स्पर्शाची भाषा

वंदना अशोक हुळबत्ते
Monday, 8 July 2019

वेळ जात नव्हता म्हणून जुने फोटो काढून आठवणीला उजाळा देत बसले. माझ्या हाती माझा बालपणीचा जुना फोटो लागला.

कंबरेच्या दुखण्यामुळे सक्‍तीची विश्रांती घेत होते. घरातील सर्वजण कामात होते. वेळ जात नव्हता म्हणून जुने फोटो काढून आठवणीला उजाळा देत बसले. माझ्या हाती माझा बालपणीचा जुना फोटो लागला.

तो फोटो मला लीला मावशीमुळे मिळाला होता. तिने तो जपून ठेवला होता. मला आठवते, ही लीला मावशी एक-दोन आठवड्यांतून आमच्या घरी येत असे. आईला कामात मदत करत असे. तिच्या हातचे उप्पीट एकदम मस्त. मला आवडते म्हणून चारवडी नावाचा पदार्थ करून आणायची. आम्हा मुलांना मायेनं ती जवळ घ्यायची. माझ्यावर जरा जास्तच मर्जी होती. 

मला घेऊन ती बस्तीत, मंदिरात, भजनाला जाई. माझी आजी सोबत असे. दिवसभर मी त्यांच्यासोबत असे. माझ्या जन्माच्या दुसऱ्या दिवशी दत्त जयंती होती हे तिनेच मला सांगितले. आमच्या घरात कुणाचे वाढदिवस साजरे होत नसत, पण माझ्या जन्माचा आणि दत्त जयंतीचा काहीतरी संबंध आहे एवढेच तेव्हा कळले आणि दत्तावर श्रद्धा बसली ती कायमचीच.

लीला मावशी बेळगावची कन्नड बोलत असे. थोडे तोंड वाकडे असल्याने दात पुढे आलेले मराठी बोलताना फार गंमत व्हायची. या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नसे. कारण तिची भाषा स्पर्शाची होती. तिला मूलबाळ नव्हते. नवरा परागंदा झाल्याने ती एकटीच राहत होती. दुसऱ्याच्या मदतीवर आयुष्य काढावे लागत होते. अनेक ठिकाणी आलटून पालटून जात असे. काहीजण फटकारत; पण गरजवंताला अक्कल नसते हेच खरे. आठवतंय मला, महिन्यातील नंतर नंतर पंधरा दिवस आमच्याच घरी असे.
 
गुलमोहर कॉलनीत कुणाच्या तरी बंगल्यातल्या रिकाम्या जागी एका पत्र्याच्या शेडमध्ये ती राहत असे. एका लोखंडी पत्र्याच्या पेटीत तिचा संसार होता. सराफ कट्ट्यापासून तिच्या घरापर्यंत मी तिच्याबरोबर चालत जात असे. तिने खाऊ घातलेल्या गरमागरम दूध-भाताला काय चव असायची. कितीतरी आठवणी आहेत तिच्या; पण एक आठवण मी कधी विसरणार नाही. मी चौथीची परीक्षा दिली होती.

त्या सुटीत तिच्याबरोबर मी पहिल्यांदा रेल्वेत बसून पुण्याला गेले. ते घरही तिच्या नातेवाईकांचे नव्हतं. बहात्तर-त्र्याहत्तर साल. मी तिथे पहिल्यांदा टी. व्ही. बघितला. त्यावर पाहिलेल्या काबुलेवाल्याची गोष्ट आजही पुसटशी लक्षात आहे. पर्वती, सारसबाग, शनिवारवाडा, भाजी मंडई अशी कितीतरी ठिकाणे कधी बसने, कधी पायी हिंडवून दाखवली तिने. त्यावेळी मी आपण सिनेमाला जाऊया, असा हट्ट केला होता. लव-कुश सिनेमा असेल. त्याचे मोठे पोस्टर लावले होते. यावेळी नाही, पुढच्या वेळी नक्‍की जाऊ असे म्हणाली. ते खरे वाटले. 

या साऱ्या आठवणी मनात घर करून आहेत. या घटनेबद्दल मला माझ्या आईचेही कौतुक वाटते. इतक्‍या लहान मुलीला तिने इतक्‍या लांब, इतके दिवसकसं काय पाठवले? लीला मावशीवर आईचा असणारा विश्‍वास हेच त्याचे उत्तर आहे. तिचा स्नेह, आपलेपण, माया, जीवनात नाती कशी बनवायची आणि टिकवायची हेच शिकवून जातात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News