बंगाल ते सिनेसृष्टीपर्यंतचा अभिनेत्री अनंगशाचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. माझी मेहनत आणि टॅलेंट प्रेक्षकांना दाखवायचे आहे. खूप काम करायचे आहे आणि स्पर्धेला तोंड देत टिकून राहायचे आहे.

मी मूळची बंगालची. चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा माझा विचार पक्का होता. त्याकरिता मी ऑस्ट्रेलियात जाऊन ॲक्‍टिंगचा कोर्सही केला होता. त्यानंतर मी इथे येऊन थिएटर करू लागले. आकाश खुराना यांनी मला थिएटरचे धडे दिले. त्यांच्याकडून ॲक्‍टिंगमधील बरेच बारकावे मला शिकता आले. संवादफेक कशी करावी, चेहऱ्यावरील भाव कसे व्यक्त करावेत, या गोष्टी त्यांनीच मला सांगितल्या. तेव्हाही मी शिकत होते आणि आताही शिकत आहे. खरेतर चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मी फारसा काही विचार केला नव्हता.

केवळ आपल्याला मेहनत करायची आहे, खूप कष्ट घ्यायचे आहेत आणि स्ट्रगल करायचा आहे, याचाच अधिक विचार केला होता. काही जण खूप विचार करून येतात आणि मग ते काहीच करीत नाहीत. माझा काही तरी करण्यावर जास्त विश्‍वास आहे. त्याकरिता मेहनत घ्यायचीदेखील माझी तयारी आहे. त्यामुळे जास्त विचार करीत नाही.

मी हळूहळू थिएटरकडून चित्रपटांकडे वळाले. प्रकाश झा यांचा ‘फ्रॉड सैया’ चित्रपट केला. तो याच वर्षी जानेवारी महिन्यात रिलीज झाला. त्यामध्ये ‘आशा’ नावाची भूमिका साकारली. अर्शद वारसी, सौरभ शुक्‍ला आदी कलाकारांनी यामध्ये काम केले. हा कॉमेडी ड्रामा होता आणि सौरव श्रीवास्तवने दिग्दर्शन केले होते. तसेच अन्य काही चित्रपट केले.

मला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘मिर्झापूर’मध्ये. अली फजल, श्‍वेता त्रिपाठी, पंकज त्रिपाठी असे कलाकार यामध्ये होते. ही वेबसीरिज ॲमेझॉन प्राइमवर आली आणि त्यामध्ये मी झरिना नावाची व्यक्तिरेखा साकारली. माझी ही भूमिका खूप जणांना आवडली. केवळ भारतातूनच नाही तर कॅनडासारख्या देशांमधून मला फोन आले. चित्रपटांबरोबरच तीन वेबसीरिजमध्ये काम केले.

चित्रपट आणि वेबसीरिज दोन्हींसाठी काम करताना तेवढीच मजा येते. सध्या ‘हॉस्टेज’ नावाची वेबसीरिज करत आहे. काही दिवसांपूर्वीच ही वेबसीरिज हॉटस्टारवर आली आहे. रोनीत रॉय, टिस्का चोप्रा, प्रवीण दबास, दिलीप ताहील असे कलाकार या वेबसीरिजमध्ये आहेत. ही पोलिटिकल थ्रिलर आहे आणि यामध्ये मी हायमा नावाच्या आसामी मुलीची भूमिका साकारत आहे. ही भूमिका अत्यंत स्ट्राँग आहे. याकरिता मला मार्शल आर्टस आणि बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागले, ते खूप कठीण होते. ही दिल्लीची कथा आहे. सुधीर मिश्रा यांनी ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे. सुधीर मिश्रा ग्रेट आहेत. त्यांच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायला मिळाले. ते नेहमीच प्रत्येक भूमिका व्यवस्थित समजावून सांगतात.

त्यांच्याबरोबर पुन्हा पुन्हा काम करावे, असे सतत वाटते. चित्रपट किंवा वेबसीरिज काहीही स्वीकारताना मी पहिल्यांदा कथा आणि मग माझी भूमिका काय आहे ते पाहते. त्यानंतरच तो प्रोजेक्‍ट करते. सध्या वेबसीरिजचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे अनेक नवीन कलाकारांना संधी मिळत आहे. मी ‘मिर्झापूर २’मध्येही काम करणार आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. माझी मेहनत आणि टॅलेंट प्रेक्षकांना दाखवायचे आहे. खूप काम करायचे आहे आणि स्पर्धेला तोंड देत टिकून राहायचे आहे. अभिनयात माझी स्मिता पाटील आदर्श आहे. त्यांनी केलेल्या भूमिकांमुळेच मला प्रेरणा मिळाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News