर चिंतेत आहेत.
  • त्यातच रुग्णालयातील डॉक्‍टर तसेच इतर वैद्यकीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने या चिंतेत भर पडली आहे.

मुंबई :- दिवसेंदिवस कोव्हिड- 19 च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या व शहरातील एकंदरित स्थिती पाहता मुंबईकर चिंतेत आहेत. त्यातच रुग्णालयातील डॉक्‍टर तसेच इतर वैद्यकीय कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे सामान्य आजारांसाठीही रुग्णालयात जाण्याची भीती नागरिकांना वाटत आहे; मात्र या भीतीपोटी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्‍टर करत आहेत.

कोरोना संसर्गाचा वैद्यकीय क्षेत्रालाही फटका बसला आहे. राज्यात कोरोनामुळे आतापार्यंत 18 डॉक्‍टरांचा मृत्यू झाला आहे. 900 बाधित, तर 1500 वैद्यकीय कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत. त्यामुळे रुग्णांमध्येही रुग्णालयाबाबत भीती निर्माण झाली आहे. भीतीपोटी नागरिक दवाखान्यात न जाता स्वतःच्या मनानेच औषधोपचार करण्याचा धोका पत्करत आहेत. त्यात पावसाळी ताप, सर्दी, श्‍वसन विकारांनीही डोके वर काढले आहे. या आजारांची लक्षणे व कोरोनाची लक्षणे जवळपास सारखी असल्याने रोगाचे निदान करणे डॉक्‍टरांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.

गेल्या तीन महिन्यांत समाज माध्यमे, तसेच इतर माध्यमांमधून नागरिकांमध्ये कोरोना लक्षणांबाबत जनजागृती करण्यात येत आहे; मात्र हीच लक्षणे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या आदी आजारांमध्येही आढळून येत असल्याने नागरिकांचा गोंधळ उडत आहे. अशावेळी नागरिकांनी मनाने औषधोपचार न करता वेळीच तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना डॉक्‍टरांनी केली आहे.

...तर जीव धोक्‍यात येऊ शकतो!

मनाने औषधोपचार करणे घातक असून त्याची मोठी किंमत नागरिकांना मोजावी लागू शकते. तसेच आजारांकडे दुर्लक्ष केल्यास यामध्ये गुंतागुंत वाढण्याची शक्‍यता असते. शेवटच्या क्षणी रुग्णालयांत आल्यास रुग्णाला धोक्‍याबाहेर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. अशा वेळी कमीत कमी वेळात योग्य निदान करणे डॉक्‍टरांकरिता अवघड असते. उपचारास विलंब झाल्याने रुग्णांचा जीवही धोक्‍यात येतो, असे मुंबईतील अपोलो स्पेक्‍ट्रा हॉस्पिटलचे औषध तज्ज्ञ डॉ. तुषार राणे यांनी सांगितले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News