अंधारी वाट... अंदाजे -१७ ते -२० पर्यंत असलेलं तापमान... निसरड्या कडा.. बोचणारा वारा.. गोठवणारी थंडी.. हे सगळं सहन करत आम्ही केदारकंठ या १२६०० उंचीवर असलेल्या शिखरावर पोहचलो. यावेळी समोरचं दृश्य पाहून 'यासाठीच केला होता अट्टहास' याची अनुभूती आली. संपूर्ण थरारक अशा या केदारकंठच्या ट्रेकिंगचा अविस्मरणीय अनुभव
‘युथ हॉस्टेल’ या युनिस्कोअंतर्गत येणाऱ्या संस्थेबरोबर मी प्रवास सुरू केला. संध्याकाळी ७ च्या सुमारास मसुरी बेस कॅम्पला पोहोचले. जवळजवळ अंशांपर्यंत उतरलेला पारा रात्री -२ अंशांपर्यंत आला. आमचा ग्रुप ४२ जणांचा होता. सगळेच नवखे. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता संक्रीला निघालो. आठ दिवसांच्या शेड्युलमध्ये पहिल्या दिवशी मसुरीला रिपोर्टिंग, दुसऱ्या दिवशी मसुरी ते संक्री पूर्ण दिवस बसने प्रवास, तिसऱ्या दिवशी मॉर्निंग एक्सरसाईज, एक्लिमेटायझेशन, ओरिंएटेशन आणि रात्री फायर कॅम्प, तर पुढील चार दिवस हे ट्रेकिंगचे होते. संक्रीमधील वातावरण मसुरीच्या तुलनेत अधिक गारव्याचे. -४ डिग्रीच्या घरात तापमान होते. पाण्यात हात घातला की जणू काही बर्फात आपला हातच गोठलाय की काय असं वाटायचं. किती तरी वेळ संवेदना गोठल्यागत व्हायचं.
ट्रेकिंगच्या पहिल्या दिवशी 'जुडा का तलाव' हे ४ किमीचे अंतर कापायचे होते. कॅम्प लीडरच्या म्हणण्यानुसार, यंदा बर्फवृष्टी लवकर झाल्याने आम्हाला त्याचा आनंद सुरुवातीपासूनच मिळणार होता. आम्ही निसर्गाचा आनंद मनमुरादपणे लुटत होतो. पाठीवर ७ किलोची बॅग, अंगावर दोन-तीन जोडी कपडे आणि डाऊन जॅकेटसह हातात काठी घेऊन डोंगराच्या कडेकपारीवरून आम्ही वाटचाल करत होतो. उंचच उंच झाडे, निरभ्र आकाश, सर्वदूर पसरलेले बर्फाळलेले डोंगर तर जणू आम्हाला कुशीतच बोलावत होते. मध्येच विश्रांती मिळाल्यावर फोटोग्राफी करायचा मोह कुणालाही आवरत नव्हता. आमच्या केके ५ (केदारकंठ बॅच ५) ग्रुपमधील अर्धे ट्रेकर्स तर पहिल्यांदाच ट्रेकिंगचा आनंद घेत होते. पांढरा शुभ्र बर्फ बघून आपण हिमालयाच्या प्रवेशद्वाराजवळच आलो की काय, असाच भास होत होता. साधारण दुपारच्या २-३ च्या आसपास आम्ही जुडा का तलाव बेस कॅम्पला पोहोचलो. तिथे तंबूबाहेर बर्फच बर्फ होता. -७ अंशांवर पारा स्थिरावलेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता लुहासू या बेस कॅम्पकडे (अंतर ७ किमी) केके-५ टीमने प्रस्थान केले. त्याआधी जुडा का तलावाचे दर्शन घेतले. हा तलाव म्हणजे दोन तलावांचं बर्फात झालेलं रूपांतर. तलाव कसला? जणू नुसता टणक बर्फाचा थर... विलोभनीय रूप होतं त्या तलावाचं. बर्फावर खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. तासभर बर्फात खेळल्यावर आम्ही पुन्हा चालू लागलो. एका दरीजवळ येऊन पोहोचलो. दरी पाहताच सगळ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले; पण आम्हाला केदारकंठाला पोहोचायचं होतं. तेथील दृश्य नजरेसमोरून हटतच नव्हतं. एकामागोमाग डोंगररांगा, बर्फाच्छादित परिसर, निळे शुभ्र आकाश, त्यावर तरंगणारे पांढरे शुभ्र ढगांचे निरनिराळे आकार, ते हिमवृक्ष... या निसर्गाला कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आम्हा कुणालाही आवरता आला नाही. ३ च्या सुमारास आम्ही लुहासू बेस कॅम्पला पोहोचलो. तिथे -१५ अंश सेल्सिअस तापमानाचा अनुभव लुहासूमध्ये मिळाला.
