.... तर महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर बेमुदत संपावर जातील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील वैद्यकीय शाखेच्या परीक्षा रद्द न झाल्यास कोणत्याही क्षणी महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर बेमुदत संपावर जातील, असा इशारा मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनने दिला आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या संपाला डॉक्‍टरांची संघटना मार्डने विरोध केला असून मार्ड कधीच अशा संपाला पाठिंबा देणार नाही, असे मार्डने स्पष्ट केले आहे.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी उन्हाळी सत्र 2020 परीक्षा रद्द करावी, अशी मागणी मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशन आणि वैद्यकीय संघर्ष समितीने यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना 22 व 25 मे रोजी पत्राद्वारे केली होती. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात घालून परीक्षा घेणे योग्य नाही. लॉकडाऊनमुळे काही विद्यार्थी आपल्या मूळ गावी परतले आहेत. शिवाय, अनेक जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन सुरू आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी एसटी किंवा रेल्वेने प्रवास केल्यास त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे असोसिएशनचे म्हणणे होते. मात्र, याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही आरोग्य विद्यापीने अद्यापही कोणत्याही प्रकारचे लेखी आश्‍वासन दिले नाही. उलट विद्यार्थ्यांना कोव्हिड सुरक्षा कवच जाहीर केले, अशी तक्रार असोसिएशनने केली आहे.

रुग्णांची गैरसोय झाल्यास आम्ही जबाबदार नाही
आरोग्य विद्यापीठाने आणि इतर विभागाने परीक्षा रद्द करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यास नाईलाजास्तव महाराष्ट्रातील युजी आणि पीजी प्रशिक्षणार्थी डॉक्‍टर्स कोणत्याही क्षणी संपावर जातील, असे मेडिकल स्टुडंट वेल्फेअर असोसिएशनचे सचिव ऋषिकेश काळे पाटील यांनी सांगितले. कुठेही बाह्यरुग्ण विभागही सुरू ठेवण्यात येणार नाही. त्यातून रुग्णांवर उपचार झाले नाही आणि रुग्ण दगावले तर त्या परिस्थितीला केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, असेही सांगण्यात आले आहे.

मार्डचा संपाला पाठिंबा नाही
ऍलोपॅथी, एमबीबीएस, एमडी, एमएस पदव्युत्तर परीक्षा रद्द करा, अशी मागणी "मार्ड' या संघटनेने केलेली नाही किंवा यापुढेही अशी मागणी केली जाणार नाही. तसेच, अशी मागणी करणाऱ्या संघटनेला मार्ड संघटना पाठिंबा देणार नाही, असे मार्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ऍलोपॅथी, एमबीबीएस, एमडी सोडून इतर संघटना याबाबत मागणी करत असतील तर या संघटनेला मार्डकडून पाठिंबा नाही, असे मार्डकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षा रद्द करा, ही मागणी केंद्रीय मार्डने कधीच केली नाही. परीक्षेच्या तयारीसाठी आम्हाला 45 दिवसांचा वेळ द्यावा, अशी आमची मागणी होती आणि सरकारने तेवढा वेळ दिला आहे. त्यामुळे आम्ही या संपाला पाठिंबा देणार नाही.
- डॉ. राहुल वाघ, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News