दहावी परीक्षेच्या दरम्यान लक्षात घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 3 March 2020

परीक्षाकाळात बाहेरच्या खाद्यपदार्थांना टाळून आईच्या हातचे प्रेमाने केलेलेच खाद्यपदार्थ खावून आजारी पडण्याचे टाळा.

सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेची, प्रत्येक विषयाची, त्यातील पाठ्यांशाची उत्तमरीत्या तयारी केली असेल. काही विद्यार्थी व त्यांचे पालक गेले वर्षभर ज्या परीक्षेची वाट पाहत होते, तीदहावीची परीक्षा आज पासून सुरू होईल. या काळात आपल्याला काही उपयोगी सूचना द्याव्यात, या उद्देशाने हा खटाटोप...

सर्वप्रथम परीक्षा देण्यासाठी केंद्रावर कमीत कमी अर्धा तास अगोदर पोहोचा. आपल्या हृदयाच्या ठोक्‍यांचा वेग नियंत्रणात आहे ना याची खात्री करा. ठोक्‍यांचा वेग वाढला, असे वाटल्यास दीर्घ श्‍वसन करा. मन शांत करा, समजवा ही काही शेवटची परीक्षा नाही किंवा पहिल्यांदाच आपण परीक्षा देत नाही आहोत.प्रश्‍नपत्रिका हातात आल्यावर व्यवस्थितपणे वाचून काढा. समजलेला, आवडलेला, सोपा प्रश्‍न निवडून छान उत्तर लेखनाला सुरवात करा व स्वत:वरील ताण कमी करा. काही मुद्दे आठवत नसतील तेव्हा उद्विग्नता टाका, मन शांत ठेवा, आठवेल असा आत्मविश्‍वास बाळगा.

आपली आसन व्यवस्था ठीक आहे ना, प्रकाश व्यवस्थित आहे ना, आपल्याला कोणी त्रास देत नाही ना या सर्वांसाठी तत्काळ तक्रार वर्गात आलेल्या पर्यवेक्षकांकडे करा. परीक्षेच्या आदल्या रात्री फार झोप होईल, याची काळजी घ्या, सकाळी उठल्यावर परीक्षा केंद्रावर जाईपर्यंत वाचत बसू नका. मनातल्या मनात महत्त्वाचे मुद्दे, चिंतनात आणावेत, सूत्रे, रासायनिक अभिक्रिया यांचे मनन करावे. पेपर सोडवून बाहेर आल्यावर प्रसन्नता चेहऱ्यावर दाखवून पालकांना आनंदी करा. पण प्रत्यक्षात पेपर अवघड गेल्यास घरी आल्यावर पालकांना अंधारात न ठेवता स्पष्ट कल्पना द्या, आपले पालक आपल्याला रागावणार नसतात; पण नंतर भ्रमाचा भोपळा फुटणार नाही, याची काळजी घ्या. पेपरचा दिवस, वेळ गेल्यावर पुढील विषयाच्या अभ्यासात मनाला गुंतवावे. 

परीक्षाकाळात बाहेरच्या खाद्यपदार्थांना टाळून आईच्या हातचे प्रेमाने केलेलेच खाद्यपदार्थ खावून आजारी पडण्याचे टाळा. पालकांनीही पाल्यांकडून अनावश्‍यक गुणांची अपेक्षा न ठेवता त्याची क्षमता ओळखून त्याला उत्साहात ठेवून, प्रेरक संवाद करून त्याचे मनोधैर्य वाढवावे. आपल्या अपेक्षेप्रमाणे परीक्षा पार पडावी, हीच पुनश्‍च शुभेच्छा!

परीक्षेच्या अगोदर...

पूर्ण प्रकरण न वाचता नोट्‌सची उजळणी करा.नवीन काही वाचू नका. संकेत शब्द, सूक्ष्म टिपणे, आकृत्या, नकाशे, तक्ते यांचे धावते निरीक्षण करा. झोप पूर्ण व सलग घ्या. जागरण टाळा.पहाटेपासून शांत व उत्साही वातावरणात अभ्यासाला सुरवात करा.परीक्षेला लागणाऱ्या आवश्‍यक साहित्याची जमवाजमव करा. सर्व साहित्य एकाच ठिकाणी ठेवा. कपड्यांना इस्त्री व बुटाला पॉलिश करून ठेवा.

परीक्षेला निघताना...

परीक्षेला निघताना आवश्‍यक सर्व साहित्य सोबत ठेवा. ओळखपत्र, हॉलतिकिट, किमान तीन पेन्स- पेन्सिल, शार्पनर, स्केल पट्टी, लॉगरिथम, कंपास, खोड रबर, रायटिंग पॅड,पिण्याच्या पाण्याची बाटली, रुमाल, घड्याळ, गरजेनुसार पुरेसे पैसे सोबत ठेवावेत.हलका आणि साधा आहार घ्यावा. (पोळी-भाजी, वरण-भात) पोटभर न खाता थोडी भूक शिल्लक ठेवा.रस्त्यावरील वाहतूक, ट्रॅफिक जामचा विचार करून योग्य वेळेत निघा.सायकलने प्रवास करत असाल तर रुमाल- टोपी वापरा.

