कोयना धरण पुनर्वसित खालापूर तालुक्यातील रानसई-उचाट गाव आजही आपल्या आगळ्या-वेगळ्या परंपरा व पद्धतीने प्रसिद्ध आहे. १९६१ च्या सुमारास कोयना धरणासाठी महाबळेश्वरच्या खोऱ्यात व सह्याद्रीच्या पर्वतरांगेत विसावलेल्या या गावचे स्थलांतर होऊन, गावाचे पुनर्वसन खोपोली-पेण रस्त्याला लागून रानसई-उचाट गावाच्या रूपाने आकारास झाले.
आत्ता हे गाव स्थानिक संस्कृती व कोकणाच्या मातीशी एकरूप झाले आहे. परंतु गावाने आपली पूर्वपार संस्कृती, सण-उत्सव राजरा करण्याची परंपरा मात्र सोडली नाही. उलट नव्या पिढीने तर ती अधिकच मजबूत केली आहे. आत्ता याच अनोख्या परंपरा जोपासण्यामुळे हे गाव तालुक्यात वेगळ्या अर्थाने प्रसिद्ध आहे. गावात साजरा होणारा अनोखा होळी महोत्सव तालुक्यातील चर्चेचा विषय बनला आहे.
नवरात्र महोत्सव, गणपती उत्सव, दिवाळी, तुळशीचे लग्न व गावदेवी महोत्सव पूर्णपणे कोयना खोऱ्यातील त्या परंपरेनुसारच साजरा केला जातो. नवरात्रोत्सव व पालखी सोहळा, कुस्ती स्पर्धा, हरिनाम सप्ताह आदी सार्वजनिक कार्यक्रम त्या-त्या वेळेत पार पाडले जातात. या सर्व कार्यक्रमांत कोयना खोऱ्यातील परंपरा आजही जपण्यात येते व त्यात रायगडची संस्कृतीचे मिश्रण केले जात आहे.
गावाचे वैशिष्ट्ये
देशाच्या संरक्षण खात्यात या गावातील तरुण मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. शिक्षक, विविध सरकारी नौकऱ्यांसोबत स्वयंउद्योग व खासगी नोकरीमध्येही हे गाव अग्रेसर असल्याने गावांत सुबत्ता आहे. शैक्षणिक स्तरावर गावाने आघाडी घेतली असून, गाव शंभर टक्के साक्षर बनले आहे.
पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा संपूर्ण गावाला रायगड जिल्ह्यात पुनर्वसनाचा निर्णय सांगण्यात आला तेव्हा छातीवर दगड ठेवत गावकऱ्यांनी तो निर्णय मान्य केला. गाव स्थलांतरित करताना, गावदेवी गावडाई-झोलाई देवीची विधिवत स्थापना करून त्याला गावदेवी श्री गावडाई झोलाई देवी म्हणून विकसित करण्यात आले व विद्यमान स्थितीत निसर्गसंपन्न परिसरात भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.