त्यांचे कार्यकर्ते धोकेबाज आम्ही आता एकटेच लढणार ; मायावती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • ११ जागांवरील निवडणूक स्वबळावर लढणार; अखिलेश यांच्याकडूनही निर्णयाचे स्वागत
  • एकटे लढणे कधीही चांगले​

लखनौ - नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पक्ष (बसप) आणि समाजवादी पक्ष (सप) यांची महाआघाडी उत्तर प्रदेशात फ्लॉप ठरल्यानंतर ‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी ‘एकला चलो रे’चा सूर आळवला आहे. ‘यूपी’त होऊ घातलेल्या विधानसभेच्या अकरा जागांवरील पोटनिवडणूक आमचा पक्ष स्वबळावर लढेल, अशी घोषणा पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.अखिलेश यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

हा उभय पक्षांमधील स्थायी ब्रेक अप नसल्याचे सांगत त्यांनी समाजवादी पक्षाने त्यांच्या केडरमध्ये सुधारणा करावी, असेही मायावती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या आम्ही राजकीय वास्तवाकडे 

दुर्लक्ष करू शकत नाही, उत्तर प्रदेशात पुन्हा मैदान मारण्याच्या उद्देशाने आम्ही समाजवादी पक्षासोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता, पण दुर्दैवाने त्यात आम्हाला यश आले नाही.  कनौजमधून अखिलेश यांच्या पत्नी डिंपल, बदायूँमध्ये धर्मेंद्र यादव आणि फिरोजाबादमध्ये अक्षय यादव यांच्या पराभवानं आम्हाला विचार करायला भाग पाडले.  यादवांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघातही यादवांची मते बसप उमेदवारांना मिळाली नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, ‘‘आम्हीदेखील पोटनिवडणुकीच्या अकरा जागांवर उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहोत, मायावती यांनी आघाडी तोडण्याचाच निर्णय घेतला असेल तर आम्ही त्यांना तसाच प्रतिसाद देऊ.’’ ‘‘आम्हीही स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला जर वेगळ्याच मार्गाने जावे लागणार असेल तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत,’’ असेही अखिलेश यांनी या वेळी स्पष्ट केले.

एकटे लढणे कधीही चांगले
समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते हे ‘बसप’सारखे एका विचारसरणी आणि मिशनशी बांधील नाहीत. यामुळे आम्ही एकट्याने निवडणूक लढणे कधीही चांगले. अखिलेश आणि डिम्पल यांनी माझा आदर केला. मी भूतकाळातील बऱ्याचशा गोष्टी विसरूनही गेले आहे, त्यांनी मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे वागविले. आम्ही या संबंधांचा राजकीय फायद्यासाठी वापर करणार नाहीत, असेही मायावतींनी सांगितले.

‘सप’च्या मतांचा लाभ नाही
मायावती यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठीदेखील समाजवादी पक्षालाच जबाबदार ठरविले आहे, या पक्षाच्या मतांचा आम्हाला लाभ झाला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

आम्ही आमची मते गमवायला नको होती, आमचे मजबूत उमेदवारदेखील पराभूत झाले. कनौजमध्ये अखिलेश यांच्या पत्नी डिम्पल यादव यांनाही पराभूत व्हावे लागले. आम्हाला याबाबत विचारा करावा लागेल, असे मायावती यांनी नमूद केले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News