‘त्या’ तिघींना मिळाली जगण्याची नवी उमेद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020
  • घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यावर कुटुंबाच्या पडलेल्या जबाबदारीमुळे जीवनाची परीक्षा देण्याची वेळ आलेल्या तीन महिलांनी अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला.

घरातील कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्यावर कुटुंबाच्या पडलेल्या जबाबदारीमुळे जीवनाची परीक्षा देण्याची वेळ आलेल्या तीन महिलांनी अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. यातच पुण्यातील भोई फाउंडेशनने अर्धवट शिक्षण राहिलेल्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली अन् हिच संधी ओळखून ‘त्या’ तिघींनी दहावीची परीक्षा दिली. बहिस्थरीत्या परीक्षा अर्ज भरून त्या परीक्षेला सामोरे गेल्या.

पुण्यातील भोई फाउंडेशनने अर्धापूर तालुक्यात पुण्यजागर प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासोबत त्यांच्या पालकांचेही शिक्षण व्हावे, यासाठी पुढाकार घेतला जातो. 
दरम्यान, तालुक्यात अशाच तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना मागील काही वर्षांत घडल्या आहेत. या कुटुंबातील तीन महिलांनी आपले अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा संकल्प यंदा केला. यामध्ये धामदरी येथील सुनीता कदम, मालेगाव येथील मंगला इंगोले व अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे यांचा समावेश आहे. या तिघींनी बहिस्थ विद्यार्थिनी म्हणून अर्धापूर येथे दहावी परीक्षेचा अर्ज भरला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा केंद्रावर ही परीक्षा दिली.

पाल्यांसोबत शैक्षणिक प्रवाहात येण्याचा निर्धार 

कुटुंबातील कर्त्यांनी आत्महत्या केल्यामुळे आमच्या कुटुंबावर संकट आले होते. या संकटातून सावरताना आम्हाला भोई फाउंडेशनने सहकार्य केले. आमच्या पाल्यांना शैक्षणिक मदत देण्यात येत आहे. पाल्यांसोबत आपणही शैक्षणिक प्रवाहात यावे हा निर्धार केला. जीवनातील अनेक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागत असतानाच आम्ही यंदा दहावीची परीक्षा देत आहोत, अशा भावना मंगला इंगोले, सुनीता कदम व लक्ष्मी साखरे या महिलांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.

खासगीरीत्या परीक्षा देण्यासाठी १७ क्रमांकाचा अर्ज भरावा लागतो. जिल्हा परिषदेच्या चार दशकांच्या इतिहासात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीने परीक्षा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या शेतकरी महिलांनी परीक्षा दिल्याने इतर महिला, मुलींना प्रेरणा मिळणार आहे. 
- डॉ. शेख, मुख्याध्यापक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News