जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणारे 'थिएटर'

शुभम पेडामकर
Monday, 12 October 2020

आयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते चित्रपट येण्यापूर्वी आलेले नाटक क्षेत्र बऱ्याच नामवंत कलाकारांना पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी संधी देत आहे.

आयुष्य हा एक रंगमंच आहे आणि तिथे प्रत्येकाला हसण्याचे नाटक करावेच लागते असचं काय ते चित्रपट येण्यापूर्वी आलेले नाटक क्षेत्र बऱ्याच नामवंत कलाकारांना पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी संधी देत आहे. असाच एक कलाकार म्हणजे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असणाऱ्या पिंपरी (खुर्द) या छोट्याशा गावातून मुंबईत आलेला असूनही सध्या प्रत्येक हिंदी-मराठी भाषिक प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयातून स्वतःची प्रतिमा निर्माण करणारा एकनाथ उद्धवराव गिते.

संकलन: शुभम पेडामकर

करिअरच्या अनेक वाटा आहेत पण त्यापैकी थिएटर क्षेत्र घेऊन त्यात करिअर करायचे असे का व कधी ठरवले?

मी शाळेत आठवीमध्ये असताना पहिल्यांदा एका सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला (पहिल्यांदा स्टेजवर आलो). सगळ्यांनी कौतुक केलं. छान वाटलं. आवड वाढत गेली आणि मग पुढे जेव्हा बीएससी करण्यासाठी विवेकानंद महाविद्यालय औरंगाबादला आलो तेव्हा प्रा. दिलीप महालिंगे सरांची भेट झाली. त्यांनी नाटक कसं करायचं ते शिकवलं. फक्त नाटकच नाही तर जगाकडे थिएटरच्या दृष्टीकोनातून, माणूस म्हणून बघयला शिकवलं. तेव्हा वाटलं की आयुष्यभर आता हेच करायला पाहिजे, कारण यात आनंद आहे, समाधान आहे. पण भीती वाटायची या क्षेत्राची, मुंबईची. पण पुढे मी मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये मास्टर डिग्रीसाठी म्हणजे मास्टर ऑफ थिएटर आर्टस् साठी फॉर्म भरला. तिथे दरवर्षी पूर्ण भारतातून फॉर्म येतात. खूप सारे विद्यार्थी ऑडिशन देतात पण फक्त २५ विद्यार्थ्यांचीच या अभ्यासक्रमासाठी निवड होते. तिथे माझी निवड झाली आणि मग मात्र माझी या क्षेत्राबद्दलची आणि मुंबईबद्दलची बरीच भीती कमी झाली. आत्मविश्वास वाढला आणि इथेच माझ्या थिएटरला म्हणजेच माझ्या आवडीला करिअर करण्याच्या माझ्या निर्णयावर शिक्कामोर्तब मी केला.

थिएटर अभ्यासक्रमात शिक्षण घेण्यासाठी शिक्षणाच्या कोणत्या पायऱ्या पार कराव्या लागतात?

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे भारतातील सर्वात नावाजलेले थिएटर स्कूल आहे. कुठलीही पदवी पूर्ण, काही नाटकांचा अनुभव आणि नाटकाबद्दलच्या बेसिक गोष्टी माहिती असतील तर तुम्ही तिथे अर्ज भरू शकता. पण तिथे प्रवेश घेण्यासाठी ऑडिशन द्यावे लागते. ते खूप अवघड असते आणि त्याची तयारी खूप मन लावून आणि व्यवस्थित करावी लागते. कारण स्पर्धा भरपूर असते. असंच जवळपास बाकीच्या ठिकाणी सुद्धा असते. जिथे मी शिकलो तिथे म्हणजे 'अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये सुद्धा हाच फॉरमॅट असतो. म्हणजे तुम्हाला थिएटरला कुठेही ऍडमिशन घ्यायचे असेल तर व्यवस्थित तयारीनेच जावे लागते. महाराष्ट्रात बाकी ठिकाणीसुद्धा बऱ्याच विद्यापीठांमध्ये थिएटरसाठी डिग्री आणि मास्टर डिग्री कोर्सेस आहेत. बारावी नंतर तुम्ही बॅचलर ऑफ परफॉर्मीग आर्ट्स किंवा बॅचलर ऑफ ड्रॅमॅटीक्स करू शकता आणि नंतर मास्टर ऑफ परफॉर्मीग आर्ट्स किंवा मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स करू शकता.

अभिनेता होणार म्हटल्यावर घरच्या मंडळींचा प्रतिसाद व पाठिंबा कसा होता?

