स्त्रीची सहनशीलता

साक्षी साळुंखे, सातारा
Sunday, 8 March 2020

नाही तिचा कमकुवतपणा तोच 
आहे तिचा कणखरबाणा!

त्या दिवशी रेडिओवरील कार्यक्रम ऐकताना काही शब्द माझ्या कानावर पडले, स्त्री आजची, कालची, किंवा उद्याची... काळ बदलला तरी तिची सहनशीलता तीच राहिल.

"सहनशीलता" म्हणजे नक्की काय हो? 
कोणत्याही परिस्थितीला सहन करण्याचं कौशल्य बरोबर ना? कधी विचार केलाय का, की स्त्री कशी काय एवढी सहनशील असेल? कशी ती प्रत्येक परिस्थितीला सामोरी जात असेल? मग ती परिस्थिती आनंदाची असो किंवा दुःखाची, ती ठाम निश्चयी असते.

आता पाहिलं तर प्रत्येक माणुस निराळा, त्याचे विचार निराळे अन् दृष्टिकोनसुद्धा, नाही का? काही माणसं असं म्हणतात, स्त्रिया गोष्टी सहन करतात म्हणजे त्यांना दुसर्या गोष्टी काही जमतच नाहीत, असलेल्या परिस्थितीला सहन करणं हे त्यांच कर्तव्यच आहे. मी या मताला ठाम विरोध करते, कारण स्त्री कोणतीही गोष्ट सहन करते याचा अर्थ असा नव्हे की ती कमकुवत आहे. उलट ती त्या परिस्थितीतुन पूर्ण विचार करुन, कौशल्य वापरुन बाहेर पडते.

देवाने बनवतानाच स्त्रीला सहनशील बनवलय. पहा ना, कोणत्याही एक सामान्य व्यक्ती फक्त ४५ युनिट्स पर्यंत कोणत्याही वेदना सहन करू पण एक स्त्री म्हणजेच एक आई बाळाला जन्म देण्याच्या वेळी तब्बल ५७ युनिट्स पर्यंत वेदना सहन करते. या वेदना काही साध्यासुध्या नसतात बरं का, यावेळी या वेदनांची तीव्रता एवढी असते की यामुळे शरीराची २० हाडं एकावेळी तुटू शकतात. कोठून येते ही एवढी ताकद? अहो ते दुसरं-तिसरं काही नाही ते असतं तिचं प्रेम, तिची उत्कंठ इच्छा अन् तो जिव्हाळा त्या बाळाप्रती म्हणूनच तर ती एवढ्या वेदना सहन करून त्या बाळाला जन्म देते. ती स्वतःला समजावते की ढळुन जायचं नाही अन् त्याच वेदनेला ढाल बनवून हिंमतीने त्या परिस्थितीला ती सामोरी जाते.

एका संशोधनात असं आढळुन आलं आहे की लहान मुलं आपल्या आईला जवळपास ३०० प्रश्न विचारतात आणि आई त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देते, कोणताही कंटाळा न करता, तेच तुलनेत आपण जर पुरुषांना पाहिलं तर त्यांच्या स्वभावात हे मुळीच  दिसणार नाही. स्त्रियांच ह्रदय हे पुरुषांच्या तुलनेत लहान असतं व त्याचे ठोके जास्त असतात, कारण त्यांच्या ह्रदयाला ही तेवढंच रक्त शुद्ध करावं लागतं जेवढं पुरुषांच्या ह्रदयाला..पण ते ह्रदय छोटं का असेना त्यात पुरुषांपेक्षा अमाप शक्ती, करुणा, जिव्हाळा हा कितीतरी पटीने जास्त असतो.

दाखले खुप आहेत आपल्याकडे; सीता, द्रौपदीपासुन ते सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांनी काय केलं? समाजाचा रोष झेलला, सहन केला आणि शेवटी स्वतःची नवी एक ओळख निर्माण केलीच ना! स्वतःचा बाणा त्यांनी कणखर बनवून समाजाचा उद्धार केला अन् इतकचं नाही आत्ताच्या  काळातसुद्धा अनेक जवान सीमेवर शहिद होतात. त्यांच्या पत्नी त्या जागेवर न ढळता ठोसपणे आपल्या कुटुंबाचा भार वाहतातच पण काही सैन्यात भरतीसुद्धा होतात, अगदी शत्रुलाही तोंड द्यायला तयार आहेतच की!

