या व्यवसायातून हजारो तरूण करोडपती

राजकुमार भीतकर
Thursday, 16 January 2020

नेटवर्क मार्केटिंगला भारतात उज्ज्वल भविष्य आहे. येणारा काळ नेटवर्क मार्केटिंगचा आहे. १९९५ ते २०१५ पर्यंत या उद्योगाकडे नकारात्मकपणे पाहिले गेले. कारण काही कंपन्यांकडून अनेकांची फसवणूकही झाली. परंतु, सप्टेंबर २०१६ केंद्र सरकारने ‘डायरेक्‍ट सेलिंग’बाबत दिशानिर्देश जारी केले. त्यामुळे फसवणुकीला आळा बसला. येणाऱ्या पिढीसाठी इतक्‍या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणारा दुसरा कोणताही वैध व्यवसाय उपलब्ध नाही.

यवतमाळ :  देशात वाढती बेरोजगारी हा मोठा यक्ष प्रश्‍न आहे. त्यात वाढती महागाई तेल ओतण्याचे काम करते. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. त्यामुळे सरकार प्रत्येक नागरिकाला रोजगार देऊ शकत नाही. या परिस्थितीत ‘नेटवर्क मार्केटिंग’ मधून २०२५ पर्यंत सर्वाधिक रोजगार निर्मिती होऊ शकते. ही बाब एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळेच भारत सरकारने डायरेक्‍ट सेलिंगबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

भारतात नेटवर्क मार्केटिंगची सुरुवात १९८० मध्ये झाली. काही विदेशी कंपन्यांनी सुरुवात केली. त्यानंतर देशी कंपन्याही बाजारात उतरल्या. परंतु, लोकांची साखळी निर्माण करणारा हा व्यवसाय काही बोगस कंपन्यांमुळे बदनाम झाला. परिणामी केंद्र सरकारला दखल घ्यावी लागली. २०१६ मध्ये सरकारने याबाबत धोरण जाहीर केले. डायरेक्‍ट सेलिंगबाबत दिशानिर्देश जारी केले. आता या व्यवसायाला कायदेशीर चौकट प्राप्त झाली आहे. अनेक बोगस कंपन्या बंद झाल्या आहेत. लोकांना आता फसवले जाणार नाही, याचा विश्‍वास आला आहे. आज या व्यवसायातून हजारो मध्यमवर्गीय कुटुंबे करोडपती झाल्याची उदाहरणे आहेत.

‘केपीएमजी’ व ‘एफआयसीसीआय’च्या २०१६च्या सर्व्हेनुसार २०२५ पर्यंत डायरेक्‍ट सेलिंग हा व्यवसाय भारतात ६४ हजार ५०० कोटींपर्यंत पोहोचला असेल. तसेच या व्यवसायातून एक कोटी ४५ लाख तरुणांना स्वयंरोजगार मिळाला असेल. त्यामुळे या व्यवसायाचे आकर्षण वाढत आहे. ॲन्ड्रॉइड मोबाईलमुळे या व्यवसायाची व्याप्ती वाढली आहे. घराघरांत हा व्यवसाय पोहोचत आहे. भारतात तरुणांची लोकसंख्या अधिक आहे. दरवर्षी ९० लाख पदवीधर देशभरातील विद्यापीठांमधून बाहेर पडतात. त्या सर्वांना रोजगार देणे शक्‍य नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा तरुणांना स्वयंरोजगाराचा उपदेश देतात. २०२५ पर्यंत सर्वाधिक रोजगार या व्यवसायातून निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात यायला उत्सुक आहेत. दक्षिण कोरियाची ‘ऑटोमी ग्लोबल’ नावाची कंपनी येत्या एप्रिलमध्ये देशात येण्याची शक्‍यता आहे. अमेरिका, जपानसह जगातील १३ देशांत असलेल्या या कंपनीने दिल्लीत कॉर्पोरेट ऑफिस सुरू केले आहे. तर, सेफशॉपसह अनेक देशी-विदेशी कंपन्यांमधून तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या डायरेक्‍ट सेलिंग कंपन्यांमुळे परंपरागत व्यवसायाला फटका बसला आहे. परंतु, मध्यवर्गीय लोकांची स्वप्नपूर्ती करण्याची क्षमता या उद्योगात असल्याने अनेकांचा कल डायरेक्‍ट सेलिंगकडे वाढत आहे.

२०२४ पर्यंत भविष्य काय?
भारतात २०२४ पर्यंत या व्यवसायासाठी ‘रेड कार्पेट’ आहे. जे विकसित देश आहेत, त्यांनी ‘एमएलएम’ व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. कारण हा व्यवसाय लोकांचा आहे. तरुणाईची स्वप्नपूर्ती करणारा आहे. हा व्यवसाय गरीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत, विद्यार्थी व नोकरदार आदी कोणतीही व्यक्ती करू शकते. त्यासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज नाही. आपली नोकरी, व्यवसाय सांभाळूनही हा व्यवसाय करता येतो. तसेच २०२५ पर्यंत या व्यवसायातून सरकारला नऊ हजार कोटींचा फायदा होईल, असा अंदाज सरकारकडूनच व्यक्त केला जात आहे. सरकारचे उत्पन्न वाढविण्यात व रोजगार निर्मितीत या व्यवसायाची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

चार विद्यापीठात अभ्यासक्रम
दिल्लीसह देशातील विविध विद्यापीठात ‘डायरेक्‍ट सेलिंग’ या विषयावर अभ्यासक्रम सुरू आहेत. हा अभ्यासक्रम एमबीएचा भाग असून ‘डायरेक्‍ट सेलिंग इंडस्ट्री’ला भविष्यात लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविणे हा अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. अमेरिका, व्हिएतनाम, जपान, दुबई, कोरिया, थायलंड आणि मलेशिया आदी देशांमध्ये गेल्या ५० वर्षांपासून अशा प्रकारचे अभ्यासक्रम शिकविले जातात.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News