प्रज्ञावान दिग्दर्शिकेचा नाट्य प्रवास

तुषार भद्रे 
Friday, 19 April 2019

मराठी रंगभूमीवर महिला दिग्दर्शक अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी अवस्था आहे. विजयाबाई मेहता, प्रतिमा कुलकर्णी, लता रवींद्र, निलकांती पाटेकर, ज्योती व अमृता सुभाष अशी काही नावाजलेली मोजकीच नावे! पण साताऱ्याच्या प्रज्ञा मोहिते हिने या मांदियाळीत आपले नाव घेतले जाईल अशी दमदार वाटचाल सुरू केलीय हे नक्की. 

मराठी रंगभूमीवर महिला दिग्दर्शक अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशी अवस्था आहे. विजयाबाई मेहता, प्रतिमा कुलकर्णी, लता रवींद्र, निलकांती पाटेकर, ज्योती व अमृता सुभाष अशी काही नावाजलेली मोजकीच नावे! पण साताऱ्याच्या प्रज्ञा मोहिते हिने या मांदियाळीत आपले नाव घेतले जाईल अशी दमदार वाटचाल सुरू केलीय हे नक्की. 

प्रज्ञाचा नाट्य प्रवास तसा लहानपणीच सुरू झाला. आई नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका असल्यामुळे घरातील वातावरण सांस्कृतीक दृष्ट्या सधन. शाहूपुरीतील दुर्गा उत्सवातील सांस्कृतीक उपक्रमात संदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली ती नाटक, एकांकिकेत वावरू लागली. 

रवींद्र डांगे यांच्या थिएटर वर्कशॉप संस्थेत होणारी नाटके व डांगे यांचा अभिनय पाहात तिच्यातील अभिनय कला फुलत गेली. संदीप जंगम दिग्दर्शित या "चिमण्यानो" या नाटकात तिने चिमणीचा रोल केला. हे नाटक कटक येथील आंतरराष्ट्रीय नाट्य व नृत्य महोत्सवात दुसरे आले आणि प्रज्ञाला नवी उभारी मिळाली.
 
पुढे बाळकृष्ण शिंदे दिग्दर्शित शफाअत खान लिखित शोभा यात्रा या नाटकात राणी लक्ष्मीबाईची भूमिका तिने केली. या कामाची अनेकांनी दखल घेतली. प्रज्ञा ही खरे तर हाडाची चित्रकार. पेंटिंगमधे रमणारी, मी व माझा कॅनव्हास यात दंग असणारी मनस्वी
कलाकार. पाटखळच्या कला महाविद्यालयात तिने जी. डी. आर्ट. चे शिक्षण घेतले तर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई या नामांकित कॉलेजमधून डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन परीक्षा उत्तीर्ण झाली. पदविका घेऊन न थांबता एसएनडीटी, मुंबई या कॉलेजमधून प्रज्ञाने बॅचलर ऑफ फाईन आर्ट पदवी संपादन केली. या दरम्यान पेंटिंग्स स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळवली. 

किरण माने दिग्दर्शित आयुष्यमान या एकांकिकेत काम करीत असताना तिला जे. जे. कॉलेजचा प्रवेश कॉल आला व नाटक सोडून ती तिकडे जॉइन झाली. चित्रकारितेच्या शिक्षणामुळे जवळपास पाच ते सहा वर्षे नाटकापासून प्रज्ञा दूर गेली. मात्र, पुन्हा एकदा नाट्यकला तिच्या मदतीला धावून आली. एका मैत्रिणीला मुंबई विद्यापीठात प्रवेश घ्यायचा होता. त्याची माहिती घेण्यासाठी तिच्यासोबत प्रज्ञा विद्यापीठात गेली. तिथे तिला मुंबई विद्यापीठच्या ऍकॅडमी ऑफ थिएटर आर्टमधील मास्टर इन थिएटर आर्ट या अभ्यासक्रमाची माहिती मिळाली आणि तिथेच तिने हा कोर्स पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. विभागप्रमुख ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांची भेट घेऊन प्रवेशाविषयी माहिती घेतली. सोबत कोणतेही प्रमाणपत्र नव्हते. अत्यंत मेहनतीने अभ्यासक्रम पूर्ण करून तिने थिएटर आर्टमधील मास्टरकी संपादन केली. 

