या व्यावसायिक अभ्यासक्रमांना दूरशिक्षणाद्वारे प्रवेश देता येणार नाही - यूजीसी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 August 2020
  • कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासूनच देशातील सर्व शिक्षण संकुले बंद ठेवण्यात आली होती.
  • शिक्षण संकुलांना बंद ठेऊन आता जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी लोटला, परंतु आजही शाळा महाविद्यालय यासारख्या शिक्षण संस्था पुन्हा प्रत्यक्षात केव्हा सुरु होतील हे कोणीच सांगू शकत नाही.

पुणे :-  कोरोना विषाणूचा प्राधुरभाव वाढत असल्याने मार्च महिन्यापासूनच देशातील सर्व शिक्षण संकुले बंद ठेवण्यात आली होती. शिक्षण संकुलांना बंद ठेऊन आता जवळजवळ सहा महिन्याचा कालावधी लोटला, परंतु आजही शाळा महाविद्यालय यासारख्या शिक्षण संस्था पुन्हा प्रत्यक्षात केव्हा सुरु होतील हे कोणीच सांगू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये याकरीता सरकारने विद्यार्थ्यांचे प्रवेश करवून शिक्षणसंस्थांना ऑनलाईन वर्ग भरविण्यास सांगितले. परंतु पारंपरिक अभ्यासक्रम वगळता असे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत जे ऑनलाईन पद्धतीने शिकवले जाऊ शकत नाहीत. व्यावसायिक अभ्यासक्रमातील हॉटेल मॅनेजमेंट, अभियांत्रिकी, वास्तुकला अश्या बारा विद्याशाखेतील अभ्यासक्रमांचे आणि एम.फील, पीएच.डी ह्यासारख्या अभ्यासक्रमांचे दूरशिक्षणाद्वारे प्रवेश देता येणार नाहीत असे विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने स्पष्ट केले आहे. या व्यववसायिक अभ्यासक्रमांबद्दल परिपत्रक काढून ती माहिती यूजीसीने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. 

यूजीसीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये खाजगी शिकवणी संस्थांशी करार करून सार्वजनिक अथवा खाजगी विद्यापीठांना त्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रम हे मुक्तशिक्षण किंवा दूरशिक्षण याद्वारे प्रवेश देऊन चालवता येणार नाही असे नमूद केले आहे. दूरशिक्षण किंवा मुक्तशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रवेश हे यावर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर तसेच फेब्रुवारी ते मार्चपासून घेतले जातील. तसेच देशातील प्रत्येक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही उच्च शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामार्फत पारदर्शक पद्धतीनेच राबवण्यात यावी असे यूजीसीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांना पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे असे यूजीसीने सांगितले.  तसेच अनेक खाजगी संस्था व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक करतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण संस्थांमध्ये दूरशिक्षण अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याआधी यूजीसीच्या अधिकृत संकेत स्थळावर संबंधित शिक्षणसंस्था ही अभ्यासक्रम राबवण्याकरीता यूजीसीशी संलग्न आहे कि नाही याची पडताळणी करून घ्यावी असे आवाहन यूजीसीकडून करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News