तुल्यबळ टोळ्यांचा थरारक रक्तपात 'रक्तांचल' वेबसिरीज उलघडणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 6 June 2020

विजय सिंग हा शिकून कलेक्‍टर होण्याची स्वप्नं पाहणारा पूर्वांचलमधला एक साधासुधा मुलगा. खाण कामगारांची बाजू मांडणाऱ्या वडिलांची डोळ्यासमोर झालेली हत्या विजय सिंगचा मार्ग बदलते. वडिलांच्या हत्येचा बदला घेत विजय सिंग गुन्हेगारी विश्वात प्रवेश करतो. तिथं त्याचा सामना होतो कुख्यात गुंड वसीम खान याच्याशी. स्थानिक नेत्याच्या पाठिंब्यावर वसीम खानने गुन्हेगारीचं साम्राज्य संपूर्ण पूर्वांचलमध्ये पसरवलेलं असतं. विजय सिंग उघडपणे वसीम खानच्या साम्राज्याला आव्हान द्यायला सुरुवात करतो आणि त्यातून सुरू होतो दोन तुल्यबळ टोळ्यांमधला रक्तपात.

टोळीयुद्ध, रक्तपात, शिवीगाळ हा मालिका हिट होण्याचा फॉर्म्युला बनल्यासारख्या एकामागून एक गुन्हेगारी विश्‍वावर आधारित मालिका वेबविश्‍वात दाखल होत आहेत. याच धर्तीवरील रक्तांचल ही नवी मालिका एमएक्‍स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. कथानकात फारसं नावीन्य नसलं तरी सादरीकरणाच्या बळावर ही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.

विजय सिंग हा शिकून कलेक्‍टर होण्याची स्वप्नं पाहणारा पूर्वांचलमधला एक साधासुधा मुलगा. खाण कामगारांची बाजू मांडणाऱ्या वडिलांची डोळ्यासमोर झालेली हत्या विजय सिंगचा मार्ग बदलते. वडिलांच्या हत्येचा बदला घेत विजय सिंग गुन्हेगारी विश्वात प्रवेश करतो. तिथं त्याचा सामना होतो कुख्यात गुंड वसीम खान याच्याशी. स्थानिक नेत्याच्या पाठिंब्यावर वसीम खानने गुन्हेगारीचं साम्राज्य संपूर्ण पूर्वांचलमध्ये पसरवलेलं असतं. विजय सिंग उघडपणे वसीम खानच्या साम्राज्याला आव्हान द्यायला सुरुवात करतो आणि त्यातून सुरू होतो दोन तुल्यबळ टोळ्यांमधला रक्तपात.

80 च्या दशकातील सत्य घटनांवरून प्रेरित झालेली ही मालिका आहे. त्या वेळची पूर्वांचलमधली राजकीय, सामाजिक परिस्थिती, कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारी जगत याची विस्ताराने मांडणी या मालिकेत करण्यात आली आहे. सुरुवातीच्या भागापासूनच विजय सिंगची कथा पकड घेऊ लागते. शांत डोक्‍याने प्रतिस्पर्ध्यावर वार करणारा विजय सिंग गुन्हेगार असूनही प्रेक्षकांची सहानुभूती मिळवत राहतो. नंतरच्या काही भागांत मात्र दोन टोळ्यांमधील संघर्षामध्ये कथा रेंगाळत राहते. एका टोळीतील सदस्याची हत्या होते, त्याचा बदला म्हणून दुसऱ्या टोळीतील सदस्याची हत्या केली जाणार याचा सहज अंदाज बांधता येतो, यामुळे कथानक एकसुरी बनत जातं. कथेला वेग मिळतो तो सनकी पांडे याच्या एण्ट्रीने. दोन गटांमधल्या लढाईला वेगळं वळण देण्यासाठी सनकी, सीमा, कट्टा यासारख्या व्यक्तिरेखा मदत करतात. त्यांच्याभोवतीच्या कथानकामुळे टोळीयुद्धातला सततचा रक्तपात पाहणं थोडं सुसह्य होतं. मालिकेच्या शेवटचा भाग अतिशय रंजकपणे संपवून दुसऱ्या सीजनची तयारी करण्यात आली आहे. विजय सिंगचं नेमकं काय होतं, पूर्वांचलवर कोणाचं वर्चस्व राहतं यासाठी दुसऱ्या सीजनची वाट पाहायला हरकत नाही.

विजय सिंगची भूमिका क्रांती प्रकाश झा याने चांगली साकारली आहे त्या तुलनेत निकेतन धीरचा वसीम खान फारसा प्रभाव पाडत नाही. विक्रम कोचर आणि रवी खानविलकर यांनी सनकी पांडे आणि पुजारी सिंग या व्यक्तिरेखा खूप सुंदर पद्धतीने रंगवल्या आहेत. 80 च्या दशकातील वातावरण उभं करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे. एकंदरीत मोठ्या संख्येने येणाऱ्या गुन्हेगारी विश्वाशी निगडित मालिकांमध्ये फार थोड्या मालिकांना प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यश आलं, त्यामधील ही एक मालिका आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News