वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित तरुणाईला मिळणार रोजगार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 April 2020

985 उमेदवारांनी नियुक्तीसाठी होकारही दिला असून, विविध जिल्हे आणि महापालिकांमार्फत या उमेदवारांना नियुक्‍त्या देण्याचे विचाराधीन आहे.

मुंबई : राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत वैद्यकीय, नर्सिंग आणि हेल्थ केअर संदर्भातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रम घेतले जातात. या अभ्यासक्रमांमार्फत आतापर्यंत 10 हजार 815 युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात आले आहे. कोरोनाची साथ पाहता आरोग्य सेवकांची सध्या मोठी आवश्‍यकता आहे. त्यामुळे सोसायटीने या युवक-युवतींची यादी आरोग्य विभागास तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. आवश्‍यकतेनुसार त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

प्रशिक्षितांपैकी 985 उमेदवारांनी नियुक्तीसाठी होकारही दिला असून, विविध जिल्हे आणि महापालिकांमार्फत या उमेदवारांना नियुक्‍त्या देण्याचे विचाराधीन आहे. काही ठिकाणी त्यांना त्यापद्धतीने कामही दिले जात आहे. राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत विविध प्रकारची कौशल्य विकासाची प्रशिक्षणे देण्यात येतात. यामध्ये लघु कालावधीची प्रशिक्षणेही असतात. सोसायटीमार्फत आरोग्य सेवा क्षेत्रातील बेडसाईड असिस्टंट, नर्सिंग एड, जनरल ड्युटी असिस्टंट, जनरल ड्युटी अटेंडंट, लॅबोरेटरी असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्‍निशियन, डायलेसीस असिस्टंट, ऑपरेशन थिएटर टेक्‍निशियन तसेच फार्मसी असिस्टंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आतापर्यंत 10 हजार 815 युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात आले आहे. सध्या कोरोनाचा प्रदुर्भाव, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणेवरील ताण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता या उमेदवारांचा उपयोग होऊ शकेल. त्यादृष्टीने या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत विचार व्हावा, अशी शिफारस सोसायटीमार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्या-त्या जिल्ह्यातील उमेदवारांची यादी पाठवून करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये या उमेदवारांची मदत घेण्याबाबत कार्यवाही देखील करण्यात येत आहे.

प्रमाणित उमेदवारांची जिल्हानिहाय संख्या
अहमदनगर 86, अकोला 66, अमरावती 748, औरंगाबाद 322, बीड 252, भंडारा 366, बुलढाणा 42, चंद्रपूर 329, गडचिरोली 354, गोंदीया 55, हिंगोली 58, जळगाव 584,जालना 381, कोल्हापूर 152, लातूर 764, मुंबई उपनगर 204, मुंबई शहर 220, नागपूर 1597, नांदेड 355, नाशिक 601, उस्मानाबाद 89, परभणी 313, पुणे 803, रत्नागिरी 27, सांगली 50, सातारा 40, सिंधुदुर्ग 85, सोलापूर 147, ठाणे 1533, वर्धा 15, वाशिम 131 आणि यवतमाळ 146. अशा एकूण 10 हजार 815 युवक-युवतींना आरोग्य सेवाविषयक कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News