'अग्निहोत्र' ते 'मिस यू मिस्टर' पर्यंतचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

एकाच वेळी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमधून सिद्धार्थ चांदेकर प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवाय त्याचा "मिस यू मिस्टर' चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याचा हा दहा वर्षांचा प्रवास नेमका कसा होता हे जाणून घेऊया त्याच्याच शब्दांत...

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकाच वेळी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमधून तो प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवाय त्याचा "मिस यू मिस्टर' चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्याचा हा दहा वर्षांचा प्रवास नेमका कसा होता हे जाणून घेऊया त्याच्याच शब्दांत...

मालिका, चित्रपट, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांच्या मी फार जवळ आहे. मालिका-चित्रपटांपासून माझ्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. या संपूर्ण प्रवासामध्ये मी बरेच चढ-उतार पाहिले. काही चित्रपटांना अपयश मिळालं; तर काही चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. खरं तर मला जे काम योग्य वाटलं, ते काम मी प्रेक्षकांसमोर आणत गेलो. मी एक कलाकार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे अधिकाधिक मनोरंजन कशा प्रकारे करता येईल, याकडे माझा जास्त कल असतो. मालिका, चित्रपट करत असताना मी काही मराठी शोचे सूत्रसंचालनही केले. सूत्रसंचालन करत असतानाही त्यामध्ये मी रमून गेलो.

"अग्निहोत्र' मालिकेमुळे तर मी घराघरांत पोहोचलो. चित्रपटांबरोबरच मालिकांमध्येही काम करण्यास मी उत्सुक असतो. आता बराच काळ मी छोट्या पडद्यापासून दूर होतो. माझ्या हाती योग्य कथा आली आणि मी "जिवलगा' या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा छोट्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झालो. मनासारखं काम करायला मला मिळालं की मी माध्यम कोणतं आहे हे पाहत नाही. आताही चित्रपट असो वा मालिका; मी अगदी दोन्हीकडेही माझं शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करतो. माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या दहा वर्षांमध्ये चित्रपटसृष्टी प्रचंड बदललेली आहे. शिवाय बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानही बदललेलं आहे. मला या दहा वर्षांनी काय दिलं तर मी अभिनेता म्हणून अधिक सक्षम झालो. त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून समाजात कसं वावरायचं हे मला या दहा वर्षांनी शिकवलं.

मी जेव्हा या क्षेत्रात आलो, तेव्हा मला एक गोष्ट जाणवली, की मराठी चित्रपट निर्मितीकडे जास्त गांभीर्याने पाहिलं गेलं नाही. पण आता काळ संपूर्ण बदलला आहे. मराठी चित्रपटनिर्मितीत तर वाढ झालीच आहे. त्याचबरोबरीने मराठी चित्रपटांचा लोक गांभीर्याने विचार करू लागले आहेत. निपुण धर्माधिकारी, मकरंद माने, प्रकाश कुंटे यांच्यासारखे नव्या दमाचे दिग्दर्शक नवनवीन कथा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांना मराठी चित्रपट तयार करावासा वाटला, हीच मोठी गोष्ट आहे.

माझ्या दहा वर्षांचा करिअरमध्ये मी मराठी चित्रपटसृष्टीचा बदलता काळ पाहिला आहे. सध्या जमाना वेबसीरिजचा आहे. बदलत्या काळानुसार कलाकारही वेबसीरिजकडे वळले आहेत. मालिका, चित्रपटांव्यतिरिक्त मलाही वेबसीरिज हे माध्यम आवडू लागले आहे. गेल्या काही महिन्यात माझ्या दोन वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. वेबसीरिजमध्ये काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूपच छान होता. हे माध्यम अधिक प्रभावी आहे असे मला वाटते. माझ्याबाबतीत घडलेली एक गोष्ट सांगतो. मी आजवर बरेच चित्रपट केले, मालिका केल्या; पण माझी खूप मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी झाली नाही. मात्र, दोन वेबसीरिज केल्या तर जगभरात माझी ओळख निर्माण झाली.माझ्या एका वेबसीरिजचं तर अमेरिकेमध्ये पोस्टर लागलं. आपण जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरी वेबसीरिज पाहू शकतो. वेबसीरिज हे माध्यमच ग्लोबल असल्यामुळे मी जगभरात पोहोचलो. हे मी वेबसीरिज केली म्हणून शक्‍य झालं. वेबसीरिजमध्ये काम करायचं हा मी घेतलेला निर्णय माझ्यासाठी फायदेशीरच ठरला. एकाच वेळी मालिका, चित्रपट, वेबसीरिज करणं मला कधीच कंटाळवाण वाटत नाही. माझ्या कामावर माझं प्रेम आहे. त्यामुळे मनापासून करत असलेल्या कामाचा मला कधीच कंटाळा किंवा त्या कामाच मला ओझं वाटत नाही.

आताही मी मालिकेबरोबरच चित्रपटही करत आहे. "मिस यू मिस्टर' हा माझा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये मला अभिनेत्री मृण्मयी देशपांडेबरोबर काम करण्याची संधी मिळत आहे. "लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप'मध्ये येणाऱ्या समस्या आणि त्यातून निर्माण होणारे वाद या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. समीर जोशी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा सिद्धार्थ प्रेक्षकांच्या समोर येईल. खरं तर या चित्रपटामुळे "लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप'कडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनदेखील बदलला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News