तुम्ही मोठ्या उत्सुकतेने हे सदर वाचायला घेतले आहे, म्हणजे तुम्ही आणि मी नक्कीच खूप सेम आहोत. मलाही तुमच्यासारखंच भटकायला आवडतं. तुमच्यासारखंच छत्रपती शिवाजी महाराज माझं दैवत, गडकोट माझे जिवलग आणि ट्रेकिंग माझं पहिलं प्रेम. म्हणूनच या सदरातून मी फक्त ‘प्रेम’ देणार आहे. म्हणजेच मी केलेल्या ट्रेकबद्दल, गडकोटांबद्दल तुमच्याशी गप्पा मारणार आहे...
‘बॅग उठाओ और निकल पडो,’ हे वाक्य आपल्यासाठी आता किती कॉमन झालं आहे ना? खरं सांगा आपल्यापैकी किती जणांचा सुटीच्या दिवशी घरी पाय टिकतो? दर रविवारी आपला वेगवेगळ्या ठिकाणी दौरा असतो. दररोजच्या या ९ ते ५च्या चक्रातून आपण या वेडासाठी हमखास वेळ काढतो. वेडच आहे ते. भल्याभल्यांचे फक्त व्हिडिओ आणि फोटो बघून जिथं डोळे पांढरे पडतात तिथं आपण लिलया चढाया करतो आणि अनुभवाचं भलं मोठं गाठोडं घेऊन सुखरूपपणे परतही येतो. मग सुरू होतो अभिमानानं किस्से सांगण्याचा सिलसिला. या सदरात मीसुद्धा हेच करणार आहे. आजवर जेवढी काही भटकंती केली, मग ती सह्याद्रीत असो, हिमालयात असो किंवा आणखी कोठे, मी त्याबद्दल तुम्हाला सांगणार आणि नुसतं सांगणार नाही तर तुमचं पुढील ड्रीम डेस्टिनेशन ठरवायलाही मदत करणार.
सध्या सगळ्यांमध्ये सोलो ट्रॅव्हलिंगचं वेड आहे. अनेकांना इच्छा असूनही भीतीपोटी किंवा काही अडचणींमुळं ते करता येत नाही. या सदरात सोलो ट्रॅव्हलिंग करणारे अनेक अवलिया आपले भन्नाट अनुभव मांडणार आहेत. तसेच सोलो ट्रॅव्हलिंग कसं करावं, त्यासाठी जागा निवडताना कोणती काळजी घ्यावी, अगदी त्या त्या ठिकाणांचे फेमस खायचे स्पॉट्स आणि राहण्याचा जागा या सर्वांबद्दल आपल्याला टिप्सही देणार आहेत.
आता विचार करा, हिमालयात पहिल्यांदा ट्रेकिंग करताना कोणता ट्रेक निवडावा अगदी तो कोणासोबत करावा, तो करताना कोणती काळजी घ्यावी, त्यासाठी कशी तयारी करावी, मेघालयात जाताय तर अस्सल महाराष्ट्रीय जेवण कोठे मिळतं, महाराष्ट्रातले अगदी अनएक्सप्लोअर्ड ट्रेक्स कोणते असे सगळे सिक्रेटस मी आणि आपले काही मित्र-मैत्रिणी तुम्हाला दर आठवड्याला सांगणार आहेत.
आता फिरायचं कसं, कुठं ते सगळं ठीक आहे, पण हे सगळं फिरायचं आणि तेही अत्यंत कमी पैशात! हे कसं करायचं याबाबतसुद्धा, म्हणजेच ‘बजेट बॅगपॅकिंग’बद्दलही टिप्स देणार आहोत.
आपल्या आवडीच्या आणि भन्नाट जागा आणि त्याही अत्यंत कमी खर्चात. पंकज त्रिपाठी म्हणतात, ‘ट्रॅव्हलिंग हे प्रत्येकासाठी असतं.’ फक्त त्याच्या अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. मात्र, आपल्या सर्वांचं कारण एकच असतं, नव्या नव्या गोष्टींचा अनुभव घेणं. मग कसा वाटतोय हा प्लॅन? आता पुढच्या आठवड्यात भेटूयात थेट एका गडावर. असा गड जो महाराष्ट्रात त्याच्या नेढ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. कोणता बरं? करा विचार.
मग कसा वाटतोय प्लॅन?