तिसऱ्या दिवशी म्हणजे पहाटे ३ वाजता सर्वांना केदारकंठकडे निघायचे होते. आमचा केके-५ ग्रुप सकाळी ३ वाजता केदारकंठकडे रवाना झाला. ४ किमीचे अंतर; मात्र ६५ अंशांचा चढाव होता. त्यातच घसरण जास्त होत होती. प्रत्येकाचे पाय घसरत होते. भल्या पहाटे तेथील पारा अंदाजे -१७ ते -२० पर्यंत उतरला होता. अशा थंडीत चालायचं म्हणजे एक आव्हानच होतं. एका बाजूला डोंगरकडा दुसऱ्या बाजूला दरी आणि अंधारातून वाट... हे फारच अविस्मरणीय होतं.
एक जण तर पाय घसरून खाली आलाच; मात्र त्याच वेळी मागच्याने हातातील स्टिक बर्फाच्या आत अडकवली त्यामुळे त्याचा पाय अडकून तो आणखी खाली जाण्यापासून वाचला. सगळेच हवालदिल झाले होते; तरीही मोठ्या धैर्याने पुढची वाटचाल केली आणि सकाळी ७ वाजता केदारकंठ १२६०० उंचीवर असलेल्या शिखरावर पोहोचलो. खिशातून न निघणारा हात, गोठवणारी थंडी, जोरदार वाहणारा वारा अशा उंचीवर पोहोचलेलो आम्ही तेथील दृश्य बघताच अवाक् झालो. तिथे ७ वाजता एकाच वेळी होणारा सूर्योदय आणि चंद्रास्ताचा खेळ पाहण्याची संधी मिळत होती.
डोळ्याचे पारणं फिटणं म्हणजे काय, याचा अनुभव येत होता. दोन्ही दृश्य अप्रतिम, अवर्णनीय, शब्दांत किती सांगू तितके कमीच. सर्व जण ‘आ’ वासून निसर्गाची विविध रूपं बघत होते. सगळेच भारावून गेलेले. सर्वांचे कॅमेरे सरसावले. सर्वदूर पसरलेला पांढरा शुभ्र बर्फ, ते देवदार वृक्ष, बर्फाच्छादित डोंगराच्या रांगा... जणू आपण स्वर्गात राहून निसर्गाचा आनंद घेत आहोत, असाच भास होत होता. काही वेळ त्या अभूतपूर्व निसर्गाचा मनमुराद आनंद घेतल्यानंतर परत लुहासू बेस कॅम्पकडे रवाना झालो. येताना मात्र बर्फातून स्लायडिंग करण्याची संधी सोडली नाही. ११ वाजता आम्ही पोहोचलो. तेथून आम्ही आरगाव या बेस कॅम्पकडे मुक्काम केलो. आता आमचा परतीचा प्रवास होता आणि परतीच्या प्रवासात बहुतेक वेळा एकच मार्ग असलेल्या डोंगरदऱ्यातून यायचे होते.
चार दिवसांचा इतका मजबूत अनुभव होता की, आम्ही लवकरच आमच्या संक्री या मूळ ठिकाणी आलो. सोबत खूप सारे अनुभव, थरार, आठवणी घेऊन...निसर्गाची विविध रूपं, डोंगररांगा, डोंगरकडा, हिमवृक्ष, देवनार वृक्ष, सफरचंदाची झाडं, तो सूयोदय, तो चंद्रास्त सर्व काही डोळ्यांत साठवून संक्री ते डेहराडून आणि डेहराडून ते परत मुंबईकडे प्रस्थान केलं.