या आहेत नवविवाहितांसाठी आर्थिक नियोजनाच्या टिप्स

विवेक बजाज 
Monday, 3 June 2019
  • कोणतीही आर्थिक गुपिते नकोत
  • संयुक्त कर्ज घ्या

भारतीय समाजातील सर्वांत पवित्र बंधन म्हणजे लग्न! हे नाते अनेक जबाबदाऱ्या घेऊन येते आणि अनेकदा लग्नासोबत येणाऱ्या बदलांशी जुळवून घेणे खूप कठीण होऊन बसते. लग्नानंतर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा विचार करावाच लागतो, मग तो निर्णय कुटुंबासंदर्भातील असो, व्यक्तिगत असो किंवा आर्थिक असो; मात्र जेव्हा आर्थिक बाबी समोर येतात, तेव्हा बहुतेक जोडपी खुलेपणाने बोलत नाहीत. मग तुमच्या जोडीदारासोबत याबाबत खुलेपणाने बोलून आयुष्याचे नियोजन एकत्रितपणे करायला काय हरकत आहे? याबाबत काही आर्थिक टिप्स...

कोणतीही आर्थिक गुपिते नकोत
पैशांबाबत काही गुपिते ठेवल्यास त्यामुळे तुम्ही कधी विचारही केला नसेल असे नुकसान होऊ शकते. तुमची सर्व गुंतवणूक, विमा आणि कर्जांची माहिती तुमच्या जोडीदाराला प्रत्येक टप्प्यावर असली पाहिजे. यामुळे सर्व पैशांचा विनियोग नेमका कसा होतो, हे जाणून घेण्यातही मदत होईल आणि त्यावर तुम्ही कधीही नियंत्रण ठेवू शकता.

संयुक्त कर्ज घ्या
संयुक्त गृहकर्ज घेतल्यास तुम्ही दोघेही करसवलत मिळवू शकता आणि त्याचबरोबर मालमत्ताही उभी करू शकता. या कर्जासोबत मुदत विमा योजनाही नक्की घ्या. तुम्हाला तुमच्या जवळच्यासाठी मालमत्ता (असेट) उभी करायची असते, पण तुमचा मृत्यू झाला तर तुमची मालमत्ता दायित्व (लाएबिलिटी) होऊन जाते. कारण दर महिन्याला ईएमआय भरावा लागतो. तुम्हाला काही झाल्यास गृहकर्जाच्या ‘ईएमआय’चा भाग म्हणून किंवा स्वतंत्रपणे घेतलेल्या मुदत विम्यातून उर्वरित कर्जाची परतफेड होईल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित मालमत्ता मागे ठेवू शकाल.

उत्पन्नाचे एकत्रीकरण
प्राप्तिकर कायदा १९६१ नुसार जोडीदाराचे उत्पन्न तुमच्या उत्पन्नात एकत्र करण्यास परवानगी नाही. तरीही तुम्ही दीर्घकालीन फायदे मिळतील अशा रीतीने उत्पन्न एकत्र करू शकता. मालमत्तेचे उत्पन्न एकत्रित करता येते, पण मालमत्तेतून निर्माण होणारे उत्पन्न एकत्र करता येत नाही हे लक्षात ठेवा.

आपत्कालीन नियोजन
तुमचे करिअर उत्तम असेल, उत्पन्न चांगले असेल तरीही आपत्कालीन परिस्थिती कधीही, केव्हाही उद्‌भवू शकते. तुम्ही दोघे मिळून एक आपत्कालीन निधी नक्कीच बाजूला ठेवला पाहिजे. एक सामान्य नियम म्हणजे तीन महिन्यांचा घरखर्च भागेल (ईएमआय आणि विमा प्रीमियम) एवढा आपत्कालीन निधी तुम्ही वेगळा ठेवायला हवा.

आयुर्विमा संरक्षण
तुमच्याकडे यापूर्वीच मुदत विमा योजना असेल, तर तुम्ही एक पाऊल पुढे आहात. तरीही त्यातून मिळणारी रक्कम पुरेशी आहे की नाही याचे मूल्यमापन करण्याची हीच वेळ आहे. आता तुमची दोन कुटुंबे आहेत, तुमचे आई-वडील आणि तुमचा/तुमची जोडीदार. तुम्ही नसाल अशा परिस्थितीत दोघांनाही आर्थिक मदत मिळाली पाहिजे. तुमच्यापुढे दोन स्वतंत्र मुदत योजना घेण्याचा पर्याय आहे आणि त्याचे नॉमिनीज वेगवेगळे ठेवा (एका पॉलिसीचे नॉमिनी आई-वडील असू द्या आणि दुसऱ्या पॉलिसीसाठी जोडीदार) किंवा तुम्ही एकच मुदत विमा योजना घेऊन त्याच्या रकमेचा काही भाग आई-वडिलांसाठी आणि काही जोडीदारासाठी नॉमिनेट करू शकता. जर तुम्हाला विम्याचे मुदत संरक्षण नसेल, तर तुम्ही अगदी तातडीने ते घेऊ शकता. एकदा वय वाढले, की तुम्हाला भरावा लागणारा हप्ता वाढतो. 

वैद्यकीय विमा
दोघांच्याही आई-वडिलांची दरवर्षी संपूर्ण वैद्यकीय तपासणी होत असल्याची खात्री करा. यामुळे आजारांची सुरुवात कमी वयात कळण्यास मदत होईल आणि भविष्यात हे आजार बळावून तुमच्या साठवलेल्या पैशांचा मोठा ओघ तिकडे वळवावा लागणे टाळता येईल. त्यांनी पूर्वीच विमा काढलेला असेल तर तो पुरेसा आहे की अतिरिक्त संरक्षण गरजेचे आहे हे तपासून बघा. 

‘एचयूएफ’ तयार करा
प्राप्तिकर कायद्याने तुम्हाला एचयूएफ (हिंदू अविभक्त कुटुंब) तयार करून कराचे ओझे कमी करण्याची मुभा दिली आहे. लग्नानंतर लगेचच भेट म्हणून मिळालेली रक्कम प्रारंभिक भांडवल म्हणून वापरून ‘एचयूएफ’ तयार केली जाऊ शकते. तिचा उपयोग नंतर गुंतवणुकीसाठी आणि त्यातून उत्पन्न मिळवण्यासाठी होतो. या सगळ्या मुद्द्यांची तुम्हाला तुमचे नाते आनंदी राखण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा आहे.
(लेखक क्रेडेंट इन्फोएजचे व्यवस्थापकीय संचालक व सहसंस्थापक आहे.)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News