नाट्यशास्त्रात उच्च शिक्षण पूर्ण केलेली साताऱ्यामधील प्रज्ञा ही एकमेव कलावंत आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर अनेक व्यावसायिक नाटकांत कामाविषयी ऑफर आल्या; पण तिने नाकारल्या कारण तिच्या जीवनात गोड मुलीचे आगमन झाले होते.
मग तिने मोर्चा वळविला साताऱ्याकडे आणि कुलदीप मोहिते यांच्या शाहू कला अकादमीच्या वतीने "राहिले दूर घर माझे' या नाटकाची निर्मिती हाती घेतली. या निमित्ताने सुरू झाला एका प्रज्ञावान दिग्दर्शिकेचा नाट्य प्रवास. 

अजगर वजाहत लिखित व शफाअत खान यांनी मराठीत रूपांतरित केलेले हे नाटक तसे जुने पण भारतीय रंगभूमीच्या परिप्रेक्षात अभिजात ठरलेले असे नाटक. प्रज्ञाने मेलोड्रामा फॉर्म मधील हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेत सादर करून साताऱ्याच्या नाट्य निर्मितीला नवे आयाम दिले. मुळात हिंदी- उर्दू भाषेतून मराठीत आलेले हे नाटक भल्याभल्यांना पेलत नाही. प्रज्ञाने साताऱ्यामधील हाती असलेल्या कलावंतांवर प्रचंड मेहनत घेऊन हे नाटक यशस्वी केले आणि दिग्दर्शक म्हणून भविष्यात ती काय करू शकते याची चुणूक दाखवली. या वर्षी तिने महेश घाटपांडे यांचे ग्रेसफुल हे नाटक सादर केले.
 
दिग्दर्शिकेच्या भूमिकेत असताना एक महिला म्हणून कसा अनुभव? कारण दिग्दर्शक हा नाट्य माध्यमात 'टीम लीडर'ची भूमिका बजावतो. तुझा अनुभव कसा आहे ? या प्रश्नावर प्रज्ञा म्हणते स्त्रियांच्या अंगी जन्मताच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे, सांभाळून घेण्याचे वगैरे गुण असतातच. त्या बरोबरीने माझ्या संहितेचा अभ्यास पूर्ण असतो. त्यामुळे अडचण अजिबात येत नाही. 

माझे गुरू, मार्गदर्शक म्हणाल तर विद्यापीठात असताना क्‍लासरूम प्रोडक्‍शनमधील निखिल शेटे यांची कार्यशैली मला प्रभावित करून गेली, तर आदर्श म्हणून मी महान दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांच्याकडे पाहते. कलेचे महाविद्यालयीन शिक्षण हे त्या कलेतील तंत्र शिकण्याकरिता खूप मोलाचे ठरते. कलावंताला व्यक्त होताना शिक्षणाचा नक्की फायदा होतो. त्यामुळे जिथे नाट्यशास्त्राचे शिक्षण मिळत असेल तिथे नव्या मंडळींनी अवश्‍य प्रवेश घेतला पाहिजे, असे आग्रही मांडणी प्रज्ञा करते.

मला गोष्ट सांगणारी नाटके आवडतात, तरीही मी सर्व प्रकारच्या घाटाची, पोताची नाटके मी करीत राहणार आहे. त्यातून मला माझ्या शैलीचा शोध लागेल असे ती नम्रतेने सांगते. भविष्यकालीन योजनेत प्रज्ञा सध्या एक नाटक लिहिते आहे. या नाटकाचा प्रयोग या वर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत ती सादर करणार आहे. जाता जाता ती सहज पण खूप मोलाचे बोलली जे करायचे ते अभ्यासपूर्ण व मनापासून करायचे! केवळ प्रसिद्धी, नेम- फेम, ग्लैमरपेक्षा स्वतःच्या समाधानासाठी करायचे एवढंच माझ्या मनाशी आहे. प्रज्ञाचा अभ्यास, विचारातील स्पष्टता आणि नाट्य माध्यमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन साताऱ्याची रंगभूमी समृद्ध करणारा आहे, तसेच तिच्या मनाची झेप नक्कीच महाराष्ट्राला नवी दिग्दर्शिका मिळवून देणारी आहे हे नक्कीच. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News