या महामार्गावर रोजगारासाठी स्थानिकांना कौशल्य विकास केंद्रात प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020
  • मुंबई आणि नागपूर या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या द्रुतगतीमार्गचे म्हणजेच समृद्धी महामार्गाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे.
  • परंतु या महामार्गाच्या बांधकामसह अनेक योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मुंबई :- मुंबई आणि नागपूर या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या द्रुतगतीमार्गचे म्हणजेच समृद्धी महामार्गाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. परंतु या महामार्गाच्या बांधकामसह अनेक योजना सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  महामार्ग ज्या जिल्ह्यातून जातो, त्या भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्रोथ सेंटर्स ही उभारण्याचे नियोजन आहे. त्यातून भविष्यात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. मात्र, त्या संधीचे सोने करण्यासाठी स्थानिकांकडे कौशल्याची कमतरता असेल. तेथे परप्रांतीय तरुणांची भरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यातील ही संभाव्य कोंडी टाळण्यासाठी या महामार्गावरील पाच जिल्ह्यांत नऊ ठिकाणी कौशल्य विकास आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय) उभारण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे.

समृद्धी महामार्गावरील ७०१ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक दीड ते दोन वर्षांत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. या महामार्गावर १९ ठिकाणी ग्रोथ सेंटर्स (टाउनशिप) विकसित केले जाणार असून, तेथे कृषी विकास केंद्र आणि कमर्शियल हब स्थापनेचे नियोजन आहे. या ग्रोथ सेंटरमध्ये स्थानिकांनाच रोजगार मिळावा, यासाठी कौशल्य विकास आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा विचार पुढे आल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील फुगाळे गावासह केळझार आणि विरूल (वर्धा), मेहकर, सावरगाव (बुलडाणा), हडस पिंपळगाव, घाईगाव, बबटारा (औरंगाबाद) या ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. एमएसआरडीसीए ही व्यवस्था खासगी भागीदाराच्या सहकार्याने उभारणार आहे. प्रस्तावाची तात्काळ, मध्यम आणि दीर्घकालीन उपयुक्तता लक्षात घेत, त्यानुसार केंद्रांचे नियोजन केले जाईल. या केंद्राची आर्थिक व्यवहार्यता तिथले व्यावसायिक प्रशिक्षण, अभ्यासक्रमाची आखणी, काळानुरूप त्यात आवश्यक असलेले बदल, प्रशासकीय कामकाज, त्याचे मार्केटिंग, ब्रँडिंग अशी सर्व जबाबदारी भागीदार संस्थेवरच असेल. ग्रोथ सेंटर्सच्या निर्मितीनंतर या ठिकाणी कुशल रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि तेथे हे कुशल स्थानिक तरुण नोकरी किंवा व्यवसाय करू शकतील. या केंद्रांच्या उभारणीसाठी स्वारस्य देकार मागविण्यात आले असून, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष केंद्रांची उभारणी सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणाची संधी

स्थानिक पातळीवरील आर्थिक केंद्रांत भविष्यात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीनुसार कृषी आणि संलग्न उद्योग, इमारत बांधकाम, वाहनांची देखभाल दुरुस्ती, केमिकल आणि फार्मा, आयटी, आरोग्यसेवा, टेक्सटाइल आणि कापडनिर्मिती, पर्यटन, हॉस्पिटॅलिटी, वाहतूक आणि लॉजिस्टिक, शिक्षण, फूड प्रोसेसिंग, ज्वेलरी मेकिंग, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, प्लंबर, सुतार यांसह असंख्य क्षेत्रांतील प्रशिक्षणाच्या संधी येथे तरुणांना उपलब्ध करून दिल्या जातील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News