परीक्षा हॉलमध्ये...

परीक्षा हॉलमध्ये प्रश्‍नपत्रिका हातात पडेपर्यंतचा संपूर्ण काळ मानसिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. हे लक्षात ठेवा.मन स्थिर ठेवा. जो अभ्यास आपण केलेला आहे, तेवढे आपण निश्‍चितपणे लिहू शकतो. यावर विश्‍वास ठेवा.   मागे काय झाले. पुढे काय होईल, याची चिंता न करता शांत बसा.

पेपर झाल्यावर...

पेपरनंतर उत्तरांबाबत मित्रांसोबत चर्चा टाळा.किती गुण मिळतील यांची बेरीज करीत बसू नका. काही उत्तरे चुकली असल्यास त्यांचा विचार न करता जे बरोबर लिहिले आहे,त्यावर समाधानी राहण्याचा प्रयत्न करावा.झालेल्या पेपरची चिंता न करता पुढच्या पेपरची तयारी सुरू करा.

उत्तरपत्रिका सोडविण्यापूर्वी...

सुवाच्च अक्षरात आपला परीक्षा क्रमांक, दिनांक, केंद्र अशी सर्व माहिती अचूक भरा.बारकोड चिटकविण्यापूर्वी आपलाच असल्याची खात्री करा.उत्तरपत्रिकेमध्ये दिलेल्या सूचना अत्यंत काळजीपूर्वक वाचा.प्रश्‍नपत्रिका काळजीपूर्वक वाचा.निळ्या किंवा काळ्या शाईचाच पेन वापरा.सोपे प्रश्‍न लक्षात ठेवा. प्रश्‍नांची निवड महत्त्वाची असते.विचारले तेच व तेवढेच लिहा. पेपर दिलेल्या वेळेत पूर्ण होतोय ना यासाठी लिहिण्याचा वेग टिकवा.प्रश्‍नांचा क्रमांक अथवा उपप्रश्‍न क्रमांक ठळक अक्षरात ठेवा.उत्तराचा आराखडा मनात तयार करा.हिम्मत...हौसला बुलंद ठेवा.उत्तरपत्रिकेवर कोठेही डाग पाडू नका. परीक्षकांसाठी सूचना लिहू नका.

परीक्षा देताना....

खूप सोपे प्रश्‍न असतील तर घाई करू नका. त्यामुळे ‘स्कील मिस्टेक्‍स’  होतात, हे लक्षात ठेवा.अवघड प्रश्‍न असेल तरी घाबरू नका. त्याला सामोरे जा. तुम्हाला ते अवघड वाटत असतील तर ते इतरांनाही अवघड असतात. त्यातल्या त्यात जो धीराने त्या प्रश्‍नाला सामोरे जातो आणि उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करतो, तो अधिक गुण मिळवतो. जो त्याचा ताण घेतो, तो अधिक चुका करतो.कसाही प्रश्‍न असेल तर मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीनच आणि शेवटपर्यंत आत्मविश्‍वासाने मी पेपर लिहिन, असा निर्धार सातत्याने करा.चुकूनही कॉपी करू नका, कोणी आग्रह करत असेल तरीही करून नका. इतर विद्यार्थी कॉपी करतात तेव्हा आपल्याला वाटते, की ते आपल्या पुढे जातील. पण अशा मुलांचा पाया कच्चा असल्याने ते भविष्यात मागे पडतात. त्यामुळे तुम्ही प्रामाणिक प्रयत्नांनी पुढे जा.

परीक्षा केंद्रांवर वेळेवर यावे

विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे मोबाईल, स्मार्टवाच, लॅपटॉप, कॅल्क्‍युलेटर, आदी गॅझेट गैरप्रकार मटेरिअल परीक्षा केंद्रात सोबत आणू नये. तसेच परीक्षेच्या दालनात अर्धातास आधी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे,  सकाळी साडेदहाला परीक्षार्थींना उत्तरपत्रिका देण्यात येणार आहेत. उत्तरपत्रिकांचे काळजीपूर्वक निरीक्षण करावे, त्यानंतर १०.४० ते १०.५० या वेळेत माहिती भरून १०.५० वाजता प्रश्‍नपत्रिका मिळाल्यानंतर ती दहा मिनिटांत संपूर्ण वाचून कोणत्याही प्रकारचे दडपण मनावर न आणता पेपर लिहिण्यास सुरवात करावी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News