तिसरा डोळा आणि आम्ही...

यिनबझ
Sunday, 6 September 2020

खूप वेळा वाटतं की तुम्हाला कदाचित तिसरा डोळा असतो का काय! त्या डोळ्याने सगळं बघता येतं पण व्यक्त होत नाही. पण या डोळ्याने माणसं टिपता येतात

प्रिय शिक्षक,
सर्वप्रथम शिक्षक दिनाच्या बिलेटेड शुभेच्छा! म्हणलं ज्यासाठी एवढं सगळं लिहित आहे ते काम पहिलं करून घ्यावं. नंतर आहेच आपला लेखनप्रपंच!

तुम्ही आम्हाला सदानकदा मार्गदर्शन देतच असता. खूप वेळा ओरडता, चिडता, रागावता, वर्गाबाहेर काढता, काही भन्नाट शिक्षा देता. तेवढ्यापुरतं वाईट वाटतं पण नंतर आम्ही आमचा विद्यार्थीसुलभ भाव सोडत नाही की तुम्ही शिक्षकांची वृत्ती सोडत नाही. पण तुम्ही शिक्षकांच्या भुमिकेपलिकडेही काही वेळा भावता. एक खंबीर पालक म्हणून आमच्या सर्वांच्या मागे उभे असता. आधार देता. अर्थातच या मध्ये दुजाभाव कुठेच नाही.

वर्गातला एकदम हुशार मुलगा असो किंवा एखादा कधीतरी अंघोळ न करून झोपेतून उठून आणि वर्गात झोपा काढणारा मुलगा असो तुमची वागणूक सर्वांना सारखीच असते. काही शिक्षक हे चितळे मास्तरांसारखे असतात की ते आले की वर्ग शांत होतो आणि काही शिक्षक हे आपले दामले मास्तर... कितीही केलं तरी एक प्रश्न काही सरळ मुलांना देता येत नाहीच.

शाळेत असताना आम्ही फारच गप होतो पण कॉलेजला मात्र मॅडम फळ्याकडे बघत असल्या की कुठे चित्रविचित्र आवाज काढ, कोणाचा शर्ट ओढ, कोणत्या तरी मुलीला उगाच हाक मार किंवा समोरचा शिक्षक जर नवीन असेल तर त्यालाच काहीतरी पेन पेन्सिल फेकून मार इतकं सगळं आम्ही करतोच. तुम्ही सगळं बघत असता पण आम्हाला काहीच बोलत नाही. मुद्दाम दुर्लक्ष करता. अर्थात कॉलेज जीवन कोणाला आवडत नाही. निर्बंध मुक्त जीवन वाट्टेल ते करायचं ही आमची कॉलेजची व्याख्या. आमच्यात पु. ल. यांच्या व्यक्ती आणि वल्ली सारखे नंदा प्रधान असतात, एखादा सतत मुलींशी बोलणारा नाथा कामत असतो, एखादा दादागिरी करणारा बबडू असतो किंवा एखादी सुंदर इंदू वेलणकर पण असतेच. नंदा कामत आणि इंदू वेलणकर काय करतात किंवा नाथा कामत आता कोणाबरोबर असतो हे तुम्हाला बरोबर माहित असतंच, पण तटस्थपणे बघत राहण्याशिवाय तुम्ही काही करत नाही. तुम्हाला पुढे काय घडणार हे माहीत असतं पण मुलांना काय घेऊ द्यायचं आणि कुठे थांबवायचं हे तुम्हालाच माहीत असतं.

खूप वेळा वाटतं की तुम्हाला कदाचित तिसरा डोळा असतो का काय! त्या डोळ्याने सगळं बघता येतं पण व्यक्त होत नाही. पण या डोळ्याने माणसं टिपता येतात. एखादा छान गाणं म्हणत असला की त्याला भीती का वाटेना 'प्रयत्न कर' म्हणून स्पर्धेला उभं करणं, एखादा छान फोटो काढत असेल तर त्याला कार्यक्रमाचं फोटोचं सगळं काम देणं, थोडक्यात कॉलेज लाईफ किती पण मनमौजी असली तरी पण तिला आकार देण्याचं काम तुम्हीच करता. दगडातून छान मूर्ती घडवणारे मूर्तिकार आहात तुम्ही. तो दगड किती पण ओबडधोबड असला तरी त्यातून सुबक मूर्ती बनवत आहात तुम्ही.

तुम्ही आम्हाला खरं जग दाखवत असता ते पण आमच्याच विश्वात येऊन. किती आणि काय काय.... आणि यासाठी मोबदला म्हणून काय घेता? कित्येक वेळा मनस्ताप पण सहन करता पण त्याचा राग मात्र कधीच आमच्यावर काढत नाही. आम्हाला फक्त आनंद देता. काही पण होवो आम्हाला फक्त आनंद देता. स्वतःला काहीपण येऊ देत त्याची तुम्हाला चिंता नसते. शिक्षकदिनाच्या निमित्ताने लिहितोय पण परिपूर्ण नाही. अर्थात ते तुम्हीच करणार आहात.

- सुमेध श्रीवर्धन बागाईतकर 

(टीवाय, बीसीए सायन्स, एच व्ही देसाई काॅलेज, पुणे)

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News