वेळेची कपात कबड्डीच्या मुळावर

युवराज पाटील
Saturday, 8 June 2019
  • प्रो कबड्डीमुळे ग्रामीण खेळ घराघरात पोचला. टीव्ही चॅनेलवरून थेट प्रक्षेपणामुळे तो फास्ट झाला. त्यात वक्तशीरपणा, शिस्तबद्धता आली
  • मात्र ग्रामीण भागातील कबड्डीसमोर आजही अनेक आव्हाने आहेत. ती पेलताना संघ, खेळाडूंची दमछाक होत आहे, तर स्पर्धेत खेळाडूंचा कस लागत आहे.

प्रो कबड्डीमुळे ग्रामीण खेळ घराघरात पोचला. टीव्ही चॅनेलवरून थेट प्रक्षेपणामुळे तो फास्ट झाला. त्यात वक्तशीरपणा, शिस्तबद्धता आली; मात्र ग्रामीण भागातील कबड्डीसमोर आजही अनेक आव्हाने आहेत. ती पेलताना संघ, खेळाडूंची दमछाक होत आहे, तर स्पर्धेत खेळाडूंचा कस लागत आहे.

ग्रामीण भागातील कबड्डी स्पर्धा म्हणजे उपलब्ध जागेत शामियाना उभारलेला. व्यासपीठावर किमान ४० ते ५० खुर्च्या. एका कोपऱ्यात विंगेत पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्हे मांडलेली, तर दुसऱ्या कोपऱ्यात पोडियम. मैदानाच्या चारही बाजूंना भव्य कबड्डी स्पर्धेचे होर्डिंग. त्यावर देणगीदारांच्या प्रेरणेने असा उल्लेख. वातावरणात एकूणच लगबग. कबड्डीचे सामने प्रामुख्याने प्रकाशझोतातच खेळवले जातात. त्यामुळे स्पर्धेच्या उद्‌घाटनासाठी पाहुण्यांना सातची वेळ दिलेली असते, तर ते येतात आठला.

दरम्यान, गर्दीतले प्रेक्षकही मॅच सुरू होत नसल्यामुळे वैतागलेले असतात. मॅच सुरू करावी तर पाहुण्यांचा अपमान व्हायचा आणि थांबावे तर खेळाडू आणि प्रेक्षकांचा अंत किती पाहणार अशा द्विधा मन:स्थितीत संयोजक असतात. अशात पाहुणे येतात आणि भाषणबाजी, सत्काराचे सोपस्कार पूर्ण करून स्पर्धेला सुरवात होते. कबड्डी सामन्यांचे वर्षानुवर्षे चालत आलेले हे चित्र.  

प्रो कबड्डीचा वक्तशीरपणा स्थानिक स्पर्धेत दिसत नाही. याचा परिणाम सामन्यावर पाहायला मिळतो. कबड्डी सामन्याचा कालावधी ४० मिनिटांचा असतो. यात २० मिनिटांचा पूर्वार्ध व २० मिनिटांचा उत्तरार्ध. त्यामुळे या वेळेत प्रचंड इर्षा पाहायला मिळते. प्रो कबड्डीच्या नियमामुळे खेळ वेगवान झाला. शेवटच्या क्षणापर्यंत निकालाची उत्कंठा असते. शौकिनांनी खेळाला डोक्‍यावर घेतले आहे. मोठ्या प्रमाणात खेळाडू कबड्डीकडे वळले आहेत. स्पर्धेला वाढलेला प्रेक्षकवर्ग आणि खेळाडूंची संख्या यामुळे संयोजकांच्या संख्येतही वाढ झाली. कमी वेळेत हजारो लोकांपर्यंत पोचण्याचे साधन म्हणून कबड्डी स्पर्धेकडे राजकीय लोक पाहू लागले. त्यामुळे स्पर्धेची संख्या वाढली; मात्र वेळेचा अभाव जाणवू लागला. पूर्वी दोन-तीन दिवस चालणारी स्पर्धा आता एक दिवसावर आली. या स्पर्धेत सुमारे ६० ते १०० संघ सहभागी होतात.

त्यामुळे एका दिवसांत स्पर्धा पूर्ण करण्याचे आव्हान संयोजकांसमोर असते. त्यावर मात करत चक्क सामन्याचा कालावधी कमी करण्याचा फंडा संयोजकांनी शोधून काढला. त्यामुळे कबड्डीचे सामने पाच, सात, दहा, पंधरा मिनिटांत होऊ लागले. वेळ कमी झाल्याने खेळाडूंच्या नैसर्गिक खेळावर मात्र गदा आली. कमी कालावधीत चांगला खेळ करणे आणि संघाला विजय मिळवून देणे याचे आव्हान खेळाडूंसमोर उभे राहिले. यात खेळाडूंच्या एखाद्या चुकीमुळे सामनाही हातातून जाऊ लागला. परिणामी सामन्यातील चुरस कमी होऊ लागली.

खेळाडूंबरोबर प्रशिक्षकांनाही सामन्याची व्यूहरचना आखताना कसब पणाला लावावे लागत आहे. त्यामुळे स्वतःचे नियम ठरवून कबड्डी स्पर्धा घेणे म्हणजे खेळाला दुय्यम स्थान देण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. खेळाला व खेळाडूंना न्याय द्यायचा असेल तर नियमाप्रमाणेच स्पर्धा व सामने घेण्याची मागणी होत आहे.

प्रेक्षक गॅलरीत केवळ  संघाचे समर्थक

एक दिवसीय स्पर्धेतील सर्व सामने रात्रीत पूर्ण होतात. कधी कधी स्पर्धा रात्री ८ ला सुरू होते व पहाटे पाचला संपते. त्यावेळी प्रेक्षक गॅलरीत केवळ संघाचे समर्थक असतात. 

शालेय स्पर्धांतही नियमाला बगल
शालेय तालुकास्तरीय स्पर्धेत सर्व शाळांना सहभाग घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे या स्पर्धेत सुमारे ५० ते ७० शाळा सहभागी होतात. ही स्पर्धा एका दिवसात पूर्ण करायची असते. त्यामुळे येथे तर तीन ते पाच मिनिटांचे सामने घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.

सामन्याचा कालावधी कमी झाल्यामुळे प्रशिक्षकांना सामन्याची रेकी आखता येत नाही. नियोजनबद्ध खेळ झाला नाही तर काय करावे असा प्रश्‍न प्रशिक्षकांना सतावतो. - दीपक पाटील,  एनआयएस प्रशिक्षक, कबड्डी.

कबड्डीतील चुरस कायम राखण्यासाठी नियमाप्रमाणे सामने होणे गरजेचे आहे.    - शंकर पोवार, कबड्डी प्रशिक्षक, इचलकरंजी.

कमी कालावधीमुळे खेळाडूंना नैसर्गिक खेळ करता येत नाही. - विशाल तानवडे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News