धागा मायेचा...रक्षाबंधनाचा

लक्ष्मण जगताप, बारामती
Monday, 3 August 2020
  • बहीण म्हणजे आईसारखाच मायेचा दुसरा सागर. माझी दिदी, माझी ताई, माझी अक्का ही तिला दिलेली नावे.
  • बहीण थोरली असो किंवा धाकटी तिला आपला भाऊ कायमच प्रिय असतो.
  • हे नातंच निराळं असतं.

बहीण म्हणजे आईसारखाच मायेचा दुसरा सागर. माझी दिदी, माझी ताई, माझी अक्का ही तिला दिलेली नावे. बहीण थोरली असो किंवा धाकटी तिला आपला भाऊ कायमच प्रिय असतो. हे नातंच निराळं असतं. भांडताना पाठीत धपाटे घालणारी आणि खेळताना जखम झाल्यावर हळवी होऊन रक्त पुसणारी बहीणच असते. आईवडीलांनी आणलेल्या खाऊसाठी घासाघीस करणारी आणि मायेने घासातील घास भरवणारी बहीणच असते.. कधीकधी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भावाला किडनी देऊन जीवदान देणारी बहीणच असते.

आपल्या दादाला हट्ट करण्याचे जवळचं आणि समजून घेणारं नातं म्हणजे बहीण. चूक झाल्यावर सांभाळून घेणारं नातं म्हणजे बहीण. अशा अनेक रुपात वावरणारी आपली ताई दादालाही तितकीच प्रिय असते.  असं हे ताई दादाचं नातं मायेच्या धाग्यात गुंफून ठेवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन  दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. ती भावाकड्न संकटाच्या वेळी रक्षणाची हमी घेते. ज्या ज्या वेळी बहीण अडचणीत असेल, संकटात असेल त्यावेळी भावाने मदतीला धावून जाण्याची जाणीव त्या राखीतून होत असते. अशा या सणाला आपल्या संस्कृतीत पौराणिक काळापासून मोठी परंपरा आहे. मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने रक्षाबंधन सण साजरा केला जातो. त्याविषयी अनेक गोष्टी, कथा, दाखले सांगितले जातात.

बहिण भावाच्या या नात्यात प्रेम, माया आणि जिव्हाळा असतो. तो आपले जगणं आनंदी करत असतो. तर सुख दुःखात एकमेकांना साथसंगत देत असतो. त्यामुळे बहीण भावाच्या नात्याला मायेची एक वेगळी किनार असते.

अलीकडच्या काळात या नात्यात दुरावा कटुता पहायला मिळते. हल्ली माणसाचं सगळं जगणं पैसा आणि संपत्ती या भोवती गुरफटलं आहे. म्हणून त्याला नात्याचा विसर पडत चालला आहे. वडीलोपार्जित संपत्तीत बहिणीच्या वाटणीवरुन दावे उभे राहत आहेत. त्यावेळी वाटते रक्ताचे नात्यापेक्षा वाटणीचं  नातं माणसाला कुठे घेऊन जाईल. समजंसपणा आणि तडजोडीतून असे प्रश्न सोडवता येऊ शकतात. परंतु वादविवादातून ही नाती कायमची तुटली जातात. अशावेळी आपल्या भावाच्या शिक्षणासाठी  सोन्याचे दागिने गहाण ठेवणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या बहीणीच्या निस्वार्थी प्रेमाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. इतकं मोठं मन बहिणीचं असतं... माझा भाऊ खूप मोठा व्हावा, त्याच्या स्वप्ने, इच्छा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. अशीच प्रत्येक बहिणीची इच्छा असते. तिला भावाकडून कशाचीही अपेक्षा नसते. माझा भाऊ सुखी असावा एवढीच तिची इच्छा असते.

आजच्या काळातही अशा अनेक बहिणी आहेत ज्यांनी भावासाठी आयुष्य पणाला लावले. भावाच्या प्राणासाठी किडनी, यकृत यासारखे अवयव देऊन माया आणि त्याग काय असतो हे दाखवून दिले. अशा आभाळाएवढ्या मनाच्या बहिणींचे उपकार न फिटणारे आहेत.

प्रेम, आपुलकी, वात्सल्य, यांचे मूर्तीमंत प्रतिक असणारी बहीण ग्रेटच असते. रक्षाबंधनच्या निमित्ताने बहीण या नात्याला जपूयात.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News