पाली : उन्हाळी सुट्टीच्या अखेरच्या टप्प्यात रायगड जिल्ह्यात पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी झाली आहे. व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीपेक्षा ही गर्दी तब्बल २५ टक्क्यांनी वाढली असून या वर्षी धार्मिक स्थळे किंवा गड-किल्ल्यांपेक्षा सुमद्र किनाऱ्यांना पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे.
नयनरम्य समुद्र किनारे, प्रसिद्ध धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक वास्तूंचा रायगड जिल्ह्याला वारसा लाभला आहे. एक-दोन दिवसांच्या सहलीसाठी त्यामुळे मुंबई-पुण्यातील पर्यटक दिवाळी, उन्हाळी सुट्टीत मोठी गर्दी करतात. या वर्षी जिल्ह्यातील समुद्र किनारे फुलले आहेत. त्यामुळे हॉटेल व लॉज व्यावसायिक, खानावळी, दुकानदार यांची सध्या चलती आहे.
व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार राहण्या-खाण्याच्या दरात मागीलवर्षीपेक्षा १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राहण्यासाठी साधी खोली १२०० ते १६०० रुपये आणि वातानुकूलित खोलीचे भाडे २००० ते २५०० रुपये आहे. ठिकाणांनुसार त्यात दर कमी जास्त होत आहेत. काही ठिकाणी राहण्याबरोबर खाण्याचीही व्यवस्था होत आहे.
जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. त्यामध्ये अलिबाग, नागाव, वरसोली, मुरूड, काशिद, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर येथील समुद्र किनारे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. हे सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल आहेत. सर्वच किनाऱ्यांवर पर्यटक बोटिंग, घोडागाडी, बाईक राईडची मजा लुटत आहेत. जिल्ह्यात ताजी मासळी मिळते. त्यामुळेही अनेक पर्यटक जिल्ह्यात येतात, असे अलिबागमधील लॉज व्यावसायिक अरविंद शिंत्रे यांनी सांगितले. हा व्यवसाय आणखी सुमारे १५ दिवस तेजीत राहील, असेही त्यांनी सांगितले.
धार्मिकस्थळीही गर्दी
खालापूर तालुक्यातील महडचा वरदविनायक आणि सुधागड तालुक्यातील पालीचा बल्लाळेश्वर हे अष्टविनायकांपैकी दोन गणपती रायगडमध्ये आहेत. बल्लाळेश्वर देवस्थानच्या भक्तनिवासमध्ये निवासाची चांगली सोय आहे. ते भाविकांच्या वाढलेल्या संख्येमुळे अपुरे पडत आहेत. भाविकांची संख्या मोठी असल्याने महड आणि पालीतील मंदिराच्या परिसरातील फुल, हार, नारळ, प्रसाद, पूजेच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. त्यांचा व्यवसाय तेजीत आहे.
रायगडाला शिवप्रेमींची पसंती
शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला शिवप्रेमींची पसंती असते. मात्र, उष्मा वाढल्याने शिवप्रेमींची संख्या अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. समुद्रातील मुरूड-जंजिरा व अलिबागचा कुलाबा किल्ल्यावरही पर्यटक आवर्जून भेट देतात.
महामार्गावरील हॉटेल व्यवसाय तेजीत
पुणे-मुंबईवरून कोकणात जाणारे पर्यटक मार्गावरील हॉटेलात खाण्या-पिण्यासाठी थांबतात. त्यामुळे सुट्टीच्या दिवसांत मार्गावरील हॉटेल व्यावसायिक जय्यत तयारीत आहेत. नाक्यानाक्यांवर खासगी टूर्सवाले तसेच पर्यटक थांबत आहेत. स्वच्छतागृहांची सोय असणाऱ्या हॉटेलला पर्यटक अधिक पसंती देतात.