पिंपरी (खुर्द) हे सात-आठशे लोकसंख्या असलेलं माझं छोटंसं गाव. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात माझे गाव आहे. माझ्या कुटुंबालाच नाही तर आमच्या गावात देखील कोणाला नाटक हा प्रकार नीट माहिती नव्हता. कोणी मला विचारलं काय करतो आणि मी त्यांना सांगितलं की मी नाटकात काम करतो, तर ते विचारायचे कि पगार किती मिळतो? खूप काम करावे लागते का? किती वेळ असते ड्युटी?

पण मी स्वतःला खूप जास्त भाग्यवान समजतो की मला गजानन गिते सारखा मोठा भाऊ मिळाला. २०१२ साली माझ्या वडिलांचं निधन झाले. तेव्हापासून माझ्या शिक्षणाची आणि घरची सगळी जबाबदारी त्याच्या एकट्याच्या खांद्यावर होती. सगळ्यांना वाटायचे कि मी शिक्षण पूर्ण करून पटकन एखादी नोकरी करावी आणि दादाला हातभार लावावा. पण त्याला असे कधीच वाटले नाही. त्याने सांगितलं तू तुझं स्वप्न पूर्ण कर. नाटक कर, मुंबईला जा. माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन त्यांनी दिले. माझ्या सगळ्या निर्णयांना सपोर्ट केला. मला कधीच निगेटिव्ह होऊ दिलं नाही. जगातला सर्वात जास्त सकारात्मक माणूस आहे तो म्हणजे माझा भाऊ असे मला वाटते. आज मी जे काही थोडंफार करतोय आणि भविष्यात जे काही चांगले करेन ते सगळं श्रेय फक्त दादाचं असेल. माझी आई, माझ्या दोन्ही बहिणी आणि वाहिनी या सगळ्यांनी मला सतत पाठिंबाच दिला. एका खेड्यात राहून इतक्या अडचणीमधे राहून सुद्धा मला नाटकासारख्या क्षेत्रात येण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या माझ्या फॅमिली बद्दल मला खूप जास्त आदर वाटतो.

थिएटर या क्षेत्रात अभ्यास करू पाहणाऱ्या तरुणाई ने कोणती पुस्तके वाचावी असे तुम्हांला वाटते?

मला वाटतं कि थिएटर करणाऱ्या मुलांनी असं ठरवू नये की मी हेच वाचावं आणि तेच वाचावं. त्यांनी मिळेल ते आणि मिळेल तितकं सगळं वाचावं. अगदी सगळं. ज्याने विचारांच्या कक्षा सतत रुंदावत राहतील. मला आठवतं एकदा मी दहावी अकरावी ला असतांना गावातल्या वाचनालयात लिओ टॉलस्टॉय यांचं 'व्हॉट इज आर्ट' या पुस्तकाचे साने गुरुजी यांनी मराठी भाषांतर केलेले 'कला म्हणजे काय?' हे पुस्तक वाचलं होतं (तेव्हा मला ते बाउन्सर गेलं हा भाग वेगळा) आणि मुंबई ला अकॅडमी मध्ये शिकत असतांना विजय केंकरे सरांनी विचारलं की व्हॉट इज आर्ट वाचलंय का कोणी तेव्हा मी हात वर केला आणि या पुस्तकावर वर्गात चर्चा झाली.त्यामुळे वाचाल तर वाचाल हा सुविचार तिकडे वास्तवात समोर लक्षात आला.

मराठी आणि हिंदी नाटकांसोबतच बाहेरची नाटकं सुद्धा वाचायला हवीत. चांगल्या चांगल्या लेखकांच्या कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र सगळंच वाचून काढावे. मला दोन आत्मचरित्र नेहमीच खूप आवडले आणि त्याचा थिएटर करताना खूप फायदा झाला. त्यातलं पहिलं 'लमाण' हे डॉ. श्रीराम लागू यांचं आत्मचरित्र आणि दुसरं 'अनलाईकली हिरो-ओम पुरी'. या दोन्ही पुस्तकांमधला खरेपणा आणि त्यांच्या आयुष्यातील थिएटर विषयीचे अनुभव खूप काही शिकवून जातात. अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबऱ्या वाचतांना अगदी सगळं जिवंत होऊन पुढे उभं राहतं. एखाद्या अभिनेत्यासाठी किंवा दिग्दर्शकासाठी हे क्लिअर व्हिज्युअल्स खूप महत्वाचे असतात. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, गिरीश कर्नाड, बादल सरकार, मोहन राकेश, धर्मवीर भारती या आणि अशा खूप साऱ्या लेखकांची लिहिलेली नाटकं वाचनात यायला हवी.

