या चुकीमुळे खुप शिकायला मिळाले, आता नव्याने सुरुवात करणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

राज्य कबड्डी संघटनेने बंदी स्थगित केल्यानंतर सायलीने हे मत व्यक्त केले

मुंबई : गेल्या काही महिन्यात जे काही घडले त्यातून खूप काही शिकायला मिळाले. ती चूक पुन्हा घडणार नाही. आता नव्याने सुरुवात करणार आहे, असे सायली केरीपाळे हिने सांगितले. राज्य कबड्डी संघटनेने बंदी स्थगित केल्यानंतर सायलीने हे मत व्यक्त केले.

पाटणा राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत गटसाखळीत पराजित झालेल्या संघाची सायली कर्णधार होती. तिच्यावर दोन वर्षांची बंदी होती. आता तिच्यासह सर्वांवरील बंदी स्थगित करण्यात आली आहे. "निर्णय ऐकून खूप छान वाटले, राज्य संघटनेने आम्हाला पुन्हा खेळण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. माझ्या नोकरीबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे, माझ्यासाठी हा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे," असे सायलीने सांगितले. महाराष्ट्राच्या पराभवानंतर संघावर टीका सुरू झाल्यावर सायलीने समाजमाध्यमांवर टिप्पणी केली होती. त्यामुळे तिच्यावर कारवाई झाली होती.

जे काही गेल्या काही महिन्यांत घडले, त्याचा खूप त्रास झाला. मात्र आता तो मी खेळाचा एक भाग समजून पुढे जाणार आहे. यातून खूप काही शिकायला मिळाले. अशी चूक परत आयुष्यात घडणार नाही, असे सायलीने सांगितले. ती पुढे म्हणाली, अनावधानाने घडले होते. त्या वेळी एवढे काही घडेल, असे वाटले नव्हते. नाहीतर ते केलेच नसते. एवढा मोठा निर्णय घेतला जाईल, असे कधीही वाटले नव्हते; पण तो घेतला गेला. खूप स्ट्रगल करावे लागेल. काहींना सामोरे जाणे भाग पडते. जीवनात खूप चढ-उतार असतात. आशियाई क्रीडा स्पर्धा, छत्रपती पुरस्कार हे चांगले दिवस पाहिले होते. त्यानंतर थोडे वाईट दिवस जगावे लागले. येथून आता नव्याने सुरुवात करेन, असे तिने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News