अगदी सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर स्त्री म्हणजे अगरबत्ती; जिच्यामध्ये आग आहे आणि संयम सुद्धा. जी विझत जरी गेली, तरी संपूर्ण घर दरवळुनच टाकते. पण बघा ना; देवाने स्त्रीला खुप सवडीने बनवलं आणि तिच्या भाग्यात मात्र सवड द्यायचीच विसरला वाटतं. ती कधीच स्वतःपुरता विचार करताना तुम्हाला दिसणार नाही, ती केवळ आपल्या घरच्यांसाठी, मुलांसाठी; स्वतःच्या सवयी, छंद सोडून जगते.

एक कथा रेडिओवर ऐकलेली होती, एका घरात आई सर्वांना चहा ठेवत असते पण स्वतःला बिना साखरेचा चहा करायला कंटाळा करते कारण तिला मधुमेहाचा त्रास असतो. ती विचार करते एवढ्याशा क्षुल्लक कारणासाठी कशाला आपली चिंता करा? अशा आणि अशा अजुन खुप गोष्टी असतात, ज्यामध्ये स्त्रियांनी स्वतःला वाहून दिलेल असतं, बाकिच्यांसाठी; परंतु युक्ती सुचवून कुटुंबाबरोबरच स्वतःचीही काळजी करु शकतात. म्हणजेच वरील उदाहरणच घेतलं तर ती आई आधी चहा ठेवते तेव्हा न साखर टाकलेला चहा काढुन ठेवू शकते व नंतर साखर टाकून बाकी सर्वांना देऊ शकते बरोबर ना! सांगण्याचा भावार्थ एवढाच की जर स्त्री कणखर असेल तरच ती कुटुंब व्यवस्थित सांभाळु शकेल.

"समजुन घेईल ती!" हे वाक्य फार वापरलं जातं बरं का आपल्यात, मुलाला रात्री मित्रांसोबत गेल्यामुळे घरी यायला वेळ झाला तर तो म्हणतो घेईल आई समजून, नवऱ्याला ऑफिसमध्ये वेळ झाला; घरी बायको वाट पाहत असते पण तो तिला जबाबदारीने न सांगता, समजुन घेईल ती; म्हणतो एवढं काही नाही, पण असं नसतं, प्रत्येकानेच समजायला हवं ना, शेवटी स्त्रीला पण मन आहे, तिलाही भावना आहेतच की!

कुठेतरी वाचण्यात आलेलं माझ्या की "सहनशीलता आणि संयम" हा काही कमकुवतपणा नाही; ती तर असते एक आंतरिक शक्ति, जी प्रत्येकाजवळ असेलच असं नाही! किती छान मतितार्थ दडलाय ना यात! म्हणुनच स्त्री ही सहनशीलतेचं असं समर्पक उदाहरण आहे की ती येईल त्या परिस्थितीला मजबूतपणे सामोरी जाईल, कधीच आनंदाने हुरळून जाणार नाही किंवा दुःखाने होरपळूनही जाणार नाही आणि या पाठचं एक खरं कारण मी सांगु का? कारण प्रत्येक स्त्री इतरांच्या वेदनांपेक्षा संवेदना जाणते आणि खरचं वेदनांच्या संवेदना जेव्हा सहवेदना म्हणून जाणल्या जातात ना; त्याचवेळी तिच्यासारखी आदर्श मूर्ती सर्वांसमोर उभी राहते.

"एक स्त्री म्हणजे नाही कुणी अबला
तुमचे पुरुषी स्वमित्त्व गाजवायला
ती तर आहे एक वाघीण
वेळ आलीच तर प्रत्येकाला त्यांची वेळ दाखवायला!"

एकूणच काय तर द्रौपदी ते निर्भयापर्यंतच्या पुरुषसत्ताक व्यवस्थेत देखील स्त्रियांनी आपला कणा कधीही मोडू दिला नाही. त्यांना फक्त हवा तो एक चांगला आधार जो त्यांना समजू शकेल; पण आवर्जुन म्हणावसं वाटेल मला सर्वच स्त्रियांसाठी की
"जाणतात सर्वच जण नाही जमणार 
कधी तुम्हाला स्वतःपुरता विचार करायला
करता नवी ओळख निर्माण तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर 
सहन करुन साऱ्या परिस्थितीला
म्हणूनच सलाम तुमच्या या सहनशीलतेला
सलाम तुमच्या या सहनशीलतेला..!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News