आजच्या तरुणाई ला थिएटर क्षेत्रात अभ्यास कसा करावा याबद्दल काय टिप्स द्याल?

थिएटर करण्यासाठी संयमाची (पेंशस ) खूप गरज असते. गोष्टी पटकन समजतील, लवकर करता येतील असे दरवेळेस होत नाही. सतत प्रयत्न करत रहावे लागतात. स्वतःवर मेहनत घ्यावी लागते. खूप साऱ्या थिएटर एक्सरसाईजेस असतात त्या कराव्या. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ टिकवून ठेवावे . गोष्टी समजून घेण्याची क्षमता वाढवावी. वाचन खूप जास्त गरजेचं असतं या क्षेत्रात. वाचनाशिवाय पर्याय नाही आणि यासाठी तुम्ही पळवाट शोधू शकत नाही. वाचनासोबतच चांगली नाटकं, चित्रपट बघत राहावी या सर्व गोष्टींमुळे स्वतःला आणि स्वतःतल्या कलाकाराला सतत अपडेट ठेवू शकतो आपण.

आजच्या घडीला थिएटर क्षेत्रातील सब -करिअर संधी कोणत्या व का?

बऱ्याचदा असं होतं की थिएटर म्हणजे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय असं वरवरचं मत लोक करून घेतात पण थिएटर एक विश्व आहे ते फक्त अभिनय आणि दिग्दर्शनापुरतं मर्यादित नसतं. लाईट्स, म्युझिक, कॉस्ट्यूम, सेट डिझाईन, मेकअप या आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात. या गोष्टींकडे सुद्धा आपण करिअर म्हणून बघू शकतो.

साधं राहणीमान जगत असताना थिएटर क्षेत्र किती उपयुक्त पडते?

थिएटरमुळे जगाकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो. जर तुम्ही रोज सकाळी उठून थिएटर एक्सरसाईझ करत असाल तर तुम्ही दिवसभर प्रसन्न राहता. तुम्हाला जगातल्या बऱ्याच माहित नसलेल्या गोष्टी थिएटरमुळे कळतात. प्रत्येक नाटक, प्रत्येक स्क्रिप्ट जगण्याचे नवे अनुभव देतात.

आजवर थिएटर क्षेत्रात मिळालेली पारितोषिके कोणती?

औरंगाबादला असतांना युवक मोहत्सवातील एका स्किट मधे मी नारदमुनी पात्र केलं होतं. हे माझं पहिलंच स्किट होतं, ज्यासाठी आम्हांला सांघिक गोल्ड मेडल मिळालं होतं. हे माझं पहिलं पारितोषिक होतं. मी अकॅडमीला शिकत असतांना आम्ही 'मग्न तळ्याकाठी' हे नाटक केलं होतं ज्यात मी अभय नावाचं पात्र केलं होतं. नाटक झाल्यानंतर 'गोविंद नामदेव' सरांनी मला वर्गात उभं केलं आणि सर्वांसमोर मला ते खूप रागावले. नाटकाला आणि अभिनयाला मस्करीत घेतोस का? असं म्हणून मला ओरडले. मी खूप डिस्टर्ब झालो. त्या रात्री मला झोपच नाही आली आणि पुढचे खूप दिवस मी त्या घटनेला विसरू शकत नव्हतो. मग मी खूप मन लावून तयारी केली बाकी सगळ्या गोष्टी सोडून सरांनी सांगितलेल्या गोष्टी, शिकवलेल्या एक्सरसाइज, कॅरेक्टर स्टडी, कॅरेक्टरायजेशन, व्हॉइस एक्सरसाइज, रिडींग यात स्वतःला गुंतवून घेतलं. पुढे 4-5 महिन्यानंतर परत आम्ही 'इल्हाम' नावाचं एक नाटक केलं. ज्यात मी मुख्य भूमिका करत होतो. नाटक झाल्यानंतर गोविंद नामदेव सरांनी मला परत वर्गात सर्वांसमोर उभं केलं. मला प्रचंड भीती वाटली. वाटलं आता परत खूप रागावणार सर, पण तसं झालं नाही. सरांनी सर्वांसमोर माझं कौतुक केलं. माझ्या कामाचं कौतुक केलं. माझ्यात झालेल्या बदलावर ते बोलले. क्लास संपल्यावर बाहेर सरांनी मला पाठीवर थाप दिली आणि ही थापच मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं पारितोषिक वाटते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News